Third Front
Third Front Sakal
editorial-articles

अग्रलेख : तिसऱ्या आघाडीचा चौथा कोन!

सकाळ वृत्तसेवा

पश्‍चिम बंगालमधील ‘तृणमूल’च्या झळाळत्या यशानंतर भाजपविरोधी आघाडीच्या चर्चांना वेग आला. दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत त्या दिशेने चाचपणी झाली असावी. तथापि आघाडीसाठी लगेच पाऊल पडेल,अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार, असे वृत्त चार दिवसांपूर्वी आले तेव्हाच आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी आघाडी उभी राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सत्तास्थापनेचे मनसुबे बंगालच्या उपसागरात बुडवल्यापासून या पक्षाची घोडदौड रोखता येऊ शकते, असे वातावरण देशभरात उभे राहत आहे. या पार्श्वभूमीवर आघाड्यांच्या राजकारणातील मातब्बर विरोधक नेते पवार यांच्या निवासस्थानी एकत्र येत आहेत, या वृत्तामुळे आता झालीच की बिगर-भाजप आघाडी, असे वातावरण तयार करण्यात प्रसारमाध्यमांनी भर घातली! शिवाय, या बैठकीपासून काँग्रेसच्या नेत्यांना दूर ठेवण्यात आल्यामुळे ही होऊ घातलेली तथाकथित आघाडी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना दूर ठेवून उभी करण्यात येत असलेली ‘तिसरी आघाडी’ आहे, असेही माध्यमांनी जवळजवळ गृहीतच धरले.

प्रत्यक्षात बैठकीनंतर त्यानंतर ‘काँग्रेसला वगळून भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचे कोणतेच प्रयत्न सुरू झालेले नाहीत!’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिल्यामुळे अनेकांचे मांडे मनातच राहिले असणार! त्यामुळे ही बैठक मग नेमकी झाली तरी कशासाठी आणि त्यापलीकडची बाब म्हणजे ती पवार यांच्याच निवासस्थानी का झाली, असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरेही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीच असली, तरी ती केवळ सारवासारवापुरतीच होती, हे लपून राहिलेले नाही. एक मात्र खरे! एकेकाळचे अटलबिहारी वाजपेयी यांचे विश्वासू सहकारी आणि पुढे मोदी यांचे प्रखर विरोधक बनलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्या ‘राष्ट्रमंच’ या संस्थेतर्फे बोलावलेल्या या बैठकीत केवळ चहापाणी आणि शिळोप्याच्या गप्पाच झाल्या, यावर कोणाचाही विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. बंगालसह पाच राज्यांच्या गेल्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपला आसाम वगळता अन्यत्र कोठेही यश तर सोडाच आपले पायही भक्कमपणे रोवता आलेले नाहीत. त्यामुळे या बैठकीत मोदी आणि भाजपविरोधात नेमके काय करता येईल, या शक्यतांची चाचपणी निश्चितच झाली असणार. त्यामुळेच भाजपला पर्याय कसा आणि कोणत्या स्वरूपात उभा करता येईल, याच्या चाचपणीसाठी ही बैठक हे पहिले पाऊल होते, असे सहज म्हणता येते.

भाजपनेही या बैठकीनंतर सुटकेचा निश्वास खचितच सोडला असणार! त्याचे प्रमुख कारण म्हणजे २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधी म्हणजेच येत्या मार्चमध्ये उत्तर प्रदेशसारख्या केंद्रातील सत्ता कायम राखण्यासाठी मोलाचा वाटा उचलणाऱ्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सध्या भाजपच्या डोळ्यापुढे उत्तर प्रदेश हेच लक्ष्य असणार. मात्र, तेथे अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपच्या पदरी अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांत प्रादेशिक पक्ष हेच भाजपपुढील मुख्य आव्हान असल्याचे दिसत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत तर त्याचे दर्शन घडलेच आहे. त्यामुळे या बैठकीस अखिलेश यादव वा मायावती यांच्यासारखे उत्तर प्रदेशचे बडे नेते उपस्थित न राहणे, ही भाजपसाठी सुखद बातमीच असणार! सर्वात, महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवार यांनी केलेल्या खेळीत सर्वात मोठी कामगिरी बजावणाऱ्या शिवसेनेलाही या बैठकीचे निमंत्रण नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेस विविध मुद्दे पुढे करून सारवासारव कशी करत आहे, हे बघण्यासारखे आहे. ही बैठक बिगर काँग्रेसवाद्यांची नव्हती, हे सांगण्यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या प्रवक्त्यांनी कपिल सिबल, अभिषेक मनु सिंघवी, मनीष तिवारी यांना आमंत्रण दिले होते; पण ते दिल्लीबाहेर असल्याने येऊ शकले नाहीत, असा खुलासा केला. मात्र, सिबल हे गेल्या वर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्ष कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्यांपैकीच एक होते, हे ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे या बैठकीत भाजपला पर्याय उभा करण्याची केवळ चाचपणीच झाली असणार, असेच म्हणावे लागते.

अर्थात, भाजपविरोधात एकत्र येण्याचे प्रयत्न उत्तर प्रदेश तसेच बिहारच्या गेल्या विधानसभा निवडणुकांत झालेही होते. अनेक बड्या नेत्यांनी या बैठकीकडे दुर्लक्षच केले, याचे प्रमुख कारण या तथाकथित तिसऱ्या आघाडीस ‘चौथा कोन’ आहे आणि अशी आघाडी झालीच तर तिचे नेतृत्व कोणी करायचे, हे ते सहजासहजी न सुटू शकणारे कोडे आहे! बिहार विधानसभा नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांनी हातात हात घालून जिंकल्यावर त्यांच्याकडे हेच विरोधक आशेने पाहत होते. मात्र, नितीशकुमारांनी नंतर लालूप्रसादांना रामराम ठोकत भाजपचाच हात हातात घेतला, हे या नेत्यांना आठवत असेल. सध्या पवार आणि निवडणूक रणनीतिज्ञ प्रशांत किशोर यांच्या वारंवार भेटी होत आहेत. या पार्श्वभूमीवर याच प्रशांत किशोर यांचे ‘तिसऱ्या वा चौथ्या आघाडीमुळे काही होऊ शकणार नाही!’ हे ताजे वक्तव्य सूचक म्हणावे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT