editorial-articles

अग्रलेख : छोटे मासे,मोठे मासे!

सकाळवृत्तसेवा

स्पर्धा गुणवत्तेला, नवनव्या शोधांना आणि प्रगतीला प्रोत्साहन देते. त्याचा जसा उत्पादकाला फायदा होतो, तितकाच ग्राहकालाही होतो. व्यावसायिकतेला बळ मिळते. तथापि, जोपर्यंत स्पर्धा तुल्यबळात असते, तोपर्यंतच. जेव्हा पाशवी ताकदीच्या कंपनीशी छोट्या कंपन्या स्पर्धेला उतरतात तेव्हा त्यांचा टिकाव अशक्‍य असतो. यालाच मक्तेदारी म्हणतात. ती कोणत्याही व्यवस्थेला आणि व्यवसायाला मारकच असते. सध्या अमेरिकेतल्या षोडशवर्षीय फेसबुकबाबत जे वादळ उठलंय, त्याला कारण त्याची मक्तेदारीच आहे. फेसबुकने बऱ्यापैकी स्पर्धकांना गिळून त्यांचे बोन्साय केलंय. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी २००८ मध्ये आपल्या सहकाऱ्यांना कळवले होते, ‘इटस्‌ बेटर टू बाय दॅन कॉम्पीट’. नंतरच्या काळात तेच कंपनीचे धोरण झाले. फेसबुकशी तांत्रिक आणि गुणात्मक व ग्राहकदृष्ट्या स्पर्धा करणाऱ्या ‘इन्स्टाग्राम’ला २०१२ मध्ये एक अब्ज डॉलर, तर २०१४ मध्ये ‘वॉटस्‌ॲप’ला १९ अब्ज डॉलरला खरिदले. अशा अनेक कंपन्यांना आपल्या परिवारात आणले. त्यांचे तांत्रिकदृष्ट्या पंख छाटत फेसबुकला महान केले. म्हणूनच अमेरिका आणि त्या देशातील ४८ राज्यांनी फेसबुकच्या मक्तेदारीवर एल्गाराचे मत नोंदवले आहे. ज्या फेडरल ट्रेड कमिशनने (एफटीसी) फेसबुकच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्‌ॲप खरेदीला हिरवा कंदिल दाखवला त्यानेच फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीत डोकावत, तांत्रिक शहानिशा करत विघटनाची पावले उचलावीत, इन्स्टाग्राम व व्हॉटस्‌ॲप यांना फारकत देत स्पर्धापूरक वातावरण पुन्हा निर्माण करावे, असे म्हटले आहे. या भूमिकेने लगेचच फरक होणार नसला तरी कायदेशीर प्रक्रियेचा श्रीगणेशा होवू शकतो. 

काही महिन्यांपुर्वीच तेथील काँग्रेसने फेसबुकसह गुगल, ॲपल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या मक्तेदारीवर अहवालाद्वारे बोट ठेवले होते. भांडवलदार अमेरिकेत जायंट कंपन्या आणि त्यांची मक्तेदारी, त्यातून खुरटणारी स्पर्धा हे नवे नाही. तितकेच अशा मक्तेदारीला कायदा आणि इतर मार्गाने रोखणे, विघटनाला भाग पाडून पुन्हा नव्याने व्यावसायिक स्पर्धात्मकतेचे वातावरण निर्माण होण्यासाठी पावले उचललीही आहेत. त्यातून राज्यकर्त्यात मक्तेदारीच्या बाजूने आणि विरोधात असेही मतप्रवाह आहेत. थॉमस जेफरसन, जॉन मॅडीसन, फ्रेडरिक डग्लस मक्तेदारीला विरोध करायचे. या धोरणामुळेच कदाचित १८४० मध्ये मैंने, १९१० मध्ये स्टॅंडर्ड ऑईल, १९४५ मध्ये ॲल्युमिनियम जायंट अलोका तर १९८० मध्ये एटी अँड टी यांचे विभाजन घडले. तथापि, माहिती तंत्रज्ञानात झपाट्याने जायंट बनलेल्या कंपन्यांची मक्तेदारी विचार करायला लावणारी आहे. मायक्रोसॉफ्टला आवरले नसते तर जगातल्या सगळ्या मोबाईलमध्ये अँड्रॉईडऐवजी विंडोज दिसल्या असत्या, असे विधान त्याचे सर्वेसर्वा बिल गेटस्‌ यांनी केले होते. यावरून त्यांच्या मनसुब्यांचे कल्पना येते. २०१६ची अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक, डोनाल्ड ट्रम्प यांची निवड, त्यामागे केंब्रिज ॲनालिटीकासह रशियन हात हे उघड सत्य आहे. याच केंब्रिज ॲनालिटिकाने फेसबुकचा डेटा परवानगीशिवाय घेतला होता. त्याबद्दल फेसबुकला झालेला ५ अब्ज डॉलरचा दंड त्यांच्या महसुलाच्या केवळ ९ टक्के होता. तेव्हापासून अमेरिकेतील मक्तेदारीविषयक यंत्रणांच्या दुर्बिणीखाली फेसबुक आहे. ‘बाय ऑर बरी’ असे या कंपन्यांचे व्यावसायिक सूत्र आहे. त्यानुसार व्यवसाय विस्तार साधत त्यांनी स्पर्धेला संपवलंय. जो काही व्यवसाय होऊन नफा येईल तो फक्त आपल्याच खिशात हे त्यांचे व्यावसायिक धोरण आहे. आपल्याचद्वारे इतरांनी व्यवसाय करावा, त्यासाठीच्या अटी, शर्तीदेखील त्यांच्या मर्जीनुसारच ठरतील. नाकाराल तर इतरत्र कुठेच संधी नाही, अशी त्यांची व्यवहारनिती आहे. जी मक्तेदारीला स्थापित करते. ग्राहकावर दादागिरी करते. मक्तेदारीला पर्यायाचा जर कोणी प्रयत्न केलाच तर त्याला पद्धतशीरपणे संपवते. स्वतः काही नाविण्य आणले, संशोधन केले तर तेच स्वीकारा. थोडक्‍यात, तांत्रिक आणि इतर प्रगतीच्या चाव्याही त्यांच्याच कनवटीला. लोकशाहीच्या मुल्याच्या पूर्णतः विरोधी अशीच ही भूमिका आहे. त्यामुळेच दीड-दोन वर्षे ऑस्ट्रेलियासह युरोपातील काही देशातून, तसेच भारतातूनही गुगल जर आमच्या बातम्यांवर व्यवसाय करते, तर नफ्यातही वाटा द्या, अशी मागणी रेटत आहेत. त्यामुळेच समाजमाध्यमातील फेसबुकच्या मक्तेदारीविरोधात उठलेला आवाज हा प्रातिनिधीक समजला पाहिजे. या जायंट कंपन्या अनैसर्गिक पद्धतीने निर्माण होत महाकाय मासे बनल्या आहेत. तथापि, त्यांना आवरण्यासाठी उचलली जाणारी पावले ही नैसर्गिक असावीत. त्यात साधकबाधक आणि व्यापक विचारसूत्र असावे. जेणेकरून भविष्यात असे प्रसंग फारसे येणार नाहीत. त्यासाठी वैधानिक अधिष्ठान अधिक निर्दोष हवे. असे झाले तरच नव्याने निर्माण होवू पाहणाऱ्या छोट्या कंपन्यांच्या वाढीला पूरक पर्यावरण निर्माण होवून निकोप स्पर्धेला बळ मिळेल. संशोधन, कल्पकतेला वाव मिळेल. व्यावसायिकतेला बहुआयाम मिळेल. सध्याच्या काळात डेटासंकलनाला कधी नव्हे इतके महत्त्व आहे. नजिकच्या काळातील तांत्रिक प्रगतीचा वेध घेत त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटले पाहिजे तरच देशांच्या सीमांपलीकडील या व्यवसायात निकोप स्पर्धा आणि ग्राहकहित वाढीला लागेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT