Article Editorial Pune Edition
Article Editorial Pune Edition  
संपादकीय

मवाळ हळवे सूर जाऊ द्यात... 

सकाळवृत्तसेवा

भारत देशाच्या बहात्तर रोगांवर इलाज करणारी अक्‍सीर दवा कुठली, असा प्रश्‍न कुण्या अनभिज्ञाने केला, तर क्षणाचीही उसंत न घेता दरसाल होणाऱ्या "आयपीएल'च्या क्रिकेट उरुसाकडे बोट दाखवणे भाग पडावे. गेले दशकभर हा उत्सव नित्यनेमे पार पडतो. यंदाचे वर्षही त्यास अपवाद नाही. शनिवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन वेळा विजेता ठरलेला चेन्नई सुपरकिंग्ज आणि गतवेळचा विजेता यजमान मुंबई इंडियन्स यांच्यामधल्या उद्‌घाटनीय सामन्यातला पहिला चेंडू खेळपट्टीवर पडेल, त्याक्षणी भारतातील शेकडो समस्या एकेक करत विरघळू लागतील. काश्‍मीरमधला रक्‍तपात, नक्षलवाद्यांचे हल्ले, शेतकऱ्यांची आंदोलने, जातीपातींचे मोर्चे, राजकारण्यांच्या यात्रा, मेळावे, पकोड्यांचे रोजगार, बेरोजगारांचे तांडे, उद्योजकांची दडविलेली संपत्ती नि बुडविलेली कर्जे, नवनवे फेसबुकी वाद, निवडणुकांमधली चिखलफेक, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, मंत्रालयातले कागदी उंदीर...यच्चयावत सारे काही जादूची छडी फिरल्यासारखे धूसर होत जाईल आणि उभ्या देशाला झिंग चढेल ती क्रिकेटची. 

"आयपीएल'ची ती पिपाणी दुमदुमेल आणि एरवी वर्तमानपत्रात मथळे मिळविणाऱ्या घटना-व्यक्‍ती आपसूक आतल्या पानांवर जातील. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बातमीपत्रांचे बाज बदलतील. मोबाईल फोनमध्ये तिन्ही त्रिकाळ जागृतावस्थेत अधिवास करून राहिलेल्या "व्हॉट्‌सॅप', "ट्‌विटरा'दी शक्‍तिपीठांचे संदेश बदलतील. सर्वत्र भरून राहील फक्‍त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. अर्थात, हा असर जेमतेम दोन महिने टिकेल एवढेच. या विधानात अतिशयोक्‍ती अजिबातच नाही. गेले दहा हंगाम आपल्या देशात हेच तर घडत आले आहे. यंदाच्या अकराव्या "आयपीएल'च्या उत्सवाचा उत्साह तर गेल्या दहा हंगामांवर कडी करणारा ठरेल, अशी चिन्हे आहेत. 

गेल्या "आयपीएल' उरसाची ब्रॅंड व्हॅल्यू तब्बल 5.3 अब्ज डॉलर इतकी, म्हणजेच सुमारे 35 हजार कोटी रुपये इतकी होती. यंदा त्यात आणखी वाढ होईल. आठ वेगवेगळे संघ या साखळी स्पर्धेत खेळणार आहेत. संघातील देशी-परदेशी खेळाडूंसाठी झालेल्या लिलावातील आकडे बघितले तरी डोळे फिरावेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीसारखा सर्वांत महागडा क्रिकेटपटू 17 कोटींच्या बोलीनिशी रॉयल चॅलेंजर्ससाठी सज्ज होतो, तर महेंद्रसिंह धोनी वा रोहित शर्मासारखे सितारे 15-15 कोटींना विकले जातात. प्रत्येक संघाने जवळपास 21 ते 47 कोटी रुपये खेळाडूंच्या लिलावावर खर्च केले आहेत. इंटरनेट आणि मोबाईल प्रक्षेपणाच्या हक्‍कांचे शुल्कही साडेबावीस कोटी डॉलरच्या घरातले आहे. दूरचित्रवाणीच्या जाहिरातींची मलई तर कल्पनेच्याही पलीकडची ठरावी. 

क्रिकेटच्या या दिवाळीत निव्वळ प्रक्षेपणाच्या हक्‍कासाठी एका क्रीडावाहिनीला तब्बल सोळा हजार कोटी रुपये मोजावे लागले आहेत, यातच सारे काही आले. अर्थात, हा आकडा पाच वर्षांसाठीचा असला तरीही काही कमी म्हणता येणार नाही. याशिवाय इतरही पुरस्कर्त्यांनी आपापल्या थैल्यांची तोंडे बऱ्यापैकी मोठी केली आहेत, हे कशाचे द्योतक म्हणावे? थोडक्‍यात, एखाद्या छोट्या राज्याच्या किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेइतका हा अगडबंब उरूस भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, यात शंका नाही. चहूबाजूंनी धबधब्यासारखा येणारा हा पैसा रोखणे हे कुठल्याही वास्तववादी विचारधारेच्या नियंत्रणातले काम उरलेले नाही. बेटिंगची उलाढाल तर जमेसदेखील धरता येत नाही. "आयपीएल'चा उत्सव ही भारतासाठी अफूची गोळी असल्याची टीका केली जाते. पण बदललेल्या बाजारपेठीय संस्कृतीत या अफूलाही असरदार औषधाचे मोल आले आहे. 

क्रिकेट खेळाने आजवर अनेक भलीबुरी स्थित्यंतरे पाहिली आहेत. पाच दिवस चालणाऱ्या लांबलचक कसोटी लढतींपासून अगदी टेनिस बॉलच्या बॉक्‍स क्रिकेटच्या सामन्यांपर्यंत अनेक फॉरमॅटमध्ये हा खेळ खेळला जातो. गावागावांतले "परश्‍या' आपापल्या पंचक्रोशीतील मैदाने गाजवत असतात. सर्वार्थाने आपल्या "डीएनए'मध्ये शिरकाव साधलेला हा खेळ आहे. इतका की क्रिकेटशिवाय भारतीय माणसाच्या सामाजिक अस्तित्त्वाचा विचार करणे कठीण व्हावे. म्हणूनच "आयपीएल'ला नाके मुरडण्यात आता काही हशील नाही. किंबहुना, एक अर्थव्यवस्था म्हणून त्याकडे पाहायला शिकणे काळानुरूप होईल. "आयपीएल'च्या नावाखाली अनेक नियमबाह्य गोष्टी वा वर्तन घडत असते. पण त्याला विधायक वळण देणे हे क्रिकेटवेडा समाज म्हणून आपल्या हाती आहे. ते डोळसपणाने केले, तर हाच उठवळ मानला जाणारा उत्सव भारताचा आकर्षणबिंदू ठरू शकेल. या भवनातील पुराणे गीत, मवाळ, हळवे सूर जाऊन उत्साहाची सळसळ देशभरात वाहिली तर ती देशाला हवीच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT