Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal
संपादकीय

ढिंग टांग ब्रिटिश नंदी ; मुख्यमंत्री व्हा…!

सकाळ वृत्तसेवा

आजचा दिवस : क्रोधीनाम संवत्सर, श्रीशके १९४६, चैत्र शु. त्रयोदशी.

आजचा वार : संडेवार!

आजचा सुविचार : गुरुबिन कौन लगावें वाट…(‘लगावे’च्याऐवजी बहुधा ‘बतावें’ असे मूळ कवनात असावे! तपासून घेणे.)

न मो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे)

निवडणुकीचा काळ आहे. उन्हातान्हात भटकण्याचे दिवस आहेत. चंद्रपूर- भंडारा- गोंदियापासून थेट कोकणापर्यंत नुसता पायाला भिंगरी लावल्यागत फिरतो आहे. ‘‘साहेब, गॉगल लावा! उन्हं फार तापली आहेत’’ असे मला आमचे बावनकुळेसाहेब वारंवार सांगतात. पण मी लावत नाही. कारण मी दिवसा कधीच गॉगल वापरत नाही, रात्री वेषांतराच्या वेळीच वापरतो, हे साऱ्याच पक्षांना आता ठाऊक झाले आहे.

परवा आमचे माजी मित्र उधोजीसाहेब यांनी नवा गौप्यस्फोट करुन माझी गुपिते चव्हाट्यावर आणली. तेव्हा मात्र दिवसादेखील गॉगल वापरावा, असे पहिल्यांदा वाटले. २०१९ साली चि. आदित्य याला ग्रूम करुन नीट कोचिंग देऊन मुख्यमंत्री करीन, आणि मी दिल्लीला अर्थमंत्री व्हायला मोकळा होईन, असे मी त्यांना सांगितल्याचे त्यांनी पत्रकारांनाच सांगून टाकले. अशी गुपिते कुणी प्रेसवाल्यांना सांगते का? मी ताबडतोब हा आरोप फेटाळला, आणि मला काही वेड लागलेले नाही, असे स्पष्ट केले. (ते मी बरे केले, असे नंतर बावनकुळेसाहेबही म्हणाले.) उगीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम नको!!

वस्तुस्थिती नोंदवून ठेवणे भाग आहे, म्हणून डायरीत नोंद करतो आहे :

२०१९ साली एका दिवशी (तारीख आठवत नाही.) सायंकाळी ‘मातोश्री’वर तेलकट बटाटेवडे खाताना (सात खाल्ले, हे आठवते आहे…) मी उधोजींना म्हणालो की, मित्राऽऽ…(त्याकाळी आमची फार म्हंजे फार्फारच जवळीक वाढली होती…) कशाला चिंता करता? मैं हूं ना! चि. आदित्यच्या करिअरची काळजी सोडा. त्याला माझ्या कोचिंग क्लासला पाठवा. मी त्याला व्यवस्थित ट्रेनिंग देऊन बरोब्बर मेरिटमध्ये आणीन, आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करीन!’’ (खुलासा : हे वडे येण्याआधी घडले!)

‘‘खर्रर्रच? चि. आदित्य होईल का मुख्यमंत्री? माझा तर विश्वासच बसत नाहीए..(सैपाकघराकडे तोंड करुन) अहोऽऽ, साबुदाणा खिचडीही येऊ द्या, दोन-तीन प्लेट!’’ उधोजी हरखून म्हणाले. तेवढ्यात चि. आदित्य खोलीत आले. त्यांना म्हटले, ‘‘काय चिरंजीव, होणार ना मुख्यमंत्री?’’ हातभर जीभ काढून जोराजोराने मान हलवत चिरंजीव लाजून खोलीबाहेर पळाले!!

बस्स, इतकेच घडले!

मुख्यमंत्री ग्रूमिंग करणे सोपे नसते. विद्यार्थ्याकडून खूप तयारी करुन घ्यावी लागते. उदाहरणार्थ, नोकरशाहीवर अंकुश कसा ठेवावा? हा धडा. टेबलावर कुठली तरी फाइल ठेवून नोकरशहाला बोलावून घ्यावे. मग फाइल टेबलाच्या ड्रावरात टाकून विचारावे, ‘‘तुम्हीच ते अमूकअमूक साहेब ना? तुमची फाइल आलीये माझ्याकडे!’’

पुढले सगळे काही तो नोकरशहा निमूटपणे ‘येस्सर येस्सर’ करत ऐकतो. फाइल त्याचीच असावी, असेही काही नाही. अशा पद्धतीने नोकरशाहीवर अंकुश सहज ठेवता येतो. पण ते सरावाने जमते. चि. आदित्यला प्रशिक्षणकाळात ते कठीण गेले, हेही इथे नमूद करुन ठेवतो. कारण तो सगळ्याच नोकरशहांना ‘काका’ किंवा ‘अंकल’ अशी हाक मारायचा!! असो.

कायद्याचा पदवीधर असून(ही) मला अर्थशास्त्रातलेही कळते, याचा अर्थ मला दिल्लीला जायचे आहे, असा कसा होईल? ‘काशीयात्रेला जाईन’ या चालीवर मी ‘दिल्लीला जाईन’ असे सहज म्हटले होते. ते काही वचन दिले नव्हते. जाऊ दे! एखाद्याने किती गैरसमज करुन घ्यावेत, याला काही लिमिट नाही. ज्याचे त्याच्यापाशी!!

जय महाराष्ट्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT