मार्केट यार्ड, ता. २ : राज्यभरातील विविध मागण्यांसाठी सुरू झालेल्या मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला पुणे शहरात बुधवारी समाधानकारक प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली होती. मात्र, गुरुवारपासून या गाड्याही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी दिली.
डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांकडून होणारी जबरदस्तीची दंडवसुली तत्काळ थांबवावी, आधी लावलेले दंड माफ करावेत, क्लिनरची सक्ती रद्द करावी, व्यावसायिक वाहनांच्या प्रवेश व वेळेच्या निर्बंधांमध्ये शिथिलता द्यावी आणि ई-चालानसंबंधीच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. बुधवारी अनेक ट्रक व टेम्पोचालकांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला. ज्या वाहनांमध्ये आधीच माल भरलेला होता, त्या मालाची काल उतराई करण्यात आली; मात्र नव्याने कोणतीही वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. गुरुवारपासून अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फुले व औषधांची वाहतूक करणारी वाहनेही आंदोलनात सहभागी होत आहेत.
पुरवठ्यावर परिणामाची शक्यता
मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी इशारा दिला आहे की, आंदोलन असेच सुरू राहिल्यास पुढील दोन-तीन दिवसांत भाजीपाला व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ग्राहकांची संख्या वाढलेली असताना बाजारात नवीन माल न आल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.
सध्या ग्राहक जास्त असूनही गाड्यांमध्ये नव्याने माल भरला जात नाही. चार दिवसांत बाजारात कमतरता जाणवू लागेल आणि आंदोलनाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल.
- रायकुमार नहार, अध्यक्ष, दि पूना मर्चंट चेंबर
काल शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली होती, मात्र आता तीही आंदोलनात सहभागी होत आहेत. राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढणार आहे.
- डॉ. बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.