पिंपरी - शहरात तापसदृश आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत ५९ हजार १६९ रुग्णाची तपासणी केल्याची नोंद महापालिका दप्तरी झाली असून, त्यातील अकरा हजार ४५३ तापसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून शहराचे ‘आरोग्य’च बिघडले असल्याची स्थिती दिसून येत आहे.
वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सकाळच्या थंडीमुळे घसादुखी, हात-पाय दुखणे, खोकला, सर्दी आणि कान व डोके दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. तसेच तापसदृश आजार अधिक असल्याचे जाणवत आहे. बुधवारी (ता. १५) पाच हजार एक रुग्णांची तपासणी झाली. त्यातील एक हजार ५८ रुग्ण तापसदृश्य आजाराने त्रस्त आहेत. प्रतिदिवशी वीस ते तीस जणांना टॅमिफ्ल्यू दिली जाते आहे. उष्मा आणि थंडी तसेच ढगाळ हवामान यामुळे घशातील संसर्ग तसेच, स्नायू गोठण्याच्या विकारात वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा अधिक त्रास होत आहे.
परतीच्या पावसामुळे गेल्या काही दिवसांत साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. ‘व्हायरल इन्फेक्शन’मुळे रुग्णांना प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी महापालिका रुग्णालयामध्ये सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
- डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिष्ठाता, वायसीएम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.