मार्केट यार्ड/माळशिरस, ता. १५ : गणेश विसर्जन अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपले असताना फूल बाजाराला मात्र उतरती कळा लागली. १००-१५० रुपये किलोपर्यंत विकला जाणारा झेंडू रविवारी १० रुपये किलोने विकला गेला, तर २०० रुपये पार झालेली शेवंती ५० रुपये किलोने विकली गेली. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचा चेहरा कोमेजला आहे.
गणेश प्रतिष्ठापनेच्या दोन दिवसांपूर्वी आणि गौराईच्या काळात सर्वच फुलांचा भाव वाढला होता. विशेषतः गौराई विसर्जनापर्यंत सर्वच फुलांचे भाव जास्त होते. परंतु मार्केट यार्डातील फूल बाजारात रविवारी सर्वच फुलांचे भाव कोसळले. झेंडूची फुले १० ते ४० रुपये किलो, शेवंतीवर्गीय भाग्यश्री ५० ते ८० रुपये, कापरीची फुले १० ते ३० व बिजली ८० ते १०० रुपयांपर्यंत विकली गेली.
पितृपंधरवड्यातील अंदाज
विक्रीसाठी फूल घेऊन आलेल्या उत्पादकांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. पुढील दोन दिवस तरी भाव समाधानकारक राहतील, अशी अपेक्षा फूल उत्पादक राजेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केली. पितृपंधरवड्यात तरी काय भाव असतील, याचा अंदाज फूल उत्पादक करू लागले आहेत.
रथाच्या सजावटीसाठी मागणी
बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. विसर्जन मिरवणुकीतील रथाच्या सजावटीसाठी बाजारात फुलांना मागणी होती. गणेश मंडळांकडून झेंडू, शेवंती, अॅष्टर, गुलाब, जुईच्या फुलांना मागणी होती. बाजारात पुणे जिल्ह्यातून तळेगाव, पानशेत, जातेगाव, यवत येथून तर सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नगर या जिल्ह्यांतून झेंडू आणि शेवंतीसह विविध फुलांची आवक झाली. कर्नाटकातून मारिगोल्ड जातीच्या शेवंतीची सर्वाधिक आवक होत आहे.
फुलांना मागणी असली तरी आवकही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे फुलांचे भाव घटले आहेत. पुणे शहर व जिल्ह्यासह मुंबई, कोकण, ठाणे, पनवेल, दादर, काही प्रमाणात गोवा भागातील खरेदीदारांकडून फुलांची खरेदी होत आहे.
- अरुण वीर,
अध्यक्ष, अखिल पुणे फुलबाजार अडते असोसिएशन
गणरायाच्या रथाची सजावट करण्यासाठी कृत्रिम फुलांना जास्त मागणी आहे. त्यामुळे फुलांना पहिल्यासारखी मागणी राहिलेली नाही. गौराई, घरगुती गणरायाचे विसर्जन झाले की फुलांची मागणी कमी होऊन भावात घट होते.
- सागर भोसले,
फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड
बाजारात सध्या फुलांच्या भावात घट झाली आहे. परंतु नवरात्रोत्सवात पुन्हा एकदा फुलांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील. त्यावेळी उत्पादकांना चांगल्या प्रकारचा भाव मिळेल.
- मयूर वाघले,
फूल उत्पादक
फुलांचे प्रतिकिलोचे भाव :
झेंडू : १०-४०, गुलछडी (सुट्टी) : २००-४००, अॅष्टर : जुडी ३०-५०, सुट्टा : १५०-२००, शेवंती : ५०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ५०-१००, डच गुलाब (२० नग) : १००-१५०, जर्बेरा : ५०-१००, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी : १५०-३००, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, आॅर्चिड : ४००-६००, जिप्सोफिला : २००-३००, जुई : ११००-१२००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.