Rahul Gandhi
Rahul Gandhi Sakal
editorial-articles

अग्रलेख : काँग्रेसची ‘चाल’

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाला समर्थ राजकीय पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता असतानाही कॉंग्रेस एवढी ढेपाळलेली का, या प्रश्नाला उशिरा का होईना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढून उत्तर दिले आहे.

भारतीय जनता पक्षाला समर्थ राजकीय पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता असतानाही कॉंग्रेस एवढी ढेपाळलेली का, या प्रश्नाला उशिरा का होईना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ काढून उत्तर दिले आहे. त्यांनी आपली बहुचर्चित ‘भारत जोडो यात्रा’ कन्याकुमारी येथून तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या हस्ते ‘तिरंगा’ स्वीकारून सुरू केली, त्याच मुहुर्तावर ‘आम आदमी पक्षा’चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ‘मेक इंडिया नं. १’ मोहिमेचा शुभारंभ करणे, हा योगायोग नाही. राहुल गांधी यांच्या या १२ राज्यांतून जाणाऱ्या ३५७० किलोमीटर लांबीच्या पदयात्रेचा उद्देश भाजप व संघ परिवाराच्या दुहीच्या राजकारण-समाजकारणाविरोधात जनतेला संघटित करणे, हा आहे. या यात्रेसाठी कन्याकुमारीला येण्यापूर्वीच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. शिवाय, यात्रेची पूर्वतयारी करताना राहुल यांनी विविध स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते तसेच ‘सिव्हिल सोसायटी’ म्हणून काम करणाऱ्या अनेक गटांशी संवाद साधला होता. ‘ही यात्रा म्हणजे केवळ एका पक्षाचे राजकारण नव्हे तर सध्या देशात सुरू असलेला तपास यंत्रणांचा गैरवापर तसेच विरोधी पक्षांना संपवण्याचे उद्योग यांच्या विरोधात जागृतीचा आहे,’ असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

तरीही केजरीवाल यांनी वेगळा झेंडा फडकवण्यामागील उद्देश स्पष्ट आहे. एक तर भाजपविरोधी आघाडीसमोर दुसरा पर्याय उभा करून, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे आणि त्याचवेळी आपणच प्रमुख विरोधी पक्ष आहे, असे चित्र उभे करणे, हे काम केजरीवाल करत आले आहेत. अर्थात, गुजरात तसेच हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत पुढच्या काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवूनच केजरीवाल यांनी हे डावपेच आखले आहेत. मात्र, त्यामुळे काँग्रेसच्या या ‘भारत जोडो यात्रे’वर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. ही बाब लक्षात घेऊनच, राहुल गांधी यांच्या या यात्रेवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.पण लोकसभा निवडणुकीत सलग दोनदा पराभव झाल्यानंतर का होईना काँग्रेस झडझडून काही करत आहे, अशा भावनेतूनच ‘भारत जोडो यात्रे’कडे बघावयाला हवे.

मात्र कॉंग्रेसची सध्याची ‘यात्रा’ राजकीयदृष्ट्या सफल होण्यासाठी आणखीही काही गोष्टी कराव्या लागतील. एक तर लोकांना प्रेरित करेल, असा पर्यायी कार्यक्रम तयार व्हायला हवा. भाजपला वैचारिक विरोध करावाच, पण त्याच्याच जोडीला लोकांच्या आकांक्षांना प्रतिसाद देईल, अशा कार्यक्रमासाठी प्रयत्न व्हावेत. दुसरे म्हणजे भाजपची रणनीती ओळखून त्याला शह देणारे नरेटिव्ह कसे उभे करता येईल, याचा नीट विचार व्हायला हवा. अन्यथा मोदींनी एखाद्या विषयावर पुढाकार घ्यायचा आणि कॉंग्रेसने त्याला फक्त प्रतिक्रिया द्यायची, हे चित्र पक्षाच्या दृष्टीने फारसे आश्वासक नाही. तो बदलण्याचा प्रयत्न किती प्रामाणिकपणे आणि जोमाने होतो, यावर यात्रेचे यश अवलंबून राहील.

अशा प्रकारे यात्रा काढून जनतेला संघटित करण्याचे प्रकार देशात नवे नाहीत. इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत आणि चंद्रशेखर यांच्यापासून लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत अनेकांनी जनमत तयार करण्यासाठी अशा प्रकारचे सोहळे आयोजित केले आहेत. अडवाणी यांच्या ‘सोमनाथ से अयोध्या’ या १९९० मधील रथयात्रेमुळेच देशात रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला आणि त्यातूनच दिल्लीच्या तख्ताच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पण त्यामुळे देशात प्रथमच मोठ्या प्रमाणावर हिंदू विरुद्ध मुस्लिम हे ध्रुवीकरण घडले. राहुल यांची ही ‘भारत जोडो यात्रा’ त्या दुहीवरचा उतारा ठरू शकते. बहुधा त्यामुळेच भाजपने आपले अनेक नेते राहुल यांच्या यात्रेचा प्रतिवाद करण्यासाठी मैदानात उतरवले.

एकीकडे ‘काँग्रेस हा मृत झालेला पक्ष’ , असे म्हणावयाचे असेल तर मग राहुल गांधी यांच्या यात्रेवर एवढा तिखट हल्ला चढवण्याचे कारण काय? त्याचे एक उत्तर आकड्यांत देता येते. आजही काँग्रेसला देशातील किमान १९-२० टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांतील ससेहोलपटीनंतरही दिसून आले आहे. त्या पक्षाचे राजकीय आव्हान संपलेले नाही, हे त्यावरून स्पष्ट होते. शिवाय, ‘काँग्रेस आता संपलीच!’ असा दावा केवळ भाजपच नव्हे तर देशातील काही डावे तसेच उदारमतवादीही अधून-मधून करत असतात. मग या १८-१९ टक्के मतदारांबाबत काय म्हणावयाचे? ‘भारत जोडो यात्रे’ला बऱ्यापैकी यश मिळाले आणि त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांची मते दोन-पाच टक्क्यांनी जरी वाढली, तरी देशाचे राजकीय चित्र बऱ्यापैकी बदलू शकते, हे भाजप नेते जाणून आहेत. त्यामुळेच ते यात्रेवर टीका करीत आहेत.

गेल्या सात-आठ वर्षांत आपल्या देशात कमालीचे भीतीचे आणि द्वेषाचे वातावरण उभे राहिले आहे. ‘आज कोणताही विरोधी नेता भाजपविरोधात बोलायला घाबरत आहे,’ असे राहुल गांधी यांनीच कन्याकुमारी येथे यात्रेचा प्रारंभ करताना सांगितले. हे वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न राहुल या यात्रेतून करू पाहत आहेत. काही वर्षांत सुस्तावलेल्या काँग्रेसमध्ये या यात्रेमुळे लगेचच चैतन्याचा झरा वाहू लागेल, अशी कल्पना करून घेण्याचे कारण नाही. मात्र, नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन मांडलेला नवा डाव आणि ही ‘भारत जोडो यात्रा’ यामुळे वातावरण बदलायला मदत होऊ शकते. यात्रेचा ‘प्रसाद’ नेमका कोणाला आणि कसा व किती मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT