लोणी काळभोर, ता. २ : टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर मोटार खरेदी करण्याच्या बहाण्याने कुंजीरवाडी येथील एका शेतकऱ्याची ८ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मुंबईतील एका संशयित आरोपीविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंजीरवाडी येथील रहिवासी विक्रम रमेश धुमाळ (वय ४२) आणि त्यांच्या पत्नी तेजल यांनी जुलै २०२६ मध्ये फॉर्च्युनर मोटार खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शोध घेतला होता. यादरम्यान त्यांचा संपर्क मुंबईतील मुलुंड येथील ''ॲपेक्स ऑटो हब''चा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या प्रसन्ना हरिश्चंद्र सावंत याच्याशी आला. सावंत याने गाडीची किंमत ५१ लाख १० हजार रुपये सांगून व्यवहार निश्चित केला.
विश्वास संपादन करून सावंत याने धुमाळ यांच्याकडून मोटार बुकिंग, विमा आणि आरटीओ नोंदणीच्या नावाखाली वेळोवेळी लाखो रुपये ऑनलाइन आणि आरटीजीएसद्वारे स्वतःच्या व शोरूमच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. मोटार कोईम्बतूर येथे असल्याचे सांगून सावंत याने १७ जुलैला विमानाचे तिकीटही पाठवले. मात्र, प्रवासाच्या वेळी त्याने दूरध्वनी बंद केला.
धुमाळ यांनी कोईम्बतूर शोरूमशी संपर्क साधला असता, सावंत याने फसवणूक केल्याचे उघड झाले. धुमाळ यांनी चाकण येथील एजन्सीमार्फत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून ११ ऑगस्टला मोटार ताब्यात घेतली. मात्र, सावंत याने घेतलेल्या रकमेपैकी केवळ १ लाख रुपये परत केले आणि साडेआठ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विक्रम धुमाळ यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी प्रसन्ना सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.