narendra chapalgaonkar
narendra chapalgaonkar sakal
editorial-articles

अग्रलेख : वरदाकाठचे ‘निकालपत्र’!

सकाळ वृत्तसेवा

‘मराठी साहित्यातील जी प्रमुख श्रेयस्थाने आपण मानतो ती खरोखरच वाढताहेत का? गेल्या शे-दीडशे वर्षात जे लेखक होऊन गेले त्यांनी आपले जीवन खरोखर प्रभावित केले का?

साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम हे नेहमीच स्वतंत्र असले पाहिजेत, तेथे सत्तेचा वावर भलत्याच घटकांना वाव देणारा ठरतो, हा इशारा गांभीर्याने समजून घ्यायला हवा.

‘मराठी साहित्यातील जी प्रमुख श्रेयस्थाने आपण मानतो ती खरोखरच वाढताहेत का? गेल्या शे-दीडशे वर्षात जे लेखक होऊन गेले त्यांनी आपले जीवन खरोखर प्रभावित केले का? आजसुद्धा मतलबाचा प्रश्न येतो, तेव्हा आपण ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्याकडेच धाव घेतो, ती का? त्यांनी तर साहित्यिकीचा दावा कधीच मांडला नाही.साहित्याचे आपल्या जीवनातील स्थान पुष्कळच खाली गेले आहे. मनोविनोदनापलीकडे आपणही त्याचा फारसा विचार करत नाही.

त्यावाचून आपले फारसे अडतही नाही. सध्याचे युग हे ज्ञानसंवर्धनाचे आहे. त्यात परिज्ञानाला (विस्डम) ला फारसा वाव नाही…’ वरदा नदीच्या काठी, वर्ध्यातच १९६९ मध्ये झालेल्या ४८व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ज्येष्ठ कवि-समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांनी केलेल्या मुक्तचिंतनातील ही काही मौक्तिके. वारेमाप फोफावणाऱ्या ‘अ-कविते’च्या गवतापासून थेट रोडावत जाणाऱ्या गांधीविचारांपर्यंत एक मोठा अवकाश त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता. सुमारे ५४ वर्षांनंतर, त्याच वरदाकाठावर विचारवंत आणि साहित्यिक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे अध्यक्षीय भाषण वाचल्यानंतर गेल्या पाच दशकात रेगे यांनी उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न जसेच्या तसे आहेत, याची जाणीव होते. लौकिकार्थाने परिस्थितीत बदल नक्कीच घडला; पण मराठी साहित्याची कूस म्हणावी तशी फळली नाही.

रेगे यांच्या भाषणाप्रमाणेच न्या. चपळगावकरांच्या चिंतनाचे सूत्र भाषा आणि साहित्यविषयक प्रश्‍नांभोवती गुंफलेले जाणवते. याला केवळ योगायोग म्हणता येणार नाही. ही दोन्ही भाषणे एकत्र वाचल्यास मराठी साहित्याचा प्रवाह कसकसा वाहातो आहे, तो कुठे कुंठित झाला आहे, त्याची कारणे आणि भविष्यमान काय, याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल. न्या. चपळगावकरांचे भाषण म्हणजे दीर्घकाळ रेंगाळलेल्या एखाद्या खटल्याबाबत सर्व साक्षीपुरावे जमेस धरुन दिलेले `निकालपत्र’च आहे, असे गंमतीखातर म्हणावे लागते. मराठी साहित्यातील उणीवांची बारकाईने चिकित्सा करुन, वर्तमानाशी सुसंगत असे विवेचन या भाषणात आढळते. विचारस्वातंत्र्य, लेखकस्वातंत्र्य, साहित्य आणि मराठी भाषा यांची मीमांसा इथे दिसते. न्या. चपळगावकरांनी मराठीचे दुखणे अचूक ओळखले, पण त्यावरच्या उपायांचे काय, हा प्रश्न निर्माण होतो.

विवेचनाच्या ओघात चपळगावकरांनी मराठी साहित्यिकांच्या वैचारिक कुंठेवर नेमकेपणाने बोट ठेवले. अभिव्यक्तीची हेळसांड करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या बेमुर्वत खोडीवर कोरडे ओढले. आस्था हरवलेल्या वाचकांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, आणि मराठीतील वैचारिकतेचा पूर्वेतिहास तपासून पाहिला. थोर तत्त्वज्ञ स्पिनोझापासून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपर्यंत आणि ख्यातनाम विचारवंत इसाया बर्लिन यांच्यापासून चित्रपट दिग्दर्शक बासु भट्टाचार्यांपर्यंत अनेकरंगी उद्धरणे त्यांच्या भाषणात सापडतील. इसाया बर्लिन यांनी ‘नेगेटिव लिबर्टी’ आणि ‘पॉझिटिव लिबर्टी’ असे स्वातंत्र्याचे दोन प्रकार वर्णिले आहेत. न्या. चपळगावकरांनी ही व्यापक संकल्पना थोडक्यात समजावून सांगताना त्याचे ‘अभावात्मक स्वातंत्र्य’ आणि ‘भावात्मक स्वातंत्र्य’ असे मराठीकरण करुन आपल्याकडील ‘लेखकाच्या स्वातंत्र्या’चा चतकोर, तिच्याशी ताडून पाहिला आहे.

राज्यकर्त्यांनी साहित्याच्या व्यासपीठावर यावे की येऊ नये, याचा वितंड गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्याचाही उल्लेख करताना ‘त्यांनी येऊ नये, या मुद्द्यापासून राज्यकर्त्यांच्या व्यासपीठावरील असणे गृहित धरण्यापर्यंत आपण साहित्यिक येऊन ठेपलो’ असा टोमणाही मारला आहे. तोदेखील अंतर्मुख व्हावे, असा. नुकतेच मुंबईत सरकारपुरस्कृत ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ झोकात पार पडले. अशा प्रकारची संमेलने घेण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांना होते, हे घातक असून सरकारचे हे काम आहे काय, असा झणझणीत प्रश्न न्या. चपळगावकरांनी विचारला, हे बरे झाले. असले सांस्कृतिक उपक्रम हे स्वतंत्र असले पाहिजेत, तेथे सत्तेचा वावर भलत्याच घटकांना वाव देणारा ठरतो, हा त्यांचा इशारा गांभीर्याने समजून घ्यायला हवा. म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण असल्या गोष्टींनी काळ सोकावतो. मराठीतील वैचारिक लेखनाचे दालन उल्लेखनीय आहे आणि थेट स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रबोधन परंपरेशी त्याचे नाते आहे, याची आठवण करुन देताना वैचारिक स्वातंत्र्याचा मुद्दाही चपळगावकर यांनी अधोरेखित केला.

लेखक-कवींमध्ये वाढीस लागलेल्या खोट्या भावनिक उद्रेकांबाबत किंवा ‘दाखवेगिरी’बद्दल रेगे यांनी चिंता व्यक्त केली होती. या वैफल्यग्रस्ततेमुळे कविता जीवनाच्या मूळ धारणेप्रत पोहोचू शकत नाही, अशी त्यांची मांडणी होती. न्या. चपळगावकरांनी नेमका तोच मुद्दा वेगळ्या पैलूसकट मांडला. कविता हा खरेतर अवघड वाङमयप्रकार, पण तोच हल्ली सोपा वाटू लागला आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. साहित्य मंच, संस्था, लेखक, प्रकाशक, अथवा शासन यांचा योग्य त्या पातळीवर संवाद राहण्याची गरज आहे, यात शंका नाही; पण ते कसे साध्य करायचे? त्यासाठी रेगे म्हणतात ते परिज्ञान किंवा विवेकबुद्धी हवी. तिला वाव उरला नसल्याची तक्रार पाच दशकांपूर्वी होती, आणि आजही ती आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: नैनीतालमधील वणवा आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत; व्हिडिओ समोर

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT