UPR26B07580
पंढरपूर : येथील सांगोला चौकात रस्त्यावर चालकाला मारहाण करताना पोलिस कर्मचारी.
पंढरपुरातील वाहतूक पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप
आरोप करणाऱ्या कंटेनर चालकाला बेदम मारहाण; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ३ : पंढरपूर शहरातील वाहतूक पोलिसांचा एक कारनामा समोर आला आहे. ‘नो एंट्री’तून अवजड कंटेनर सोडण्यासाठी एक हजार रुपये रोख घेतल्यानंतरही दोन हजार रुपयांचा दंड केल्याचा आरोप एका वाहन चालकाने केला आहे. तसेच जाब विचारण्यासाठी परत आलेल्या चालकाला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी सांगोला चौकात घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
शहरात जड वाहतुकीस नो एंट्री असताना मंगळवारी (ता. ३) दुपारी एमएच ४६-७२५४ क्रमांकाचा कंटेनर शहरातून जात असताना वाहतूक पोलिसांनी तो अडवला. संबंधित चालकाच्या म्हणण्यानुसार, वाहन सोडण्यासाठी एका पोलिसाने एक हजार रुपये रोख घेतले. मात्र, काही वेळातच चालकाच्या मोबाईलवर दोन हजार रुपयांचा ई-चलन आल्याने त्याला संशय आला. याबाबत विचारणा करण्यासाठी चालक पुन्हा संबंधित पोलिसांकडे गेला असता, पोलिसांनी त्याला भर चौकात मारहाण केली. या घटनेमुळे सांगोला चौकात मोठी गर्दी झाली व काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
याचवेळी मोहोळचे आमदार राजू खरे यांची गाडी त्या ठिकाणी अडकल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. चालकाने पोलिसांकडून रोख रक्कम घेतल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यासमोर केला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती.
---
अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आमदार खरे
याबाबत आमदार राजू खरे म्हणाले, पंढरपूर शहरातील वाहतूक पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार आहे. आज जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. त्यामुळे संबंधित वाहतूक पोलिसांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. वेळीच कारवाई केली नाही तर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून वाहन चालकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.
---
आरोप खोटे : पोलिस निरीक्षक वाघमोडे
शहरातील जड वाहतुकीमुळे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून जड वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी रीतसर कारवाई केली आहे. कारवाई केली म्हणून एका वाहन चालकाने पोलिसांनी पैसे घेऊन कंटेनर सोडल्याचा आरोप केला आहे; तो चुकीचा आणि खोटा आहे, असे पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.