Mymarathi
Mymarathi 
संपादकीय

जाग्या त्याथी सवार!

सकाळवृत्तसेवा

बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडनगरीतील विस्तृत मांडवाखाली पुढले दोन दिवस मायमराठीचा उरुस सालाबादप्रमाणे यंदाही पार पडतो आहे. ग्रंथसंस्कृती रुजवण्यासाठी आत्मीयतेने पुढाकार घेणाऱ्या सयाजीराव महाराजांच्या घरअंगणात तब्बल ८० वर्षांनी मराठी सनईचौघडा झडतो आहे, ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब आहे. बडोद्यात आजवर तीन मराठी साहित्य संमेलने झाली. यंदाच्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही मराठी सारस्वताचे भवितव्य तपासून पाहणारे काही वेधक मंथन घडेल, अशी अपेक्षा आहे. कारण तेव्हापेक्षा संमेलनाचा मांडव आता विशाल झाला आहे.

सारस्वतांची संख्याही वाढली आहे. याच बडोदेनगरीत सयाजीराव महाराजांनी आग्रहाने ग्रंथछपाई आणि लेखनासाठी भरघोस बळ देऊन मऱ्हाटीला सालंकृत करण्याचा जणू संकल्प केला होता. मराठीला राजस पैठणी परिधान करण्यास उद्युक्‍त करु पाहणारी हीच बडोदेकरांची भूमी ८० वर्षांनंतर मराठी भाषेच्या वर्तमान अवस्थाही याचि देही याचि डोळां पाहणार आहे.

बडोदे आणि महाराष्ट्राचे नाते पूर्वापार आणि घट्ट आहे. किंबहुना संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात ‘गुजरातचे दूध आणि महाराष्ट्राची साखर यांचा हा संगम’ असल्याचे नमूद केले. विसंवादाचे आक्रस्ताळे सूर सभोवताली कानठळ्या बसवत असताना जोडण्याची, संयमाची नि सलोख्याची भाषा सुखावणारी आहे. पण ती भावना बळकट होण्यासाठी सक्रिय प्रयत्न व्हावेत; किंबहुना सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची ती जबाबदारीच आहे. नमेचि येतो... या न्यायाने संमेलनाच्या निमित्ताने साहित्यबाह्य विषयांनी माय मराठीचा आखाडा या वेळीही रंगला. ‘नको नको’ म्हणत अर्धाडझन पुढारी मंडळी नेहेमीप्रमाणे मांडवात चमकलीदेखील. पुढच्या दोन दिवसांतही सारे यथासांग होईल, ते थेट पुढील संमेलनापर्यंत. मधल्या काळात नेमके काय होते, हा मराठी भाषेला पडलेला सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेऊन मराठी भाषकांनी भाषा-संस्कृतीच्या प्रश्‍नावर वर्षभर काही उपक्रम केले, तर त्यातून काही निष्पन्न होईल. तसा विचार या संमेलनाच्या निमित्ताने व्हावा.

तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात अगदी खोलवर प्रवेश केला आहे, त्या वेगाशी जुळवून घेत मराठीचे पाऊल पुढे पडू शकते. भाषेचा ज्ञानव्यवहाराशी, रोजगाराशी, रोजच्या व्याप-तापांशी संबंध जेवढा घट्ट तेवढा त्या भाषक संस्कृतीचा उत्कर्ष होण्याची शक्‍यता अधिक. त्यामुळेच ‘अभिजातते’चे कोंदण लाभले, तरी भाषेसाठीच्या अशा सर्वांगीण अशा सामूहिक प्रयत्नांतूनच त्याला खरा अर्थ प्राप्त होणार आहे. हे खरे, की यातले बहुतेक प्रश्‍न निखळ साहित्याच्या पलीकडे जाणारे आहेत. परंतु, भाषा टिकणे आणि वर्धिष्णू होणे, हा साहित्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्‍न नव्हे काय? दुसरा मुद्दा म्हणजे साहित्याच्या कक्षाही काळानुसार खूप रुंदावल्या आहेत आणि नवे विषय साहित्याच्या प्रांगणात प्रविष्ट होत आहेत. या बदलाचे पडसादही साहित्याच्या क्षेत्रात आणि संमेलनात पडणार हे उघड आहे. त्यामुळेच संमेलनाध्यक्षांच्या भाषणात राजकीय-सामाजिक वर्तमानाचे संदर्भ आले आणि आपली सर्वधर्मसमभावाची, सामंजस्याचे पूल बांधण्याची भूमिका त्यांनी विशद केली, हे बरे झाले. मुळात लेखक अस्वस्थ वर्तमानाविषयी लिहितो, तेव्हा ते ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ असतेच, हाही त्यांचा मुद्दा महत्त्वाचा.संमेलनांवर टीकेची झोड उठवणाऱ्यांना देशमुख यांनी साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्याच उद्‌गारांचा दाखला देत उत्तर दिले.

‘...ही भाषेची उपासना आहे. उपासनेचे अखंड व्रत म्हणून संमेलने भरविलीच पाहिजेत.’ सरकारचा मराठी भाषा विभाग आणि साहित्य महामंडळ यांच्यामधला दुवा बनण्याचे कार्य करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्‍त केली. या दोहोंमधला संवादाचा पूल त्यांना बांधावयाचा आहे. विचार उदात्त आहे. पण कर्म म्हणाल तर अतिकठीण! कारण पूल कितीही भक्‍कम असला तरी त्याची सारी मदार असते ती दुथडीच्या काठांवरच. तरीही आता उशीर झाला, असा नकारात्मक सूर लावण्याचे कारण नाही. ‘जाग्या त्याथी सवार’ किंवा ‘जाग येईल तीच पहाट’ अशी बडोदेकरांच्या भाषेतली म्हण आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT