पान ३
हिंगोली, परभणी जिल्ह्यांत
६२ हजार २१४ हेक्टरवर हळद लागवड
गत वर्षीच्या तुलनेत १८ हजार ८५९ हेक्टरने वाढ
माणिक रासवे ः अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत यंदा ६२ हजार २१४ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गत वर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा हळद लागवड क्षेत्रात १८ हजार ८५९ हेक्टरने वाढ झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत हळद परवडत असल्यामुळे यंदाही लागवड क्षेत्रात वाढ झाली. परंतु पावसाचा प्रदीर्घ खंड आणि तापमानवाढीमुळे हळदीच्या कायिक वाढीवर परिणाम झाला आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे फेब्रुवारीपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादकतेत मोठी घट होणार असल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे हळद हे पारंपरिक पीक आहे. मागील काही वर्षांत खरिपातील पिकांच्या तुलनेत हळदीला चांगले दर मिळत आहेत. शिवाय हरिण, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यप्राण्यांकडून फारशी नासाडी होत नसल्यामुळे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे वाढत आहे.
२०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्यात ३५ हजार ३८४ हेक्टरवर हळद लागवड झाली होती. यंदा (२०२६) ४४ हजार ८८२ हेक्टरवर हळद लागवड झाली असून, गत वर्षीपेक्षा ९ हजार ४९८ हेक्टरने वाढ झाली आहे. २०२५ मध्ये परभणी जिल्ह्यात ७ हजार ९७१ हेक्टरवर हळद लागवड झाली होती. तर यंदा (२०२६) १७ हजार ३३२.६५ हेक्टरवर हळद लागवड झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत ९ हजार ३६१.६५ हेक्टरने वाढ झाली आहे.
मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळद लागवडीचा कालावधी योग्य मानला जातो. परंतु यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध नव्हते, तसेच पाऊस उशिरा झाला. त्यामुळे बहुतांश भागात जूनअखेरीस हळद लागवड झाली. नऊ महिन्यांच्या कालावधीच्या या पिकाला साडेआठ महिने पाणी द्यावे लागते. वाढीच्या कालावधीत तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असणे आवश्यक असते. पोषक वातावरण तसेच काटेकोर व्यवस्थापनातून शेतकरी हळदीचे एकरी २० ते ४० क्विंटल उत्पादन घेतात. परंतु यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग २० ते ३० दिवस पावसाचा खंड पडला. कायिक वाढीच्या काळात तापमानात वाढ झाली. हलक्या जमिनीवरील ओलावा नष्ट झाल्यामुळे हळदीची पाने करपत आहेत. सिंचनाचे स्रोत आटत चालले आहेत. अनेक शेतकऱ्यांना अजून पाच महिने पाणी देणे अशक्य असल्यामुळे हळदीच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे.
गत वर्षी अतिवृष्टीमुळे कंदसड झाल्यामुळे हळदीच्या उत्पादकतेत मोठी घट झाली होती. परंतु बाजारभाव १० ते २० हजार रुपयांच्या दरम्यान मिळाले. त्यामुळे यंदा शेतकरी हळदीकडे वळल्याने लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली; परंतु दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे.
कोट
पावसाच्या खंडामुळे यंदा पंचमीपासूनच हळदीला पाणी देत आहोत. किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पाने पिवळी पडत आहेत. आताच उन्हाळ्याप्रमाणे ऊन लागत आहे. हळदीला फेब्रुवारीपर्यंत पाणी द्यावे लागते. विहिरीतील पाणी वाढले नाही. दिवाळीपर्यंतदेखील पाणी पुरण्याची शक्यता नाही.
— अतुल राऊत, शेतकरी,
साखरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली
कोट
जूनमध्ये दीड एकर हळद लागवड केली आहे. पावसाअभावी जमिनीत ओलावा राहिला नाही. त्यामुळे ठिबकने पाणी देत आहोत. परंतु ऊन वाढल्याने जास्त पाणी लागत आहे. वाढ खुंटली असून पाने करपली आहेत.
- रामविलास मुंदडा,
शेतकरी,
झरी, ता. जि. परभणी
कोट
हळदीची उशिरा लागवड झाली. पाऊस कमी झाला. यंदा १५ सप्टेंबरपासून तापमानात वाढ झाली. पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. हळदीच्या कायिक वाढीवर तसेच फुटवे फुटण्यावर परिणाम झाला आहे. हळद पिकाला साडेआठ महिने पाण्याची गरज लागते. अवर्षणामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे हळदीच्या उत्पादकतेत घट निश्चित आहे.
— अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ,
कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली.
जिल्ह्यातील बाजारपेठांत गत वर्षी हळदीला चांगले दर मिळाले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील हळद लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. परंतु सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यामुळे उत्पादनात घट होईल.
— प्रदीप कच्छवे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली
हिंगोली-तुलनात्मक हळद लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका...२०२५...२०२६
हिंगोली...७२२२..१०५१७
कळमनुरी...५३५४...८२१४
वसमत...११,१३१...११,१९५
औंढानागनाथ...५९८०...६४२१
सेनगाव...५६९७...८५३५
........................
परभणी जिल्हा तुलनात्मक हळद लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका...२०२५...२०२६
परभणी...२०८२.४०...४१७०
जिंतूर...१९१९...३९७५
सेलू...१६६७...३९७४
मानवत...२३५.६०....६४८.५०
पाथरी...३०.२०...१७०.८०
सोनपेठ...१९.७०...८८७
गंगाखेड...४९...१६०
पालम...४३१.८०...११६६.६०
पूर्णा...१५३७...२१८०.७५
परभणी : जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील रामविलास मुंदडा यांच्या शेतातील यंदाच्या हळदीची वाढ खुंटली आहे. पाने करपत आहेत.
(छायाचित्र : माणिक रासवे)
१४९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.