Health
Health sakal
editorial-articles

अग्रलेख : कटू सत्याची मात्रा

सकाळ वृत्तसेवा

आरोग्याच्या स्थितीबाबत सातत्याने बदलणारी मानके यामुळे सर्वसामान्यांचा काय करावे अन् काय नको, असा गोंधळ उडतो. त्यामुळे फॅशनेबल गोष्टींना बळी न पडता सारासार विवेकाने निर्णय घेणे अधिक रास्त ठरते.

आधुनिक विज्ञानाने एकीकडे मानवी जगणे बरेच सुसह्य केले आहे, आयुर्मान वाढवले; पण दुसऱ्या बाजूला अनेक अंतर्विरोधांचे पेचही आपल्या पुढ्यात वाढून ठेवले आहेत. त्यांना सामोरे जाताना नीरक्षीर विवेकाची आणि जागरुकतेची किती नितांत गरज आहे, याची जाणीव करून देणाऱ्या घटना घडताहेत. समाजमाध्यमे हातात आल्याने माहिती, मते, सल्ले, कानमंत्र यांचा पूर वाहात असून त्यात बऱ्याचदा सत्य-असत्याचे बेमालूम मिश्रण असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस भांबावला तर नवल नाही. त्यातही हे जेव्हा आरोग्याच्या क्षेत्रात घडते, तेव्हा प्रश्न आणखीनच गंभीर बनतो.

अशावेळी ज्या विश्वासार्ह व्यक्ती, संस्था आहेत, त्यांचाच आधार उरतो. त्यामुळेच ‘जागतिक आरोग्य संघटना’ जेव्हा एखाद्या बाबतीत लोकांना सावधगिरीचा इशारा देते, तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागते. विविध कारणांनी आहारातील साखर कमी केली पाहिजे, याविषयीची मानसिकता तयार झाल्यानंतर साखरेला पर्याय म्हणून साखरविरहित गोडवा आणणाऱ्या पदार्थांची निर्मिती होऊ लागली. शरीरावरची चरबी कमी करण्यासाठी, जाडी घालविण्यासाठी साखर नको म्हणून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.

इतका की एका पाहणीनुसार, येत्या काळात या पदार्थांची बाजारपेठ ६५ अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत ‘जागतिक आरोग्य संघटने’ने एका संशोधनाच्या आधारे इशारा दिला आहे, की आहारात साखरेला पर्याय म्हणून गोडवा आणणारी शुगर फ्री उत्पादने वापरल्याने आरोग्यासाठी दूरगामी लाभ संभवत तर नाहीच; पण काही विकारांना निमंत्रण मिळण्याचा धोका आहे. त्यात हृदयविकार आणि मधुमेह (टाइप टू) यासारख्या विकारांचाही समावेश आहे.

मग ज्यांनी आजवर या पदार्थांचे सेवन केले, त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक हानीचे काय? त्याचे उत्तरदायित्व कोण घेणार, हे प्रश्न साहजिकच उपस्थित होतात. मुळात अशा उत्पादनांना उठाव मिळाला तो ‘साखर नको; पण गोडवा हवा’, या इच्छेतून. ‘जागतिक आरोग्य संघटनेने’च आहारातून आपण जी ऊर्जा घेतो, त्याचा दहा टक्क्यांपेक्षा अधिक भाग साखरेचा नसावा, अशी शिफारस २०१५मध्ये केली होती. साहजिकच त्यानंतर अशा पदार्थांकडे वळणाऱ्यांची, ते वापरणाऱ्यांची संख्या वाढली असल्यास नवल नाही.

रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याविषयीची जी मानके यापूर्वी सांगितली गेली, आणि नंतर त्यात जे बदल केले गेले, तेदेखील सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारे होते. यातील सर्वात कळीचा प्रश्न हा आहे की, वैज्ञानिक संशोधनाचे पाऊल पुढे पडल्यामुळे हे केले गेले, की बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या क्लृप्त्या आणि दबाव यांतून घडले? रक्तदाबाच्या विकाराविषयी एक प्रकारची भीती निर्माण करून अब्जावधी रुपयांची औषधविक्री करून झाल्यानंतर मग मानक बदलली गेले, असा संशय कोणाच्या मनात आला तर त्याला बोल कसा लावता येईल?

अशा काही घटना घडल्या, की सध्याच्या एकूणच जागतिक आरोग्य व्यवस्थांविषयी अविश्वास निर्माण होऊ लागतो. काही जण दुसऱ्या टोकाला जाऊन प्रत्येक बाबतीत ‘घातसूत्रे’ शोधायला लागतात. विवेकाची गरज जाणवते ती इथेच. याचे कारण विज्ञान संशोधनाच्या माध्यमातून मानवी आयुष्य अधिकाधिक सुखी व्हावे, यासाठी प्रामाणिकपणे काम करणारेही लोक आहेत.

त्यामुळेच वैद्यकशास्त्र आणि त्याचे उपयोजन याविषयी कोणत्याही टोकाला जाण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याविषयीचे डोळस भान ठेवणे महत्त्वाचे आहे. मुळात वाढती चरबी, मांद्य याला व्यायामाचा अभाव कारणीभूत असतो.

जाहिराती-प्रचार-माहितीप्रसाराच्या या युगात आपण कशाच्या तरी ‘आहारी’ जाऊन आपली मूळ जीवनशैली अकारण बदलत तर नाही ना, हे पाहिले पाहिजे. परंपरेने चालत आलेली खाद्यसंस्कृती केवळ फॅशनेबल गोष्टींना बळी पडून बदलण्याचे कारण नाही. याविषयी प्रबोधनाची गरज आहे. आपल्याकडे तर आहाराविषयीच्या कितीतरी चांगल्या गोष्टी ऋतुमानाचा विचार करून सणवारांमध्ये इतक्या सुंदर रीतीने गुंफल्या आहेत की, त्यातील मर्म लक्षात घेऊन त्यांचे पालन करणे हिताचे आहे. जे आपल्याच हातात आहे, ते आपल्या आरोग्यासाठी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

वैद्यकविषयक सर्व व्यवहारांचे नियमन सध्या आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या आणि सक्षम रीतीने होण्याची आवश्यकता आहे, याविषयी शंकाच नाही. त्या व्यवहारांची पारदर्शकता वाढायलाच हवी. परंतु त्यासाठी प्रयत्न करत असताना आपणच आपल्या आरोग्याचे भवितव्य दुसऱ्या कोणाच्या हाती आंधळेपणाने सोपविणार असू, तर आपल्याला कोणी वाचवू शकणार नाही. या बाबतीत जर आपण जागरूक झालो तर जागतिक पातळीवर अनुभवाला येणारे हेलकावे आणि लाटा यांची फारशी फिकीर करण्याची गरज नाही. एकूणच आयुष्यात कृत्रिम गोडवा शोधण्यापेक्षा नैसर्गिक गोडी महत्त्वाची, एवढे सर्वच बाबतीत लक्षात ठेवले तरी पुरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT