sampadkiy
sampadkiy  sakal
संपादकीय

पेरले ते फोफावले…

सकाळ वृत्तसेवा

दहशतवादी शक्तींना यशस्वीरीत्या तोंड देण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे लोकशाही सुदृढ करणे.

बेनझीर भुट्टो

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान

भरल्या घरातल्या दिवट्या पोराने व्यसनाधीनतेपायी अवघे घर फुंकून दिवाळे वाजवावे, तसे काहीसे शेजारच्या पाकिस्तानचे झाले आहे. नको त्या गोष्टींच्या मागे लागून या देशातील सत्ताधाऱ्यांनी आर्थिक घडी, सामाजिक सुरक्षितता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा याकडे सरसकट दुर्लक्ष करून आज संपूर्ण देश महासंकटात लोटला आहे. हे संकट दुहेरी आहे. पाकिस्तानची आर्थिक घडी तर पूर्णत: विस्कटली आहेच;

पण हिंसाचारानेही तेथील काही भागातील जीवनमान अगतिक झाले आहे. हिंसाचार कुठल्याही देशातला असो, त्याचे समर्थन करता येत नाही. अगदी शत्रूराष्ट्रातील निरपराध नागरिक हिंसाचाराचे बळी ठरत असतील तरी ते निषेधार्हच मानले पाहिजे. गेले काही महिने शेजारील पाकिस्तानात जे स्फोट होत आहेत, आणि त्यात निरपराध नागरिक मारले जात आहेत, ते पाहता, अराजकाच्या खाईच्या टोकाशी पोचलेला हा देश आपल्या नागरिकांना आणखी काय काय भोगायला लावणार आहे, असा प्रश्न पडतो.

अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरील खबर पख्तुनख्वा इलाख्यातील डेरा इस्माइल खान या गावात भर वस्तीत बॉम्बस्फोट घडून शुक्रवारी पाच नागरिक प्राणांस मुकले, आणि पन्नासाहून घायाळ झाले. त्याच्या काही तासच आधी बलुचिस्तानातील ग्वादार या बंदरात आत्मघातकी दहशतवाद्यांनी लागोपाठ दोन स्फोट घडवून आणत १४ सैनिकांसह अनेक नागरिकांचे प्राण घेतले. आणखी एका हल्ल्यात दहशतवाद्यांनी मियांवाली येथील हवाई दलाच्या तळावरच चढाई करून काही विमानांचे अपरिमित नुकसान केले,

आणि एक पाकिस्तानचा सैनिकही कामी आला. परवाचा शुक्रवार हा पाकिस्तानातील एक ‘रक्तलांछित शुक्रवार’ होता, असे ‘डॉन’ या तेथील वृत्तपत्राने म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी ‘तहरिके तालिबान पाकिस्तान’ या संघटनेने बव्हंशी स्वीकारली असली, तरी पाकिस्तानात अशा कारवाया करणारी ही एकमेव कडवी संघटना नाही. ज्या खैबर पख्तुनख्वा इलाख्यात हिंसाचाराचा उगम दिसून येतो, तो भाग म्हणजे दहशतवाद्यांचे पाळणाघर मानला जातो. तेथील भागावर कुठल्याच सरकारचा कारभार चालत नाही.

ना अफगाणिस्तानचा, ना पाकिस्तानचा. अनेक बंदूकबाज टोळ्यांची सद्दी असलेल्या या भूभागात जागतिक यादीतले अनेक दहशतवादी आश्रय घेतात. ‘इस्लामिक स्टेट-खोरासान’ नावाची आणखीही एक कडवी संघटना येथे कार्यरत आहे. यापैकी अनेक संघटनांना पाकिस्तान सरकारनेच वर्षानुवर्षे पोसले होते. हे सारे पाकिस्ताननेच एकेकाळी पेरले, ते आता फोफावून त्याच देशाला गिळू पाहात आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने नवी राजवट सुरु केली. अमेरिकी सैन्याने चंबुगबाळे भराभर आवरले, त्या घाईत अनेक स्वयंचलित बंदुका, तोफगाडे, रणगाडे, छोटी क्षेपणास्त्रे, दारुगोळा अशी सामग्री मागेच सोडून दिली. तालिबानी दहशतवाद्यांच्या हाताला तीच सामग्री लागली असून पाकिस्तानी सुरक्षा दलांपेक्षाही हे दहशतवादी अधिक आधुनिक शस्त्रास्त्रे बाळगून आहेत, असे म्हटले जाते. या माहितीत तथ्य असेल तर पाकिस्तानसाठी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे, असे म्हणावे लागेल.

त्यातच अफगणिस्तानलगतच्या सीमाभागातून येऊन पाकिस्तानात वास्तव्याला असलेल्या शेकडो लोकांना पाकिस्तान सरकार आता हुसकावून लावत आहे. याची प्रतिक्रियाही हिंसक मार्गांनी उमटते आहे. गेल्या नऊ महिन्यांत दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानात तब्बल ११०० हून अधिक लोकांचे प्राण गेले. त्यापैकी ३८६ तर सुरक्षा दलांचे सैनिक आहेत. गेल्या तीन महिन्यात तेथे घातपाती कारवायांमध्ये ५७ टक्के वाढ झाल्याचे पाकिस्तानची सरकारी आकडेवारीच सांगते.

विशेष म्हणजे यापैकी ९२ टक्के घातपात खैबर पख्तुनख्वाच्या अफगाणी सरहद्दीच्या भागातच घडले. एकीकडे आपणच दहशतवादाचा बळी आहोत, असा कांगावा करायचा, आणि दुसरीकडे हीच विषारी पिलावळ पोसत बसायचे, असा दुटप्पीपणा पाकिस्तानने वर्षानुवर्षे केला. पाकिस्तानच्या या दहशतवादीधार्जिणेपणाची सर्वाधिक किंमत भारताला मोजावी लागली. भारतद्वेषावर आधारलेले राष्ट्रीय धोरण अखेर अंगलट येत आहे. तेथे मधल्या काळात विकास, अर्थव्यवस्थेची घडी बसवणे वगैरे गोष्टी दुय्यम ठरल्या.

आज पाकिस्तान अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे आणि सदोदित लष्कराच्या कह्यात असलेले सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. चीनच्या मदतीने जी काही विकासकामे सुरू होती, तीदेखील रखडली आहेत. डबघाईला आलेल्या या ‘मित्रदेशाला’ मदतीचा हात चीनने आखडता घेतला असून अन्यत्र अर्थसाह्य मिळणे कठीण बनले आहे. दहशतवादाला पोसता पोसता राज्यकारभारावरचे लक्ष उडाले की अशी अवस्था होणारच.

शस्त्रास्त्रे आणि पाठबळानिशी प्रबळ होत जाणाऱ्या दहशतवादी संघटना ही पाकिस्तानसाठी निश्चितच डोकेदुखी बनली आहे, पण हे ओढवून घेतलेले आजारपण आहे. पाकिस्तानच्या धोरणकर्त्यानी आता दहशतवादीविरोधी लढ्याचे स्वरूप बदलावे, आणि अस्थिर भागात प्रबोधन,

शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा, असा सूर पाकिस्तानातील काही वैचारिकांनी लावल्याचे दिसते. पण आता फार उशीर झाला आहे. दहशतवादाच्या दुर्धर आजाराने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे, हे सत्य स्वीकारायला हवे. सत्ताधाऱ्यांच्या ऱ्हस्वदृष्टीची किंमत अंतिमत: जनतेला भोगावी लागते, याचे हे जागतिक पातळीवरचे ढळढळीत उदाहरण ठरावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT