Khayyam
Khayyam 
संपादकीय

अग्रलेख : अभिजाताचा अंत:स्वर

सकाळ वृत्तसेवा

खय्याम यांनी संगीत दिलेली गीते केवळ त्या दशकातील पिढीच्या नव्हे, तर आजच्या युवकांच्याही ओठावर असणे, यापेक्षा दुसरा सन्मान काय असू शकतो?

दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा महंमद जहूर आशमी नावाचा एक युवक सैन्यात होता. काही काळ रणभूमीवरचे तोफा-बंदुकांचे संगीत त्याने ऐकलेही! मात्र, तेव्हा संगीताचे बालपणापासून संस्कार झालेला हा युवक पुढची पाच दशके आपल्या सुरेल ‘मेलडी’ची मोहिनी अवघ्या भारतवर्षांवर घालणार आहे, असे त्या वेळी कोणाला वाटले नसेल. मात्र, काळाचा महिमा म्हणतात तो हाच! सैन्यात अगदी थोडा काळ काढून तो युवक संगीतकार बनण्याचे आपले स्वप्न उरी बाळगत मुंबईत दाखल झाला. तेथे बाबा चिस्ती नावाच्या एका संगीतकाराकडे त्याने चित्रपट संगीताचे पहिलेवाहिले धडे गिरवले. हे बाबा चिस्ती आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताबद्दल प्रसिद्ध होते; पण या महंमद जहूर आशमीने त्या ठेक्‍यात गुंतवून घेतले नाही, हे आपल्या सर्वांचेच नशीब. त्यामुळेच आज ‘खय्याम’ या नावाने आपल्याला सुपरिचित असलेल्या या ‘मेलडी’च्या राजाने कभी कभी, त्रिशूल, उमराव जान, बाजार, रझिया सुलतान अशा कर्णमधुर गीतांनी बहरलेले चित्रपट आपल्याला १९७० आणि ८० या दशकांत दिले. खरे तर ते १९७० चे दशक जगभरातच अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते.

बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावरचे राजेश खन्नाचे रोमॅंटिक युग संपुष्टात आले होते आणि ‘जंजीर’ या चित्रपटामुळे अमिताभ बच्चनही ‘अँग्री यंग मॅन’च्या रूपात आपल्यापुढे उभा ठाकू पाहत होता. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शंकर-जयकिशन यांच्यासारखे ‘मेलडी’ आणि ‘हार्मनी’ याबद्दल प्रसिद्ध असलेले संगीतकारही त्या आधीच्या दशकातच ‘याहूं...’ अशी किंचाळ्या फोडणारी गीते देऊ पाहत होते. तरीही खय्याम यांनी ‘कभी कभी’ या चित्रपटातून सहजगत्या गुणगुणत्या येतील, अशा कर्णमधुर गीतांचा खजिनाच आपल्याला पेश केला. ही गीते अमिताभनेच पडद्यावर आपल्यासाठी जिवंत केली. संगीताचे हे धडे खय्याम यांनी वयाच्या १०-१५ वर्षांचे असतानाच आणि दिल्लीत आपल्या काकांकडे राहत असताना, पंडित अमरनाथ यांच्याकडे शास्त्रीय संगीताची सरगम आत्मसात करत घेतले होते. त्यामुळेच खय्याम आपल्याला अजरामर अशी आणि मुख्य म्हणजे स्वत:ची लखलखती मोहोर उमटवाणारी आणि तत्कालीन संगीत प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी गाणी आपल्याला देऊन गेले.

खरे तर गेली जवळपास दोन दशके खय्याम हे आजच्या ठाण-ठणाण संगीताच्या दुनियेपासून दूरच होते. तरीही त्यांची गीते केवळ त्या दशकातील पिढीच्या नव्हे, तर आजच्या युवक पिढीच्याही ओठावर असणे, यापेक्षा या महान संगीतकाराला दुसरा मानाचा मुजरा तो कोणता? काळ बदलत गेला आणि त्यानुरूप भारतीय चित्रपट संगीतही वेगवेगळ्या वाटेने जात राहिले.

खरे म्हणजे १९५० आणि ६०ची ती दोन दशके ही सर्वार्थाने राज कपूर-दिलीप कुमार आणि देव आनंद या त्रिमूर्तींची होती आणि शंकर-जयकिशन, नौशाद आणि सचिनदेव बर्मन असे त्यांचे संगीतकारही ठरलेले असत. त्या काळात संगीतकार म्हणून उभे राहणे, ही फार मोठी गोष्ट होती. त्यामुळेच राज कपूरच्या भूमिकेमुळे गाजलेल्या ‘फिर सुबह होगी...’ या चित्रपटासाठी खय्याम यांच्या नावाची शिफारस झाली, तेव्हा संगीताचा कान असलेल्या राज कपूरपुढे त्यांना तानपुरा सुरात लावून दाखवावा लागला होता.

त्यानंतरच राजने त्यांच्या नावास मान्यता दिली. हा चित्रपट सामाजिक आशय असलेला होता आणि साहिर लुधियानवी यांच्यासारख्या विचारवंत शायराची गीते त्यात होती. हा योग जुळून आला आणि ‘वो सुबहा कभी तो आयेगी...’ या गीताबरोबरच ‘चीनो-अरब हमारा, हिन्दोस्ता हमारा, रहनेको घर नहीं है, सारा जहाँ हमारा...’ हे गीतही अमर होऊन गेले. आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत खय्याम यांनी अवघ्या ५४ चित्रपटांना संगीत दिले.

मात्र, आजही ‘उमराव जान’ हे नाव निघाले की रूपसुंदरी रेखा आठवण्याआधी खय्याम यांची ‘दिल चीज क्‍या है...’ आणि ‘जुस्तजू जिस की थी...’ ही गीते ओठावर रुंजी घालू लागतात.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यामुळेच ‘खय्याम यांच्या निधनामुळे एका युगाचा अस्त झाला आहे!’ अशी सार्थ प्रतिक्रिया व्यक्‍त केली आहे. खय्याम यांच्या काळातच राहुल देव बर्मन यांच्यासारखे पाश्‍चिमात्य, तसेच भारतीय सुरावटींचा मेळ घालणारे संगीतकार उदयास आले होते आणि त्यानंतर ए. आर. रेहमान तसेच विशाल भारद्वाज यांनीही हिंदी चित्रपट संगीताचा दर्जा राखण्याचे काम जरूर केले. मात्र, नंतरच्या पंजाबी ठेक्‍यामुळे हा चिरेबंदी वाडाच उद्‌ध्वस्त होऊन गेला. खरे तर खय्याम यांच्या काळातच काही बॅण्डवाल्या संगीतकारांनी कानांना त्रास द्यायला सुरवात केली होती.

मात्र, खय्याम यांनी हिंदी फिल्म संगीतातील ‘मेलडी’वरची आपली अव्यभिचारी निष्ठा कायम राखत आणि युगानुयुगे लक्षात राहील, अशी गीते अजरामर करून त्यांच्यावर मात केली. खय्याम तर गेले; पण त्यांची गीते मात्र कायम स्मरणात राहणार आहेत. त्या गीतांचे मोल अनमोल आहे, हे काळावर मात करून त्या गीतांनीच सिद्ध केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT