संपादकीय

पचास दिन बाद! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

वाचकहो, आम्ही आपले शतप्रतिशत हितचिंतक आहो, ह्याची कृपया खात्री बाळगा (मस्करी नाय हां!). तुमच्यासाठी आमचा जीव तीळतीळ तुटतो. वर्खाली होतो. अर्धादेखील होतो. म्हणूनच आपल्याला आम्ही काही (फुकट) सल्ले येथे देणार आहो. जेणेकरून आपले पुढील वर्ष आणि आयुष्य सुखकर जाईल. पहिल्याछूट आम्ही आपल्याला पन्नास दिवसांची मुदत संपल्याच्या शुभेच्छा देतो (नववर्षाच्या काय कोणीही देते...). लोकहो, आपण सर्व हे जाणताच, की नोटाबंदीची मुदत संपुष्टात येत आहे. गेले पन्नास दिवस आपणा साऱ्यांना कमालीचे कष्ट पडले. आपल्यातील काही लोकांना तर फार्फारच कष्ट पडले. त्या सर्व कष्टकऱ्यांना आम्ही ह्या प्रसंगी शतशत नमन करतो. आपण सर्व नसता, तर हा महायज्ञ कसा बरे निर्विघ्न पार पडला असता? यज्ञात विघ्ने आणण्याची आपल्याकडे असुर मंडळींची पूर्वापार चाल आहे. यज्ञात विघ्न आणून जिभा बाहेर काढून खदाखदा हंसणारे असुर आपण पौराणिक सिनिमा आणि मालिकांमध्ये पाहिलेत की नाही? झाले तर.. त्या परंपरेनुसार काही असुरांनी ह्या यज्ञात अभद्र कवट्या नि हाडे टाकण्याचे उद्योग आरंभले होते. पण, आपले श्रेष्ठ धनुर्धर श्रीमान नमोजी ह्यांच्या अमोघ बाणांमुळे ह्या सर्व असुरांच्या जिभा आणखी हातभर बाहेर निघून डोळेदेखील पांढरे झाले, आणि कपाळाच्या जागी शिंगांऐवजी दोन टेंगळे तेवढी उरली!! असो, असो!!

तथापि, पच्यांस दिनों बाद काही गोष्टींची तातडीने काळजी आपल्याला क्रमप्राप्त आहे. त्यांची यादी येथे देत आहो.
१.    पन्नास दिवसांत सारे सुरळीत झाले आहे, ही ठाम खूणगाठ मनीं धरावी. एक्‍कावन्नाव्या दिवशीही एटीएम बंद निघाले, तर सर्वस्वी आपल्या नशिबाला दोष द्यावा, त्याला सरकार जबाबदार नाही!!
२.    पन्नास दिवस गेल्यावर सगळे चांगले होईल का? असा सवाल आम्हाला पाच-पन्नास लोकांनी विचारला. पन्नास दिवसांनंतर, ‘गेले पन्नास दिवस बरे होते, असे म्हणण्याचे दिवस येतील’ हे आमचे भाकीत होते, ते खरे ठरेल!
३.    गरीब चेहरा करून फिरणाऱ्याच्या खिसापाकिटांस धोका संभवतो. हसतमुखाने बाहेर पडलात, तर पाकीटमार आपल्या दिशेने फिरकणारसुद्धा नाही!
४.    पेटीएमवर पाकीट मारता येत नाही!!
५.    हाटेलीत बिल भरण्याच्या टायमाला उगीच हात धुण्याच्या मिषाने पळू नये. वेळ फुकट जाईल! कां की को-णी-ही स्वत:हून खिशात हात घालणार नाही!!
६.    ‘पेमेंट कैसा करेंगे साहब? गांधी या मोदी?’ ह्या सवालाला केविलवाणे हसून वेळ मारून न्यावी.
७.    क्रेडिट किंवा डेबिट कार्ड मारताना दुकानदार चेहरा फार गंभीर करील. कार्ड रिजेक्‍ट झाले तर काय, ह्या भीतीने आपल्या पोटात गोळा येईल. अशा वेळी त्या यंत्राकडे न पाहता इकडे तिकडे पाहण्याची सवय स्वतःस लावावी. 
८.    वरच्या खिशात पन्नासाची नोट ठेवण्याचे दिवस गेले आहेत. तेथे फक्‍त पेन ठेवावे.
९.    खुंटीला टांगून ठेवलेल्या प्यांटीच्या खिशातून वेळोवेळी पैशाचा अपहार होण्याची शक्‍यता आता पूर्णतः मावळली आहे. कुठेही प्यांट टाकू शकता! जिओ!!
१०.    एखाद्याच्या शर्टावर गुलाबी फराटे दिसले म्हणून त्याच्या नीतिमत्तेबद्दल शंका घेऊ नका. खिशातील दोन हजाराच्या नोटेसह शर्ट धुवायला टाकला तर असे होते!
११.    एक तारखेनंतर वाट्‌टेल तेवढे पैसे ब्यांकेतून काढण्याची मुभा मिळेल; पण त्यासाठी तोंडाला बुरखा बांधून अपरात्री जाणे भाग आहे. असो!
१२.    पैसा हे सर्वस्व नाही, हे आता तरी तुमच्या लक्षात आले आहे का?
...ही बारा तत्त्वे लक्षात ठेवा. येते साल थोडे बरे जाईल! शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT