novak djokovic
novak djokovic sakal
editorial-articles

अग्रलेख : टेनिस कोर्टाची पायरी!

सकाळ वृत्तसेवा

डकाव डकाव करत चाललेली ‘पाशिंजर’ गाडी असो किंवा लांबलचक रॅलीजच्या टोलवाटोलवीमुळे कंटाळवाणी झालेली टेनिसची लढत असो, दोहोंची परिणती अखेरीस प्रवासी वा प्रेक्षकांच्या जांभईतच होते.

डकाव डकाव करत चाललेली ‘पाशिंजर’ गाडी असो किंवा लांबलचक रॅलीजच्या टोलवाटोलवीमुळे कंटाळवाणी झालेली टेनिसची लढत असो, दोहोंची परिणती अखेरीस प्रवासी वा प्रेक्षकांच्या जांभईतच होते. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या आधी कांगारुभूमीत असेच कंटाळवाणे नाट्य पहायला मिळते आहे. कोरोना चाचणीबाबत अति-संवेदनशील असलेले ऑस्ट्रेलियन सरकार आणि जागतिक क्रमवारीतला अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच यांच्यामधले कोर्टकज्जे आणि टोलवाटोलवी कुठल्याही टेनिस चाहत्याचा हिरमोड करणारी आहे. कायदा सर्वांना समान असला तरी आपल्या बाबतीत तो तितकासा समान नाही, अशी काहीतरी आढ्यतेखोर भावना प्रसिद्धपटूंमध्ये मूळ धरते, हे खरे. जोकोविच हा त्यापैकीच असावा की काय, अशी शंका येते. टेनिसच्या कोर्टावर वादातीत बादशहा ठरलेल्या या बेजोड टेनिसपटूला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेपासून आपल्या ग्रँड स्लॅम विक्रमाची सुरवात करायची होती. परंतु, कोरोनाच्या लसीने त्याच्या मार्गात अडथळे आणले आहेत.

ऑस्ट्रेलियन सरकारने जोकोविचच्या स्थानाचा मुलाहिजा न बाळगता, कोरोना प्रतिबंधक कायद्याखाली त्याला चांगलेच ताणले, हे एकाअर्थी बरेच झाले. काही अंशी वाईटही. याबाबत टेनिसजगतातच संमिश्र भावना आहेत. कायदा सर्वांना समान असल्याची जाणीव करुन देणे, हे सरकारचे कर्तव्यच. परंतु, त्यामुळे महत्त्वाच्या स्पर्धेची रया जाते, हेही तितकेच वाईट. थोडे तारतम्य, थोडा व्यवहार पाहूनच सुवर्णमध्य साधणारा निर्णय घेणे, केव्हाही इष्ट. इथेही जोकोविच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे मैदान मारणार, हे दिसत होतेच. तब्बल वीस ग्रँड स्लॅम जेतेपदे कमरेला बांधून फिरणारा जोकोविच सोमवारपासून सुरु होणारी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकला असता तर रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही त्याने कुठल्या कुठे मागे टाकले असते. त्यासाठीच सगळे नियम-कायदे धाब्यावर बसवून तो ऑस्ट्रेलियात थडकला. कोरोना प्रतिबंधिक लसीच्या दोन्ही मात्रा घेणे नियमानुसार बंधनकारक असले तरी लस घेण्याची सक्ती कायद्याने करता येत नाही. जोकोविचने लसी घेतलेल्या नाहीत. त्याचा लसीकरणाला काहीसा विरोधच आहे, ‘तो माझा खासगी प्रश्न आहे,’ असे त्याचे म्हणणे. एवढेच बोलून तो थांबला असता तर कुणाची हरकत नव्हती. परंतु, आपल्याला कोरोनाची लागण झाली होती, इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वीच्या १४ दिवसात आपण कुठेही हिंडलो-फिरलो नव्हतो, हेदेखील त्याने अर्जात ठोकून दिले! वास्तविक डिसेंबरात तो स्पेनमध्ये गेला होता, शिवाय कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याचे कळल्यानंतरही पत्रकारांना बेधडक भेटला होता. जोकोविच खोटे बोलल्याचे ऑस्ट्रेलियन सीमा दल अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला विमानतळावरच आठ तास रोखले, नंतर विलगीकरणात रवानगी केली. त्याचा व्हिजादेखील रद्द केला. परंतु, याविरोधात जोकोविचने थेट तिथल्या न्यायालयात दाद मागितली.

आपल्याकडे लसींमधील सवलतीचे प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे असल्याचा त्याचा दावा होता. तिथल्या न्यायालयाने मात्र जोकोविचशी इमिग्रेशन अधिकारी चुकीचे वागल्याचा निष्कर्ष काढून त्याचा व्हिजा ग्राह्य मानला. झाले गेले गंगेला मिळाले, आता जोकोविच खेळणार असल्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे आयोजक, प्रायोजक आणि चाहते खुश झाले. परंतु, इतक्यावर हे प्रकरण थांबणारे नव्हते. जोकोविचचा व्हिजा पुन्हा रद्द केल्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. अर्थात, असे असले तरी तो ऑस्ट्रेलियन न्यायालयात या निर्णयाला आव्हान देऊ शकतोच. पण टेनिस कोर्टाबाहेरचे हे कोर्टकज्जे कधी थांबणार याची आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे.

व्यावसायिक टेनिसपटू संघटनेतर्फे (एटीपी) आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांचे वेळापत्रक नियंत्रित केले जाते. या संघटनेशी जोकोविचचे फारसे पटत नाही. गेल्या वर्षीच या संघटनेपासून वेगळे होत त्याने क्रमवारीत ५०० व्या स्थानाखाली असलेल्या कनिष्ठ व्यावसायिक टेनिसपटूंसाठी स्वतंत्र संघटना स्थापली होती. साहजिकच टेनिस वर्तुळात जोकोविचच्या वर्तनाला नाके मुरडणारेही खूप आहेत. अर्थात फेडरर, नदाल आणि जोकोविच ही टेनिसमधली त्रिमूर्ती मानली जाते. त्याचे चाहतेही प्रचंड आहेत हे ओघाने आलेच. खुद्द ऑस्ट्रेलियात ‘फ्री नोवाक’ असे फलक झळकावत शेकडो चाहत्यांनी मोर्चे काढले. गेल्या दोन वर्षांत ऑस्ट्रेलियन नागरिकांनी सर्वात जास्त काळ आणि कडक निर्बंधांना तोंड दिले. आता कुठे जगरहाटी रुळावर येत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने लोक वैतागले आहेत. पुरेशी काळजी घेऊन सगळे सुरु ठेवा, अशीच बहुतेकांची भावना आहे. जोकोविच खोटे बोलला का? ऑस्ट्रेलियन आयोजकांना त्याने गृहीत धरले का? आपण वेगळ्या रंगाची पिसे असलेला पक्षी आहोत, असा समज तो बाळगून होता का? या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी होकारार्थीच द्यावी लागतील. तरीही तो खेळावा, अशीच बहुतेकांची इच्छा होती व आहे. जोकोविचला मायदेशी धाडले तर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतली निम्मी जादू आपोआप कमी होईल, प्रायोजकही नाराज होतील. शेवटी सारा खेळ पैशांचा असतो. हे सत्य ऑस्ट्रेलियन सरकार, स्पर्धेचे प्रायोजक आणि खुद्द जोकोविच यांनाही ठाऊक आहेच!

पैसा हे सहावे इंद्रिय आहे. ते नसेल तर इतर पाच इंद्रिये धड काम करेनाशी होतात.

- सॉमरसेट मॉम, विख्यात लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT