बायडेन आणि कमला हॅरिस.
बायडेन आणि कमला हॅरिस. 
संपादकीय

बायडेन यांच्या व्यूहरचनेची प्रतीक्षा

धनंजय बिजले

अमेरिकेत अध्यक्षपदाची सूत्रे ज्यो बायडेन घेणार, हे निश्‍चित होत असतानाच त्यांच्या आगमनाने जगाच्या पटलावर कोणत्या देशाबाबत काय घडू शकते, कोणाला काय वाटते, यापासून ते भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांची निवड भारताला कितपत पथ्यावर पडेल, अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगू लागल्या आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्याने अनेक जागतिक संदर्भ एका झटक्‍यात बदलणार आहेत. जगभरातील अनेक हुकूमशाही देशांनी तसेच अशा प्रवृत्तीच्या नेत्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांच्या विजयावर साधी प्रतिक्रियाही दिली नाही. यातच काही सारे येते. बायडेन येत्या जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. त्यानंतरची अमेरिका वेगळी असेल. त्यांच्या काळात अमेरिकेचे अन्य देशांशी संबंध कसे राहतील, याबाबत सध्या जगभरातील माध्यमांत सविस्तर ऊहापोह केला जात आहे.

चीन, रशिया, उत्तर कोरिया सावध
ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकेचे आणि जगाच्या संबंधात आमूलाग्र बदल झाल्याचे निरीक्षण ‘बीबीसी’ने नोंदविले आहे. ‘बीबीसी’च्या मते चीन, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांना ट्रम्प निवडून यावे, असेच मनोमन वाटत होते. यामागील प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती. चीनसाठी ट्रम्प सत्तेत आवश्‍यक होते; याचे कारण म्हणजे त्यांच्यामुळे अमेरिकी समाजात फूट पडली होती. ट्रम्प जगातही एकटे पडू लागले होते. त्यामुळे महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करणे चीनसाठी सुकर होते. आता बायडेन यांच्यामुळे चीनपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जागतिक पटलावर पुन्हा अमेरिका मोठी होण्याचा त्यांना धोका सतावत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर कोरियाने बायडेन यांची संभावना शेलक्‍या शब्दांत केली होती. किम जोंग उन यांचे ट्रम्पसमवेतचे फोटोसेशन जगजाहीर आहे. आता त्यांना सावध पावले टाकावी लागतील. किम यांच्या भेटीआधी उत्तर कोरियाने अण्वस्त्र कार्यक्रम थांबविला पाहिजे, असे बायडेन यांनी म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत इतक्‍यात चर्चा अशक्‍य आहे.

रशिया अमेरिकेसाठी मोठा धोका आहे, असे बायडेन यांनी आधी म्हटले होते. त्यांचा हा आवाज क्रेमलिनने नक्कीच गांभीर्याने ऐकला असेल. व्लादिमीर पुतीन यांची राजवट रशियासाठी चांगली नाही, असेच बायडेन यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे बायडेन यांची निवड म्हणजे अधिक निर्बंध अशीच रशियाची अटकळ आहे. ट्रम्प राजवट विसरून रशिया पुढे जाऊ पाहत असली, तरी या देशांतील संबंध सुरळीत राहतील, याची शक्‍यता कमी आहे. बायडेन यांच्या विजयाचा सर्वाधिक आनंद झालाय तो इराणला. त्यांच्या राजवटीने अनेक निर्बंध सैल होतील, अशी आशा लाखो इराणवासीयांना वाटत आहे. अमेरिका आता त्वरित चर्चेच्या टेबलावर तरी येईल, यात शंका नाही.

हॅरिस यांची निवड महत्त्वाची
बायडेन यांच्या निवडीमुळे अमेरिका व भारताचे संबंध कसे राहतील, यावर ‘टाइम’ने विस्तृत विवेचन केले आहे. त्यानुसार ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिगत मैत्री दृढ झाली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या प्रचारासाठी वेगळ्या प्रकारे हातभार लावला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये कार्यक्रम केले होते. ट्रम्प याच्या कारकिर्दीत तीन महत्त्वाचे करारही झाले. आता ट्रम्प पराभूत झाले असले, तरी जागतिक स्तरावर लोकशाही देशांना एकत्र आणण्याचे बायडेन तसेच दहशतवादप्रश्नी भारताबरोबर राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बायडेन यांचे धोरण भारतस्नेही राहील, अशी शक्‍यता आहे. 

त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपाध्यक्षपदी झालेली कमला हॅरिस यांची निवड. भारतात आजोळ असलेल्या हॅरिस यांचा अमेरिकेतील भारतीयांशी निकटचा संबंध आहे. अमेरिकेतील स्थलांतरितांमध्ये भारतीय समुदायाची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षासाठी मोठा निधीही संकलित केला होता. त्यांच्या माध्यमातून भारताचे प्रश्न सहज त्यांच्यापुढे उपस्थित केले जाऊ शकतात. हॅरिस यांचे भारताशी निकटचे नाते असून, येथील प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे हॅरिस यांची निवड भारताला लाभदायक ठरेल. भारतीयांसाठी आस्थेचा विषय म्हणजे एच-वन बी व्हिसा. अमेरिका दरवर्षी साधारणपणे ८५ हजार एच-वन बी व्हिसा जारी करते; त्यातील ७५ टक्के वाटा एकट्या भारताचा असतो. ट्रम्प यांनी व्हिसाची लॉटरी पद्धत बंद केल्याने भारताला मोठा फटका बसला आहे. हे व्हिसा धोरण बदलण्याचे आश्वासन बायडेन यांनी दिले आहे. त्याकडे भारतीय आयटी कंपन्यांचे लक्ष असेल.

जागतिक पुनर्प्रवेशाची शक्‍यता
‘अल जझीरा’ने बायडेन यांचा जागतिक मानावाधिकार संस्थांबाबतचा दृष्टिकोन कसा राहील, याबाबत विश्‍लेषण केले आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांनी जागतिक संस्थांशी नाते तसेच करार तोडण्यात कसलाही मुलाहिजा ठेवला नाही. बायडेन हे ट्रम्प यांचे अनेक निर्णय फिरवतील. पॅरिस हवामान करार, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध स्थापित करेल, असे बायडेन यांनी सूचित केले आहे. जगासाठी ही आश्वासक बाब असेल.

जागतिक मानवाधिकार संघटनेतही ते सहभागी होतील. इराण, लिबिया, सोमालियासारख्या अनेक मुस्लिमबहुल देशांवर घातलेले प्रवासी निर्बंधही ते मागे घेतील. ‘अमेरिका फर्स्ट’ हे ट्रम्प यांचे धोरण बहुआयामी धोरणाला छेद देणारे होते. त्यातून अमेरिका व जगाचेही नुकसान झाले. बायडेन यातून नक्कीच सुवर्णमध्य काढतील. त्याचा जगाला निश्‍चित लाभ होईल. ट्रम्प यांच्या एकांगी निर्णयाचा साऱ्या जगाला तोटा होत होता. त्यातून आता सुटका होणार आहे.

थोडक्‍यात, बायडेन यांच्या नव्या धोरणांकडे सारे जग डोळे लावून बसले आहे. सारे देश त्यांच्याकडे आपापल्या चष्म्यातून पाहत आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या निवडीने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर साऱ्या जगात कमी-अधिक बदल घडणार आहेत.

पडसाद बायडेन निवडीचे

  • कम्युनिस्ट चीन, उत्तर कोरियाला हवे होते - ट्रम्प
  • रशिया अमेरिकेसाठी धोकादायक - बायडेन
  • चर्चेने तोडग्याच्या आशेने इराण सुखावला
  • एच-वन बी व्हिसाबाबत भारताच्या आशा पल्लवित
  • मानवाधिकार, हवामानविषयक बाबींना चालना शक्‍य

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT