संपादकीय

राजकारण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

डॉ. आनंद ज. कुलकर्णी

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे निसर्गातील बुद्धिमत्तेचे प्रथम गणिती आणि नंतर कॉम्प्युटर कोडमध्ये रूपांतर करून एखाद्या सिस्टिमची योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे होय. या सिस्टिम्स जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे लष्करी, विमानसेवा, गेमिंग, वैद्यकीय सेवा, स्मार्ट सिटी, वाहतूक सेवा इत्यादींपासून अगदी लोकांच्या खरेदी करण्याच्या पद्धती शोधून काढण्यापर्यंत विस्तारलेल्या आहेत. या कॉम्प्युटर कोडना "कॉम्प्युटर एजंट' असेही म्हणतात. हे एजंट एकमेकांशी संवाद साधतात, स्पर्धा करतात, एकमेकांपासून शिकतात आणि एकत्रितपणे क्‍लिष्ट समस्याही सोडवतात. ज्याचा उपयोग योग्य निर्णय घेणे, सिस्टिम्सची क्षमता वाढविणे आदींसाठी होतो.

गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासून मुंग्या, पक्षी, काजवे, जीवाणू, मासे आदी प्रजातींच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे गणिती आणि कॉम्प्युटर एजंट्‌समध्ये रूपांतर केले गेले आहे. मुंग्या या फेरोमोन नावाचे रसायन उत्सर्जित करून वारुळापासून ते साखरेच्या गोणीपर्यंत कमीत कमी अंतराचा मार्ग शोधतात. पक्ष्यांचा थवा ठराविक त्रिकोणी आकार बनवतो, ज्यामुळे हवेचा रोध कमी होतो आणि कमीत कमी ऊर्जा खर्च करून शेकडो किलोमीटरपर्यंत उडतो. हजारो माशांची झुंड भक्षकापासून स्वतःचा बचाव करते, तसेच भक्ष्याला शोधायचेही काम करते. या सर्व प्राण्यांच्या समाजाचे काही नियम असतात. हे नियम कालपरत्वे बदलत व सुधारत असतात. पण नियमांची मूळ चौकट मात्र बदलत नाही. 

कॉम्प्युटर एजंट कार्यकर्ते, नेतेही

प्राण्यांच्या समाजात नियमबद्ध बुद्धिमत्ता आहे, तशीच ती मानवी समाजातही अनुभवता येते. भारतातील, तसेच इतर देशांतील राजकीय पक्ष, निवडणुकांचा अभ्यास करताना हे लक्षात आले की पृथ्वीवरील सर्व मानवी समाज विभिन्न विचारसरणींमध्ये विभागलेला आहे. उदाहरणार्थ, भांडवलशाही, साम्यवाद, समाजवाद वगैरे. तसेच हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती वगैरे विचारधारांमध्ये समाज विभागलेला आहे. या ठराविक चौकटीतील विचारधारा त्या समाजाच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या राहणीच्या पद्धती, आशा, आकांक्षा, इच्छा इत्यादीसाठी मार्गदर्शक ठरत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक देशातील समाज हा राजकीय पक्षांच्या विचारसरणीनुसारही विभागलेला आहे.

राजकीय पक्षांची स्वतंत्र विचारसरणी, पक्ष-पक्षांतील स्पर्धा, पक्षांतर्गत स्पर्धा व रस्सीखेच, कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशा-आकांक्षा, स्वार्थ आदी एका ठराविक लोकशाहीच्या चौकटीत बसलेले आहे. ही लोकशाही चौकटीतील राजकीय बुद्धिमत्ता पिढ्यान्‌पिढ्या मानवी समाजातील विविध समस्या सोडवत आहे, तसेच प्रगल्भही होताना दिसत आहे. तसे पाहिले तर हा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचा विषय आहे. पण यात नियमबद्ध वैज्ञानिक, तसेच गणिती शास्त्र लपलेले आहे.

मी सर्वप्रथम 2014 मध्ये सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात या लोकशाही चौकटीचे गणिती आणि कॉम्प्युटर एजंट्‌समध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर ही नियमबद्ध चौकट कॉम्प्युटर अल्गोरिदमच्या स्वरूपात मांडली. या संदर्भातील पहिला लेख 2017 मध्ये "न्यूरल कॉम्पुटिंग अँड ऍप्लिकेशन्स' या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संदर्भातील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला. या कामात विविध कॉम्प्युटर एजंट्‌स बनवून त्या प्रत्येकाला कार्यकर्ता, पाठीराखा, मतदार, नेता आदी काम दिले. त्यांची वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागणी केली, ज्यामुळे त्यांची काम करण्याची दिशा ठरली. 

पक्षांतर्गत स्पर्धेचाही सामना 

खऱ्या लोकशाही पक्षांमध्ये एखादी व्यक्ती कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात स्वतःला झोकून देते, तेव्हा त्याला त्याचा राजकीय स्वार्थ, आकांक्षा खुणावू लागतात. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा सुरू होतात. प्रत्येकाला आपला राजकीय नेता सर्वश्रेष्ठ वाटत असतो आणि त्यामुळे तो त्याच्यापर्यंत पोचायचा प्रयत्नही करत असतो. परंतु, त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची आपल्या नेत्याबरोबर तुलनासुद्धा करत असतो.

स्वतःचे राजकीय मनोबल कायम ठेवण्यासाठी त्याचा त्याला उपयोग होत असतो. कार्यकर्ता अशी तुलना करतो, तसाच नेतासुद्धा स्वतःची तुलना दुसऱ्या पक्षाच्या नेत्याबरोबर करत असतो. त्यामुळे त्याला स्वतःला सतत चार पावले पुढे ठेवण्याशिवाय, तसेच प्रगतिशील राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्याला पक्षांतर्गत स्पर्धेचाही सामना करावा लागत असतो. कारण त्याला पक्षातीलच दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून आव्हान मिळत असते. त्यामुळे पक्षातील नेत्याचा प्रयत्न हा नेहमीच त्याची जागा टिकवण्याचा, तसेच निवडणुका जिंकून सर्वश्रेठ नेता बनण्याचा असतो. जसा खऱ्या लोकशाही पक्षांमध्ये हा अनुभव असतो, तसाच सर्व कॉम्प्युटर एजंट्‌सना समस्या सोडविण्यासाठी दिली जाते.

प्रत्येक एजंट त्याच्या पक्षाच्या चौकटीप्रमाणे स्वतःचे उत्तर शोधतो. ते उत्तर जितके उत्तम, तितकी त्याची पक्षातील श्रेणी वाढत जाते व सर्वसामान्य कार्यकर्ताही नेता बनतो. पण एखादा उत्तम उत्तर असलेला एजंट कमी दर्जाचे उत्तर शोधल्यामुळे पुन्हा नेत्यावरून सर्वसामान्य कार्यकर्ता एजंट बनतो. जेवढे जास्तीत जास्त कार्यकर्ता एजंट्‌स चांगले उत्तर मिळवू लागतात, तेवढा त्यांचा पक्ष अधिक बळकट बनत जातो. 

जसा खऱ्या लोकशाही पक्षांमध्ये अनुभव असतो की यशस्वी पक्षाकडे आणि नेत्याकडे दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते पाठीराखे, आकृष्ट होतात, तसेच काही कॉम्प्युटर एजंट्‌ससुद्धा एका ठराविक बाजूने विचार करून उत्तर न मिळाल्याने किंवा कमी दर्जाचे मिळाल्याने स्वतःचे विचार बदलून दुसऱ्या पक्षाबरोबर जातात. म्हणजेच उत्तर शोधायची दिशा बदलतात. त्यामुळे सर्व पक्ष एकमेकांशी तुलना करत शक्‍य तितके चांगले उत्तर देण्याच्या प्रयत्नात राहतात. या सर्व प्रक्रियेमध्ये एजंट नेते स्थान टिकविण्यासाठी किंवा सतत सर्वोत्तम उत्तर मिळविण्यासाठी झगडत राहतात. या सर्व प्रक्रियेतून सर्वोत्तम कॉम्प्युटर एजंट निवडला जातो आणि त्याचे उत्तर ग्राह्य धरले जाते. हे सर्व खऱ्या लोकशाहीतही स्पष्टपणे दिसून येते.

ज्यामध्ये काही राजकीय पक्ष बळकट होत जातात, काही तुटत जातात, नावे बदलली जातात, पण संपत मात्र नाहीत. कारण विचारसरणी सतत सुधारत राहते. जो या सुधारणा स्वीकारतो, प्रत्यक्ष परिणामकारक काम करतो, ज्याचा कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना फायदा होतो, आशावाद वाढीस लागतो, तो नेता राजकीय पायरी चढत जातो व शीर्ष नेतृत्वाला पोचतो.

तोच सर्वमान्य होतो. पण तेथून ते स्थान टिकविण्यासाठी पुन्हा स्पर्धा सुरूच राहते. सध्या या राजकीय विचारसरणींमधील स्पर्धा, पक्ष-पक्षांतर या सर्व प्रकारांचे गणिती आणि कॉम्प्युटर एजंट्‌स स्वरूपात मांडणी करून वैद्यकीय सेवा, वाहतूक सेवा अशा विविध क्षेत्रांतील समस्या सोडविण्यावर संशोधन चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT