पुणे

पुणे जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांबरोबर उभी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. टॅंकरची संख्या व खेपा वाढविण्याची मागणी गावागावांतून होत आहे. शेवटचे उन्हाळी आवर्तन देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दौंडमध्ये २० टॅंकर
दौंड - दौंड तालुक्‍यात कालव्यालगत आणि नदीपात्रांलगतच्या गावांमधील पाण्याची समस्या तूर्तास दूर झाली आहे. परंतु, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर या गावांनादेखील पुन्हा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तालुक्‍यातील कालवा आणि नदीपात्रालगत नसणाऱ्या गावांची अवस्था मात्र बिकट आहे. एकूण १६ गावांना २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

दौंड तालुक्‍याचे एकूण क्षेत्र १,२८,१७९ हेक्‍टर असून, लागवडीयोग्य क्षेत्र ९१,६४९ हेक्‍टर आहे. त्यापैकी बागायती क्षेत्र ७३,५७३ हेक्‍टर; तर जिरायती १८,०७६ हेक्‍टर इतके आहे. ऊस लागवडीचे सरासरी क्षेत्र ३१,२६१ हेक्‍टर इतके आहे. तालुक्‍यात सरासरी २८ ते ३० लाख टन उसाचे उत्पादन होते. परंतु, यंदा दुष्काळामुळे ऊस उत्पादनावरदेखील परिणाम झाला आहे. तालुक्‍यात नदीपात्रात भामा-आसखेडचे पाणी आल्याने आणि कालव्याला आवर्तन मिळाल्याने त्यालगतच्या गावांना ऐन उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. आवर्तनामुळे विहिरी आणि विंधनविहिरींना सध्या पाणी आहे. परंतु, १५ मेनंतर पुन्हा टंचाईची चिन्हे आहेत. तालुक्‍याच्या अन्य भागांत मात्र विहिरी आणि विंधनविहिरी आटल्याने ऊस आणि कांदापिके जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याबरोबर पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करीत आहेत.   दौंड तालुक्‍यात २०१७ मध्ये सरासरीच्या १०९ टक्के, तर सन २०१८ मध्ये सरासरीच्या अवघा ३३.५५ टक्के पाऊस झालेला आहे. अत्यल्प पाऊस आणि टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन दशकांमध्ये ठोस उपाययोजना न करण्यात आल्याने पावसाळ्यातदेखील तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. सध्या तालुक्‍यात ताम्हाणवाडी, भरतगाव, बोरीऐंदी, यवत, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, कौठडी, रोटी, जिरेगाव, पांढरेवाडी, खडकी व स्वामी चिंचोली या १६ गावांना २० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकूण ३२ हजार ३४३ ग्रामस्थांना टॅंकरने माणशी २० लिटर पाणी दिले जात आहे. ताम्हाणवाडी येथे २१ मे २०१८ पासून टॅंकर सुरू आहे. पडवी, पांढरेवाडी, रोटी व वासुंदे येथे नोव्हेंबर २०१८ पासून, तर खोर आणि जिरेगाव येथे डिसेंबर २०१८ पासून टॅंकर सुरू आहे. स्वामी चिंचोली व देऊळगाव गाडा येथे जानेवारी २०१९ पासून टॅंकर सुरू आहेत. गिरीम, बोरीपार्धी, हिंगणीगाडा व कुरकुंभ येथून टॅंकरची मागणी आलेली आहे.

दौंड तालुक्‍यात मागील पाच वर्षांचा पाऊस
सन               पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०१४            ३१९.  ००
२०१५            २४८. ९७
२०१६            ३९६. ५० 
२०१७            ४९०. ८७ 
२०१८            १५१.  ००

पाणी विकत घेण्याची वेळ
दौंड तालुक्‍यात अनेक ठिकाणी विंधनविहिरी कोरड्या पडल्याने ऐन लग्नसराईत मंगल कार्यालयांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर कुरकुंभ एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांसह हॉटेलमालक आणि वीटभट्टीवालेदेखील टॅंकरने पाणी विकत घेत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागल्याने जारमध्ये पाणी विकणाऱ्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे.

*******************************************************

लासुर्ण्यात कालव्यावर ‘ठिय्या’
वालचंदनगर - इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नीरा डावा कालव्याच्या ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी गुरुवारी कालव्यावर ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने दोन दिवसांमध्ये पाणी सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

नीरा डावा कालव्याच्या 
लासुर्ण्यात कालव्यावर ठिय्या माध्यमातून २८ मार्चपासून इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील आवर्तन देण्यास सुरवात करण्यात आली आहे. पाणीगळती व चोरीमुळे आवर्तनास विलंब होत असल्यामुळे पश्‍चिम भागातील ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेवरील लासुर्णे, बेलवाडी, चव्हाणवाडी, कर्दनवाडी, जामदारवस्ती, जाचकवस्ती परिसरातील शेतकऱ्यांची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी नीरा डावा कालव्यावर ठिय्या मांडला होता. पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्यास वितरिकेचे कुलूप तोडून पाणी नेण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शनिवारी (ता. ६) ४२ क्रमांकाच्या वितरिकेमधून १५ क्‍यूसेक व ७ मे रोजी ४३ क्रमांकाच्या वितरिकेमधून ४० क्‍यूसेक पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या वेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पंचायत समिती सदस्य ॲड. हेमंतराव नरुटे, ‘दूधगंगा’चे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, ‘छत्रपती’चे संचालक बाळासाहेब सपकळ, अनिल पवार, राजाराम जाचक, तुकाराम देवकाते, विजय मचाले, पोपट वाघमोडे, केशव नगरे, संजय पवार, यशवंत जामदार, महादेव जाधव, प्रशांत निंबाळकर उपस्थित होते. जलसंपदाच्या पणदरे उपविभागाचे अधिकारी अजित जमदाडे, बारामती उपविभागाचे अधिकारी पी. एन. जगताप, अंथुर्णेचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले, कालवा निरीक्षक आजिनाथ जगताप यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

*******************************************************

भामा आसखेड’मधून पाण्याची मागणी
आंबेठाण - वाढत चाललेला उन्हाचा पारा आणि आटत चाललेला भामा नदीपात्रातील पाणीसाठा लक्षात घेता विविध गावच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच भरात आलेली पिके जगविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भविष्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता फक्त पिण्यासाठीच पाणी सोडले जाईल, अशी शक्‍यता आहे. सध्या भामा आसखेड धरणात अवघा १९.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

भामा आसखेड धरणाऱ्या लाभ क्षेत्रात आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे भरण्यासाठी चार मार्चपासून नऊ एप्रिलपर्यंत धरणाच्या आयसीपीओमधून ८०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी खेड तालुक्‍यातील दहा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरले होते. परंतु कडाक्‍याचे ऊन, बंधाऱ्याची गळती आणि शेतीसाठी होणारा पाणी उपसा यामुळे खेड तालुक्‍यातील बंधारे अल्पावधीत कोरडेठाक पडले आहेत. बहुतांश ठिकाणी बाजरीसारखी पिके एका पाण्यावर आली असून या पिकांना शेवटचे पाणी नाही मिळाले तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. उन्हाळी हंगामातील ऊस, कोबी, फ्लॉवर, मका, विविध पालेभाज्या, फुलझाडे यांना पाणी मिळाले नाही तर ती जळण्याच्या मार्गावर आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. नदीपात्रातील मोटारींचे फुटबॉल वाढवून त्याद्वारे पाणी मिळविण्यासाठी आटापिटा केला जात आहे. त्यासाठी अनेकांनी नदीपात्रात खड्डे घेतले असून त्यात जमा होईल, तसे पाणी शेतीसाठी उचलले जात आहे.

निवडणुका संपल्या, आता लक्ष द्यावे...
चास कमान धरणातून पाणी सोडण्यात आले असून त्याचा फायदा शेलपिंपळगावपासून खाली असणाऱ्या गावांना होणार आहे. परंतु भामा आसखेड धरणाच्या खाली शेलपिंपळगावपर्यंत असणाऱ्या गावांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. उन्हाळी हंगामातील एक आवर्तन यापूर्वी सोडले असून लोकांच्या मागणीनुसार पुढे पाणी सोडले जाईल. परंतु त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी लागेल, असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या कामातून मोकळे झालेल्या नेतेमंडळींनी आता नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गोनवडी, कोरेगाव, शेलू, आसखेड, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक, रोहकल आदी गावांतील शेतकरी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT