missing childrens found in amazon forest sakal
संपादकीय

माहात्म्य परिसर अभ्यासाचे

अमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेल्या चार मुलांचा शोध घेण्यात तपासपथकांना चाळीस दिवसांनी यश आले.

डॉ. नानासाहेब थोरात saptrang@esakal.com

अमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेल्या चार मुलांचा शोध घेण्यात तपासपथकांना चाळीस दिवसांनी यश आले. त्याहूनही आश्‍चर्याची बाब म्हणजे खडतर आणि आव्हानात्मक वातावरणाशी झगडून जगण्यात ती यशस्वी झाली होती. त्यांच्याशी केलेल्या चर्चेअंती त्यांना दिलेल्या मूलभूत शिक्षण आणि परिसराचे पुरते आकलन यामुळे ती तग धरू शकली, हेच लक्षात आले.

काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेने ट्रेकिंगला जाणाऱ्या हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतले. या घटनेच्या मुळाशी जाण्यापूर्वी जगाच्या दुसऱ्या टोकावर घडलेल्या अजून एका घटनेकडे जाऊया! दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि कोलंबिया या देशांच्या सीमेवरील अमेझॉनच्या घनदाट जंगलात १ मे २०२३ रोजी छोट्या विमानाचे इंजिन खराब झाल्यामुळे ते कोसळले. वैमानिकाचा मृत्यू झाला.

त्याच्याबरोबरच एका कोलंबियन महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह सापडला. मात्र विमानामधील चार मुलं बेपत्ता होती; ती त्या महिलेची होती. यामधील सर्वात मोठ्या मुलीचे वय तेरा होते, मधल्या दोघांचे वय नऊ आणि चार, तर सर्वात लहान मूल मात्र फक्त एका वर्षाचं होतं.

कोलंबियन सरकारने सुमारे सोळाशे चौरस किलोमीटरच्या जंगलात त्या मुलांना शोधण्यासाठी मोहीम राबवली. शंभरवर खास कार्यदलाचे सैनिक, सत्तरपेक्षा अधिक स्थानिक आदिवासी आणि दहा प्रशिक्षित श्वान यांच्या सहाय्याने एका-दोन नाहीतर चाळीस दिवस हे बचाव आणि शोध कार्य चालू होते.

चाळीसाव्या दिवशी विमान कोसळलेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटरवर ही मुलं सापडली. आश्यर्य म्हणजे सलग चाळीस दिवस मुसळधार कोसळणारा पाऊस, दाट धुके आणि जोरदार वारा यामध्ये हे बचावकार्य अखंडपणे चालू होते.

ज्या दिवशी कोलंबियन सरकारने जाहीर केले की ही मुलं सुखरूप आहेत, त्या दिवशी जगातील अनेक जंगल सफारी करणाऱ्या लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हे कसं शक्य आहे? मोठ्या मुलीचे आणि इतर दोन मुलांचे समजू शकतो, पण वर्षाचा मुलगा घनदाट जंगलात वाऱ्या-पावसात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत एक-दोन नाहीतर चाळीस कसा काय जिवंत राहू शकतो? या प्रश्नाचे उत्तर दडलंय ते मोठ्या मुलीला दिलेल्या मूलभूत शिक्षणामध्ये.

लेसी, वय वर्षे तेरा, अमेझॉनच्या जंगलातील हुइटोटो जमातीतील मुलगी. सुमारे चाळीस दिवस तिने फक्त स्वतःचीच नाही तर इतर तिघांची अतिशय खडतर परिस्थितीत जगण्याची इच्छाशक्ती कायम ठेवण्यात यश मिळवले. एवढेच नाही तर छोट्या एका वर्षाच्या मुलालाही खडतर परिस्थितीत जिवंत ठेवण्यात यशस्वी झाली. यामागे तीन कारणं होती.

मोठ्या मुलीची जगण्याची इचछाशक्ती पराकोटीची उच्च होती. दुसरं म्हणजे ती मुलं स्थानिक होती. त्यांची स्थानिक वातावरणाशी मिळतीजुळती प्रतिकारशक्ती होती. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना जंगल माहिती होते.

जंगल म्हणजे घनदाट झाडी आणि पायवाटा नाही. जंगल म्हणजे हजारो प्रकारची झाडे-झुडपे, त्यामध्ये राहणाऱ्या किडामुंगीपासून, विषारी अजगरापर्यंत असणारे जीव, छोट्या झऱ्यापासून अमेझॉनसारखी महाकाय नदी. हजारो झाडांना येणारी उपयुक्त आणि विषारी फळे, जंगल म्हणजे बरेच काही असते. यातील बरेच काही त्या मोठ्या मुलीला माहीत होते.

कारण ज्या ठिकाणी आपण राहतो तेथील मूलभूत शिक्षण तिला दिले होते, त्या शिक्षणाचा आणि प्रशिक्षणाचा योग्य वापर करून तिने इतर तिघांना चाळीस दिवस जिवंत ठेवले होते. दुर्दैवाने त्यांची आई मात्र दुर्घटनेतच गेली. तिचा मृतदेह दिवसात सापडला होता, मात्र या चार जिवंत जीवांना शोधण्यासाठी चाळीस दिवस लागले.

गरज मूलभूत शिक्षणाची

संपूर्ण आयुष्य पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या मुलाला आणि गडचिरोली, मेळघाट-पालघरच्या आदिवासी मुलाला एकसारखेच पुस्तकी शिक्षण कसे काय? वर्षातील खच्चून एक-दोन आठवडे पाऊस पाहणारा मराठवाड्यातील विद्यार्थी आणि सलग तीन-चार महिने पावसात शाळेत जाणारा कोकणातील विद्यार्थी यांच्या परिस्थितीत जमीन-आस्मानाचा फरक आहे.

मग त्यांच्या मूलभूत शिक्षणात का नाही? समुद्रसपाटीपासून खाली असणाऱ्या नेदरलँडमध्ये प्रत्येक लहान मुलाला नदीत आणि समुद्रात पोहायला शिकवणे बंधनकारक आहे. तसे आमच्या कोकण, मुंबई, कोल्हापूर आणि गडचिरोली भागातील मुलांना का नाही? कोकणातील किती मुलांना वेगवान नदीच्या पाण्यात पोहता येते.

कोल्हापूर-सांगलीच्या मुलांना किती दिवस पुराच्या पाण्यात राहता येते? आपण जिथे लहानाचे मोठे होतो तिथल्या भौगोलिक परिस्थितीची, वातावरणाची कितपत माहिती आपल्याला आणि आपल्या मुलांना असते? एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती कितपत हस्तांतरित होते? जगण्यासाठी या सारख्या अनेक मूलभूत गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, हे आपण पालक म्हणून मुलांना शिकवतो का? निश्चितच नाही.

कोवळ्या जीवांना उन्हाळी सुट्टीत डान्सपासून कॉम्प्युटर कोडिंगच्या क्लासेसला पाठवणाऱ्या पालकांना का वाटत नाही की, माझ्या मुलाला विहिरीत, नदीत पोहता आले पाहिजे. त्याला झाडावर चढता आले पाहिजे. ऊन-वाऱ्यात खेळता आलं पाहिजे. पावसात भिजता आलं पाहिजे आणि बदलणाऱ्या निसर्गाशी एकरुप होता आलं पाहिजे.

मूलभूत शिक्षणाच्या जोरावर तेरा वर्षांची लेसी आपल्याबरोबरच तीन लहानग्यांना चाळीस दिवस वारा, पाऊस आणि थंडीत जिवंत ठेवू शकली. कदाचित जंगल, डोंगर दऱ्यांचे हेच मूलभूत ज्ञान आम्हाला असते तर आजपर्यंत आपल्यामधूनही अशा हजारो लेसी तयार झाल्या असत्या!

(लेखक विज्ञान संशोधक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT