चंद्रकांत घोडेकर : सकाळ वृत्तसेवा
घोडेगाव, ता. १५ : आंबेगाव तालुक्यात पश्चिम आदिवासी गावे व सातगाव पठारावर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील २४ गावांना २२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षीपेक्षा दोन टँकर यंदा वाढले आहेत.
जलजीवन मिशनची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पाणीटंचाई यावेळीही कायम राहिली आहे.
टॅंकर सुरू असलेली गावे
कारेगाव, थुगाव, पारगावतर्फे खेड, कुरवंडी, भावडी, निघोटवाडी, माळीन, पेठ, वडगावपीर, पहाडदरा, तळेघर, फलोदे, बोरघर, पिंपळगणे, कुशीरे बुद्रुक, पाटण, तिरपाड, लोणी, मांदळीवाडी, उगलेवाडी, फदालेवाडी, पंचाळे बुद्रुक, धामणी, आसाने
दृष्टिक्षेपात टँकर
सुरू असलेले...... २२
मागील वर्षीचे...... २०
प्रस्तावित ...... ७
टॅंकर प्रस्तावित असलेली गावे
पोखरी, गंगापूर, गोहे खुर्द, जांभोरी, गोहे बुद्रुक, फुलवडे, आमोंडी
पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण सभापती व उपसभापती यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करतात. १७ ते २१ मार्च दरम्यान हा दौरा सभापती कैलासबुवा काळे व उपसभापती ज्योती पारधी व त्या विभागाचे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला . त्यानंतर समक्ष बैठक घेऊन त्यावर त्वरित टँकर सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
तालुक्यातील जलजीवन मिशनची ११८ पैकी ७० कामे पूर्णत्वास येत आहेत. पेठ व पोखरी प्रादेशिक योजनेची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. जलजीवन मिशनची व प्रादेशिक योजनांची कामे पूर्ण झाल्यास पुढील वर्षी हा भाग पूर्णपणे टंचाईमुक्त राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सभापती कैलासबुवा काळे व उपसभापती ज्योती पारधी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे त्वरित टँकर सुरू करण्यात येत आहे. पेठ प्रादेशिक योजनांची कामे पूर्ण झाल्यास सातगाव पठारावरील सात गावे व आदिवासी भागातील पोखरी परिसरातील दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.
विहिरीतील पाणी दूषित झाले असल्याने कूपनलिकेतून पाणी भरावे लागत आहे. त्यातून हंडा भरण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे महिलांना खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागते. दरवर्षीप्रमाणे शासनाने लवकरात लवकर टँकर सुरू करावे अशी शासनाकडे विनंती आहे.
- शैला हिले, हिलेवाडी-फुलवडे (ता. आंबेगाव)
भांगलेवाडीतील ओढ्यातील पाणी खूप कमी झाले असून तळातील पाणी वाटीने भांडी भरून आणावे लागत आहे. ओढा लांब असल्याने खूप त्रास होत आहे. शासनाने आमची अडचण ओळखून तातडीने उपाययोजना करावी.
- रुक्मिणी भांगले, भांगलेवाडी (आसाने) ता. आंबेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.