Former Maharashtra CM and senior Shiv Sena leader Manohar Joshi esakal
editorial-articles

अग्रलेख : राजकारणातले ‘सर’

मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी शैली बहाल करणाऱ्या शिवसेनेच्या गेल्या सहा-साडेसहा दशकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मनोहर जोशी यांचा आठ-नऊ दशकांचा जीवनप्रवास हा एका अर्थाने अडथळ्यांची शर्यतच होता. मात्र, त्यातला सर्वात ‘सुखद अपघात’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध जुळणे, हा होता.

मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी शैली बहाल करणाऱ्या शिवसेनेच्या गेल्या सहा-साडेसहा दशकांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. खरे तर जोशी ‘सरां’चा अवघा जीवनप्रवास हा बॉलीवूडच्या एखाद्या ‘सक्सेस स्टोरी’ची पटकथाच होऊ शकतो.

अठरा विश्वे दारिद्र्यामुळे माधुकरी मागून शालेय शिक्षण पूर्ण करणारा हा युवक जिद्द मनाशी बाळगून मुंबईत येतो काय, तिथे कोणाच्या तरी गॅलरीत झोपून दिवस काढत, मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून नोकरी मिळवतो काय आणि पुढे थेट याच मायावी मुंबईचा महापौरच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री आणि लोकसभाअध्यक्ष होतो काय, हे सारेच चित्तथरारक आणि तरुणांना प्रेरणा देणारे आहे.

त्यांचा आठ-नऊ दशकांचा जीवनप्रवास हा अडथळ्यांची शर्यतच होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध जुळणे, हा त्यातला सर्वांत ‘सुखद अपघात’ होता. त्यामुळेच त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले आणि तरुण वयात दूध विक्रीपासून पत्र्याचे डबे बनवण्यापर्यंत विविध व्यवसायात अपयश येऊनही, पुढे जिद्दीने आपल्या ‘कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट’चे रूपांतर एका मोठ्या उद्योगसमूहात ते करू शकले.

जोशी ‘सर’ धोरणी आणि चलाख-चतुर तर होतेच; पण व्यवस्थापनाची कलाही त्यांनी जिद्दीने अवगत करून घेतली. याच चातुर्याच्या तसेच व्यवस्थापनकलेच्या जोरावर त्यांची राजकारणातील घोडदौड ही वायुवेगाने किमान चार-साडेचार दशके सुरू राहू शकली. राजकारणातही त्यांनी जिद्द कधी सोडली नाही, त्याचबरोबर आपल्या पदाचा आबही ते कायम राखून असत.

मुंबईचे महापौर झाल्यावर कारभारावर अंतिम शब्द कोणाचा असा वाद झाल्यावरचा त्यांचा आयुक्तांशी झालेला संघर्षही त्यांच्या कायम लक्षात होता. त्यामुळेच मुख्यमंत्री होताच, त्यांनी महापालिकेत ‘महापौर परिषद’ नावाने जणू या महानगरावर राज्य करणारे मंत्रिमंडळच अस्तित्वात आणले होते. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले शिवसेनेचेच नारायण राणे यांनी ही संकल्पना मोडीत काढली आणि महापालिकांमध्ये आयुक्तांचे राज्य सुरू राहिले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जोशी ‘सर’ यांच्या ऋणानुबंधातील सर्वांत मोठा निर्णय हा १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊ घातल्यावर, ‘सरां’ना मुख्यमंत्री करण्याचा होता! तोपावेतो महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘शुगर लॉबी’चे म्हणजेच प्रामुख्याने मराठा-बहुजन समाजाचे वर्चस्व होते.

बाळासाहेबांनी ‘सरां’च्या हातात राज्याची सूत्रे देऊन, राज्याच्या राजकारणालाच एक वेगळा शहरी-ब्राह्मणी चेहरा बहाल केला आणि जोशी ‘सरां’नीही ती जबाबदारी मोठ्या तडफेने पार पाडली. खरे तर तेव्हा सुधीर जोशी यांचेही नाव या पदासाठी चर्चेत होते. मात्र, राज्य आले असले तरी शिवसेना-भाजप युतीला निखळ बहुमत मिळालेले नव्हते. डझनभर अपक्षांच्या कुबड्यांवर हे सरकार पाच वर्षे टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर होती.

शिवाय, ‘मला उठ म्हणताच उठणारा आणि बस म्हणताच बसणारा मुख्यमंत्री हवा आहे आणि त्याचा ‘रिमोट कंट्रोल हा माझ्याच हातात असेल!’ असे उद्‍गार बाळासाहेबांनी काढले होते. या पार्श्वभूमीवर अखेर बाळासाहेबांनी व्यवस्थापनकलेत पारंगत असलेल्या जोशी ‘सरां’ची निवड केली.

मुंबईतील ५० पेक्षा अधिक उड्डाण पूल ही जशी जोशी ‘सरां’ची मुंबईकरांना देणगी आहे, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला ‘मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हीदेखील. मुळात हे युतीचे सरकार आले होते, ते अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर.

या दंग्याधोप्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण आयोगाचा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कडक ताशेरे ओढणारा अहवाल मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फेटाळून लावला आणि त्यामुळे वादळ उठले होते. पुढे बाळासाहेबांशी त्यांचे काहीसे बिनसले आणि त्यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली.

पुण्यातील शाळेसाठीचा राखीव भूखंड जावयाच्या घशात घालण्याच्या त्यांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यांच्या कारकीर्दीस हा कलंक लागला नसता तर बरे झाले असते. पुढे ते लोकसभेत गेले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केवळ मंत्रीच नाही तर पुढे लोकसभेचे अध्यक्षही झाले. हा साराच प्रवास चित्तथरारक आणि त्याचबरोबर जोशी ‘सरां’ची जिद्द, उमेद आणि ईर्षा यांचे दर्शन घडवणाराच आहे.

लोकसभा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सभागृहाचे कामकाज मोठ्या तडफेने सांभाळले; शिवाय साठी उलटून गेल्यावरही प्रादेशिक पक्ष आणि शिवसेना यांचा अभ्यास करून डॉक्टरेट संपादन केली. आयुष्याच्या उत्तरपर्वात राज्यसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा शिवसेनेने न दिल्याने ते नाराजही झाले होते. तरीही बाळासाहेब आणि शिवसेना यांच्यावरील त्यांची निष्ठा अखेरपर्यंत अभंगच राहिली.

पक्षनिष्ठा हा शब्दच गायब झालेल्या आजच्या राजकीय रंगमंचावरून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही वर्षांपूर्वी ‘एक्झिट’ घ्यावी लागली आणि आता तर ते काळाच्या पडद्याआडच निघून गेले आहेत. तरीही शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून काम करणारा आणि थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मनोज्ञ दुवा असलेला एक नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT