Marathi Serial Sakal
editorial-articles

अग्रलेख : ‘सीरियल’ किलर!

सध्याच्या कडक निर्बंधांच्या काळात अनेक मध्यमवर्गीय रिकामी मने घराघरात कोंडली गेली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निर्बंधांचे यथोचित पालन करुन मालिका निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु ठेवले असून गोवा-कर्नाटकसारख्या राज्यांनी त्यासाठी सहकार्यही देऊ केले आहे. थांबलेले चित्रीकरण पुन्हा सुरु व्हावे आणि रसिकांना पुन्हा एकदा जुन्या भागांचे दळण बघत वेळ घालवण्याची न येवो,

सध्याच्या कडक निर्बंधांच्या काळात अनेक मध्यमवर्गीय रिकामी मने घराघरात कोंडली गेली आहेत. बाहेरचे वातावरण विषाणूच्या कहाराने नासून गेलेले, आणि घरात अंगावर येणारी ही कुंठितावस्था. बातम्या पहाव्यात, तर सर्वत्र हृदय पिळवटून टाकणारी मरणचित्रे, महासाथीच्या थैमानाची आकडेवारी आणि त्याबद्दलचे राजकारण असलेच काहीबाही दिसत राहाते. इच्छा नसली तरी तेच पाहावे लागते. वर्तमान हे असे पिंजऱ्यातल्या पाखरासारखे अस्वस्थ, आणि भविष्यातला अंधार तर चिंतेत भरच घालणारा. विशेषत: बुजुर्गांची अवस्था तर अगदीच कोंडीत पकडल्यासारखी. साधे पाय मोकळे करायला बाहेर पडायची सोय नाही, आणि घरात बसल्याबसल्या काही करावे, तर तेवढी ताकद गात्रांमध्ये उरलेली नाही. माणसाने करायचे तरी काय? अशा वेळी पुन्हा तोच टीव्हीचा पडदा दोस्तासारखा साह्याला धावून येतो. मालिका किंवा रिॲलिटी कार्यक्रमांची बरसात करत बसल्या बैठकीला मैफल जमवतो. अगदीच मैफल नाही जमली तरी किमान त्याची एकतर्फी वटवट चालू राहाते. मन त्यात गुंतून पडते, वेळही जातो. आवडत्या मालिका आणि कार्यक्रमाचे शीर्षकगीत वाजू लागले की रिकाम्या मनाच्या वळचणीला बसलेली सैतानाची पिल्ले घटकाभर तरी गपगुमान होतात.असे हे महत्त्व असल्यानेच सध्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या मालिकांचे चित्रीकरण अन्य राज्यांत करावे लागत असल्याच्या घटनेची नोंद घ्यावी लागते.

या मालिका वा कार्यक्रमांच्या दर्जाविषयी वाद होऊ शकेल, पण असल्या निराशाजनक वातावरणात कितीतरी कुटुंबांना हेच कार्यक्रम मनाची उभारी देतात, हे नाकारता येणार नाही. गेल्या चौदा महिन्यातले चारेक महिने टीव्हीमालिकांची निर्मिती पूर्णत: थांबली होती, जुन्या भागांच्या पुन:प्रक्षेपणावरच रसिकांना आणि वाहिन्यांना समाधान मानावे लागत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा तेच घडले. महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू झाल्यावर बहुतेक मालिकांच्या निर्मात्यांनी चित्रीकरणासाठी शेजारचे गोवा आणि कर्नाटक राज्य गाठले. कुणी जयपूरचा रस्ता धरला. कुणी उत्तराखंडात कॅमेरे आणि कलावंत घेऊन गेले. टीव्ही मनोरंजनाचा रतीब नेहमीप्रमाणे चालू राहिला. पण कोरोना विषाणूने गोव्यातही हाहाकार उडवल्यानंतर आता तेथेही चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गोव्यातले वातावरण सर्वसामान्य झाले होते. गोव्याच्या भूमीवर पर्यटक, आणि समुद्रात मासे मायंदाळ झाले. गोमंतकातले नेहमीसारखे उत्फुल्ल वातावरण पर्यटकांना साद घालून बोलावू लागले, तेव्हाच त्या भयानक विषाणूने उत्पात माजवला. वास्तविक फक्त मराठीच नव्हे, तर डझनभर हिंदी मालिकांचे चित्रीकरणही तेथे वेगाने सुरु झाले होते. काही निर्मात्यांनी मधल्या काळात झपाट्याने चित्रीकरण करुन पुढील भागांची बेगमी करुन ठेवली, परंतु, रिअलिटी कार्यक्रमांच्या चित्रीकरणाची मात्र पंचाईत झाली.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता गोवा सरकारने आठवडाभरासाठी चित्रीकरणापासून सारे काही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी आठवडाभरच टिकणार की त्यात वाढ होणार, हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे निर्माते आणि रसिक हे दोघेही कोंडीत सापडले आहेत. अर्थात, कोरोनाचा जीवघेणा मारा चालू असताना भंपक मालिकांच्या चित्रीकरणासाठी एवढा आटापिटा करण्याचे काही अडले आहे का? असा चिंतातुर सवाल काही जणांच्या मनात डोकावणे साहजिक आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र तितकेसे सोपे नाही.

टीव्हीवरच्या मालिकांच्या किंवा रिॲलिटी कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल रोखठोक मल्लिनाथी करणे, हाही एक विरंगुळाच असतो हे खरे, पण या घटकेला हा बौद्धिक पवित्रा काही कामाचा नाही, हे लक्षात घ्यायला हवे. टीव्ही कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी हजारो शेकडो हात राबत असतात आणि या उद्योगावर हजारो जणांची पोटे भरली जात असतात. कडक निर्बंधांचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे, तसाच तो मनोरंजन उद्योगालाही बसला हे मान्य केले तरी त्याकडे निव्वळ एक गल्लाभरु उद्योग म्हणून पाहाणे ही आत्मवंचना ठरेल. गरजवंतासारखा मित्र नसतो. टीव्ही मनोरंजनाचे विश्व हे असेच गरजू मित्रासारखे आहे. त्याला आपली गरज आहे, तितकीच त्याची गरज आपल्यालाही आहे. विशेषत: कडक निर्बंधांच्या कुंठित काळात तर त्याची गरज विशेषत्वाने जाणवते. टीव्हीवरचे हे रंगारंग कार्यक्रम मराठी कुटुंबांच्या भावविश्वाचा भाग बनलेले असतात. तामीळ-तेलगू भाषांमधील मनोरंजन विश्व समृद्ध मानले जाते, म्हणून जाहिरातदारांचेही त्यांना चांगले पाठबळ मिळते. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मराठी मालिकांच्या बाजारपेठेनेही बराच मोठा पल्ला मारला आहे. एकंदर मालिका बाजारपेठेच्या चार टक्के म्हणजे सुमारे आठशे ते हजार कोटी रुपये- एवढा वाटा मराठी मालिका उचलतात, अशी जाणकारांची अटकळ आहे. मराठी मालिकांनी जोर धरल्याचा परिणाम हिंदी मालिकांवरही झाल्याचे आकडेवारी सांगते. हे अतिशय आश्वासक चित्र होते. एक नवी सृजनशील आणि तीही मराठी बाजारपेठ नव्याने उभी राहू पाहात असतानाच कोरोनाचे भीषण संकट उभे ठाकले. त्याला चिवटपणे तोंड देणे गरजेचे आहे. कडक निर्बंधांचे यथोचित पालन करुन मालिका निर्मात्यांनी आपले चित्रीकरण सुरु ठेवले, ते याच दृष्टिकोनातून. गोवा-कर्नाटकसारख्या राज्यांनी त्यासाठी सहकार्यही देऊ केले. सर्व चाचण्या, काळज्यांचे सोपस्कार करुनच ही चित्रीकरणे केली जात होती. अर्थात तरीही ही लढाई एका जीवघेण्या विषाणूशी आहे. ‘जान है तो जहान है’ हे खरेच. थांबलेले चित्रीकरण पुन्हा सुरु व्हावे. विषाणू ‘सीरियल’ किलर न ठरो! आपल्यासारख्या घरात अडकलेल्यांवर पुन्हा एकदा जुन्या भागांचे दळण बघत वेळ घालवण्याची न येवो, एवढीच अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT