Dhing Tang
Dhing Tang  
संपादकीय

मध्यावधी? (एक गोपनीय पत्रापत्री) ढिंग टांग! 

ब्रिटिश नंदी

मध्यावधी निवडणुका होणार, अशी आवई उठल्याने आम्ही हैराण झालो होतो. एकापाठोपाठ विलेक्‍शने आल्याने शिळक आला होता. त्यात मध्यावधी येणार, अशी धमकी मिळाल्याने चेव आला. सबब, ह्या संदर्भात अधिक सखोल पत्रकारिता केल्यानंतर आमच्या हाती एक-दोन गोपनीय पत्रे लागली. ती येथे देत आहो. वाचा : 
प्रिय नाना, अनेक उत्तम आशीर्वाद. इलेक्‍शनच्या प्रचाराले तुम्ही हेलिकॉप्टरने फिरून ऱ्हायले, पण मी इथे गडकरीवाड्यावर बसून ऱ्हायलो आहो. आपल्या लोकांनी इतका उधम मचवला आहे की दिल्लीले जाऊ तं कधी जाऊ, अशी अवस्था येऊन गेली. जाऊ दे. मध्यावधी निवडणुका येऊन ऱ्हायल्या असे ऐकून ऱ्हायलो आहे. काय भानगड आहे? तत्काळ खुलासा करावा. आपले कमळाध्यक्ष शहंशाह अमित शहा ह्यांनी काल घाबऱ्याघुबऱ्या फोन केला होता. पहिले धा मिंटं गुजरातीतच बोलत होते. आता नागपुरी माणसाले गुजराती काय कळते? मी आपला "हं हं' करत होतो. मध्यावधी झाल्या तं महाग पडंन, काहीही करा, पण मध्यावधी नको, असं ते म्हणून ऱ्हायले होते. काय करता ते करा आणि कळवा बरं मले. मी फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे. पत्रच धाडून द्या. तुमचा गुरू. नितीनभू. 
* * * 
आदरणीय गडकरीमास्तर ह्यांस, शतप्रतिशत प्रणाम. मध्यावधी निवडणुकांबद्दल मीदेखील काल-परवाच ऐकले. अचानक मला आपले आशिषभाऊ शेलारमामा ह्यांचा फोन आला. "मध्यावधी होणार आहे का?' असे ते विचारत होते. मी विचारले, ""आता मध्येच कुठे मध्यावधी?'' तर ते म्हणाले, ""मध्यावधी मध्येच कुठे तरी होते. किंबहुना, मध्येच होणाऱ्या निवडणुकीलाच मध्यावधी असे म्हंटात!'' मी बुचकळ्यात पडलो. सगळे छान चाललेले असताना मध्येच हे मध्यावधी निवडणुकांचे कुठून उपटले? 
पण परवा मंत्रालय परिसरातून जाताना आपले जळगावचे एकनाथभू खडसेजी भेटले. समोरून चालत येत होते. झोटिंग कमिटीच्या चौकशीला मुंबईत आलोय, असे म्हणाले. झोटिंग कमिटीसमोरची चौकशी!! त्यांची अवस्था बिकट असणार, हे मी ओळखले. केवळ भूतदयेने "चला, चहा कटिंग घेऊ या' असे मी सहज सलगीने म्हटले. तर भिवया वर करून बोट नाचवत म्हणाले, ""आम्हाले नै लागत तुमचं चहाकटिंग! हूट!! तुम्हाले अस्संच पाह्यजेल. घ्या आता मध्यावधी उरावर! आम्हाले घरचा रस्ता दाखवता नं...भोगा आता आपल्या कर्माची फडं!'' 
...मी गंभीर झालो आहे. मनाशी म्हटले, हे काय चालले आहे? माहिती घेतली पाहिजे. विनोदवीर तावडेजींकडे आडून आडून चौकशी केली. त्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले. ह्या माणसाचे काही कळत नाही. हा मनुष्य आपल्या पार्टीत आहे की नाही? शेवटी शेलारमामांनाच गाठले. विचारले, ""हे मध्यावधीचे कुठून काढले?'' ते म्हणाले, ""आपले बारामतीकरकाका आहेत ना, त्यांचं भाकित आहे!'' बारामतीकरकाकांच्या मते मुंबई-पुण्याच्या निवडणुका झाल्या की आमचे सरकार पडणार आणि मध्यावधी येणार!! पोटात गोळा आला आहे. काय करावे? तुम्हीच सांगा. माझाही फोन स्विच ऑफ ठेवला आहे. पत्रच पाठवा. सदैव आपलाच. नाना. 
* * * 
प्रिय शिष्य नानाजी, अ. उ. आ. पत्र मिळून गेले. काळजीचे कारण नाही. शेतीतज्ज्ञ बारामतीकरकाका आपले मित्र आहेत. (माझेही मित्र आहेत!!) बारामतीकरकाकांना मी फोन केला होता. "मध्यावधीचं मध्येच काय काढून दिलं तुम्ही साहेब?' असं मी विचारलं. तर ते म्हणाले, "मध्यावधी निवडणुका होणार, असं तं मी दीड वर्षांपूर्वीच बोल्लो होतो जी!'' घ्या!! म्हंजे शिळी बातमीच तं आहे नं ही? शिवाय "मध्यावधी निवडणुका होणार' हे त्यांचं भाकित नाही. तो इशारा आहे. तोसुद्धा आपल्याले नाही. श्रीनमोजीहुकूम ह्यांना आहे!! त्याचं आपल्याले काय टेन्शन? तेव्हा डोण्ट वरी. बी हॅप्पी. 
तुमचाच. नितीनभू. 
ता. क. : आपला फोन आता स्विच ऑन आहे!! ब्याटरी फुल्ल!! पत्र पाठवू नये. फोन करावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT