वृक्षलागवडीदरम्यान माहिती देताना ‘वृक्षमित्र बाबूराव पेठकर. 
संपादकीय

पैशांची भिशी सोडा; ही बघा 'झाडांची भिशी'

रजनीश जोशी

वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी...

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्‍टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.

अशी आहे भिशी
सुरवातीला बारा डॉक्‍टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्‍ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्‍चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.

दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला. हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले. 

झाडांचा वाढदिवस
लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात. डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात, असं हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT