संपादकीय

औद्योगिक विकासाला गती

दयानंद माने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात फार मोठ्या घोषणा पंतप्रधानांनी केल्या नसल्या, तरी या ‘ऑरिक’मुळे भविष्यातील मराठवाड्याच्या प्रगतीचे दरवाजे खुले झाल्याच्या प्रतिक्रिया उद्योजकांकडून व्यक्त होत आहेत. पंतप्रधानांनी या वेळी मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही गोष्टींचा ऊहापोह केला.

‘मराठवाडा वॉटर ग्रिड’मध्ये मोठा लाभार्थी असेल, प्रत्येक गावापर्यंत पिण्याचे व सिंचनाचे पाणी पोचेल, तसेच मराठवाड्यात या शहराची उभारणी लाखो हातांना काम देणारी असेल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भविष्यात औरंगाबाद, जालना ही शहरे ‘औद्योगिक मॅग्नेट’ असतील, असे सूतोवाच केले. 

मराठवाड्याचा थेट ‘जेएनपीटी’शी संपर्क 
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व पहिले पाटबंधारेमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे जायकवाडी धरण झाले. पाण्याच्या या खात्रीमुळे शेती व सिंचन व पुढे उद्योग क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण झाल्या. त्यामुळेच औरंगाबाद व जालना परिसरात काही उद्योगधंदे येऊ शकले. आता ‘दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर’ अर्थात ‘डीएमआयसी’ व नव्याने सुरू झालेल्या ‘ऑरिक’मुळे मराठवाड्याच्या विकासाची चांगली संधी निर्माण झाली आहे. तत्कालीन केंद्र व राज्य सरकारांनी ‘डीएमआयसी’ची कार्यकक्षा वाढवून ती औरंगाबाद व मराठवाड्यापर्यंत आणली व आताच्या सरकारने या उद्योगनगरीला प्रोत्साहन दिले. ‘डीएमआयसी’, ‘ऑरिक’ व मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा थेट मुंबई बंदरावरील ‘जेएनपीटी’शी जोडला जाणार आहे. ‘ऑरिक’ हे तब्बल दहा हजार एकरावर विस्तार पावलेले महाराष्ट्रातील एकमेव औद्योगिक क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई-पुणे परिसरात केंद्रित झालेले उद्योग आता पर्यायाने या ‘ऑरिक’मध्ये आणावे लागतील. पंतप्रधानाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याने हे क्षेत्र गुंतवणूकदार व उद्योजकांच्या नकाशावर गेले आहे. तसेच केंद्र व राज्याच्या औद्योगिक नकाशावर असल्याने राष्ट्रीय औद्योगिक धोरणांच्या निकषांवर उद्योजकांना येथे सुविधा मिळतील. ही संधी निर्माण होण्यासाठी येथील उद्योजकांनी, तसेच जमिनी देण्यासाठी शेतकरी व भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. एवढ्या मोठ्या क्षेत्राला पायाभूत सुविधांची जोड मिळाल्यास हे क्षेत्र वेगाने विकसित होऊ शकेल. 

स्टील उद्योग एकवटलेल्या जालन्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. तसेच औरंगाबाद परिसरातील शेंद्रा, वाळूज आदी औद्योगिक क्षेत्रांना ‘जेएनपीटी’शी जोडणाऱ्या लोहमार्गाची गरज आहे. देशभरात ‘ऑरिक’सारखी जी औद्योगिक शहरे उभी राहत आहेत, तीही एकमेकांशी जोडली गेली पाहिजेत. अहमदाबाद व ढोलेरोसारखी कनेक्‍टिव्हिटी औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-पुणे या शहरांदरम्यान निर्माण झाली पाहिजे. तसेच औरंगाबादच्या विमानतळाचाही उद्योगाच्या अनुषंगाने तातडीने विकास केला पाहिजे. या सुविधांच्या अंगाने काही घोषणा पंतप्रधानांच्या दौऱ्यात अपेक्षित होत्या, पण त्या झाल्या नाहीत. उद्योगांबरोबरच पर्यटन हे क्षेत्र मराठवाड्यात अजून चांगले विकसित होऊ शकते. त्यादृष्टीने औरंगाबाद शहर पर्यटन केंद्रीभूत ठरवले गेले पाहिजे. केवळ मराठवाड्याच्या राजधानीऐवजी ‘महाराष्ट्राच्या पर्यटन उद्योगांची राजधानी’ अशी ओळख निर्माण केल्यास मराठवाड्याला गतवैभव मिळू शकते. 

औरंगाबादेतील उद्योजक सुनील कीर्दक यांच्या मते मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाची मोठी संधी ‘ऑरिक’मुळे मिळाली आहे. यामुळे मराठवाड्यातील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे इथल्या जमिनीचे भाव वाढतील, तसेच इथल्या उद्योजकांनाही उद्योग थाटता येणार असल्याने त्यांचे स्थलांतर टळेल. बाहेर गेलेल्या उद्योजकांनाही पुन्हा येथे यावेसे वाटेल. किमान भविष्यातील गुंतवणूक ते येथे करू लागतील. उद्योजक, गुंतवणूकदार, तंत्रज्ञ, भूमिपुत्र यांच्यासाठी चांगली संधी यामुळे निर्माण झाली आहे. औरंगाबादला ड्रायपोर्ट झाल्यास उद्योजकांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही. एकूणच यामुळे मराठवाड्याच्या प्रगतीची दारे खुली होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT