सोयाबीन उत्पादकांना तातडीने नुकसानभरपाई द्या
--
पीकविमा, पाणीप्रश्नावर खासदार शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची भेट घेतली. शेतकरी शिष्टमंडळासमवेत झालेल्या या बैठकीत त्यांनी विविध कृषी व पाणीप्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.
यावेळी खासदार शिंदे यांनी प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी केली. तसेच खरीप २०२३ हंगामातील अनेक वंचित शेतकऱ्यांची पीकविमा रक्कम मंजूर असूनही अद्याप खात्यावर जमा झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ती त्वरित वितरित करण्याची मागणी त्यांनी केली.
भीमा-कोळेगाव धरणातून सीना नदी पात्रात पाणी सोडण्याबाबतही त्यांनी आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.
खासदार शिंदे यांनी मांडलेल्या मागण्यांवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या शिष्टमंडळात उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प्रवीण भोसले, अमोल सलवदे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.