वाई- पसरणी घाटात काँक्रिटीकरणाचा बोजवारा
चार महिन्यांपासून खोदले रस्ते; खड्डे, धुळीमुळे नागरिक, प्रवासी हैराण
वाई शहर, ता. २६ : नोव्हेंबरपासून वाई बस स्थानक ते पसरणी घाट पायथ्यापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवल्याने नागरिक प्रवासी व शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी खड्ड्यांनी हैराण, तर धुळीने त्रस्त झाले आहेत.
नोव्हेंबरच्या सुरुवातीस सुरूर-पोलादपूर रस्त्याच्या या भागाचे काम सुरू झाले आहे.पुणे-पाचगणी-महाबळेश्वर हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. किसन वीर महाविद्यालय, तसेच पाचगणी व वाई येथे जाणारे- येणारे शालेय विद्यार्थी, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिक महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटक यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात खड्डे, एकेरी वाहतूक व धुळीचे प्रदूषण यांचा त्रास होत आहे.
सुरूर ते वाई दरम्यानच्या रस्त्याचेही काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत. तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. मोटारसायकलचालक जीव धोक्यात घालून राँग साइडने गाड्या चालवीत आहेत.
नव्याने सुरू असलेल्या व खोदकाम झालेल्या कच्च्या रस्त्यावर वरचेवर नियमितपणे पाणी मारून धूळ उडू नये, यासाठी काळजी घेतली जात नाही. कधीकधी पूर्ण दिवसभरात पाणी शिंपले जात नाही आणि पाणी शिंपले, तर अर्ध्या रस्त्यावर शिंपले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळ व बांधकाम विभाग यांचे या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण आहे किंवा नाही, हे समजून येत नाही, अशी शहरवासियांची तक्रार आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांच्या इंजिनांतून बाहेर पडणाऱ्या धुराचे प्रमाण वाढले आहे. या राज्यमार्ग १३९ वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, हे लक्षात घेता दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी पाणी मारणे गरजेचे आहे; परंतु आठ ते दहा दिवसांच्या कालावधीनंतर केवळ औपचारिकता म्हणून पाणी मारले जाते. धीम्या गतीने होणाऱ्या वाहतुकीमुळे, धुळीसह धुराचेदेखील प्रदूषण होत आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिके धुळीच्या कणांनी माखलेली दिसत आहेत. चारा पिकेही जनावरांच्या खाण्यालायक राहिलेली नाहीत. रस्त्याचे बहुतांश बांधकाम यांत्रिक साधनांच्या मदतीने होत असूनही कामाची गती अत्यंत मंद आहे. धुळीच्या त्रासामुळे रस्त्यालगतच्या अनेक व्यावसायिकांना आपले व्यवसाय, हॉटेल्स बंद ठेवावी लागली आहेत.
दृष्टिक्षेपात
- सुरूर ते वाई दरम्यानच्या रस्त्याचेही काम अत्यंत संथ गतीने
- ठिकठिकाणी पुलांची कामे सुरू
- पर्यायी मार्गाने वाहतूक वळवलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे
- दुचाकीचालक जीव धोक्यात घालून राँग साईडने चालवितात गाड्या
- नव्याने सुरू असलेल्या व खोदकाम झालेल्या कच्च्या रस्त्यावर नियमितपणे पाणी मारून धूळ उडू नये, याकडे दुर्लक्ष
फोटो
07628,
वाई : वाई बस स्थानक ते पसरणी घाट पायथ्यापर्यंत खोदून ठेवलेला रस्ता.
07629
वाई : पर्यायी रस्त्यावर पडलेले खड्डे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.