dhing tang
dhing tang 
संपादकीय

नोटाबंदी : एक वरदान! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

उपरोक्‍त मथळा वाचून काही जणांच्या भिवया नुसत्याच वर जातील, काही जणांच्या तळपायाची आग मस्तकी पोहोचेल, तर काही जण आम्हांस भक्‍त म्हणोन हिणवतील. पण आम्ही काही बोलणार नाही. फक्‍त गालातल्या गालात मुस्करू. डोळे मिटून मान डोलावू आणि म्हणू- कशी केली गंमत!

होय, नोटाबंदीचा फियास्को झाल्याची टीका सर्वत्र होत असली; तरी आमच्या दृष्टीने ते एक वरदानच आहे. नोटाबंदीचे अनेक फायदे झाले, परंतु त्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. बाजारातल्या सर्व नोटा ब्यांकेत परतल्या, म्हणून नोटाबंदी फसली हा निष्कर्ष आम्हाला आश्‍चर्यचकित करतो. भले!! नोटा परत आल्या म्हणून काय झाले? लगीन होऊन सासरी गेलेली मुलगी माहेरी परतली, तर लगीन मोडले असे का म्हणायचे? उलट माहेरचे दूधदुभते खाऊन, तूपरोटी हादडून धष्टपुष्ट झालेली मुलगी परत सासुरवाडीस गेली तर तिच्या कडेवर कोण असते? असो.

तसे आम्ही पहिल्यापासून अर्थशास्त्रीय दृष्टिकोन बाळगून जगणारे. उदाहरणार्थ, नोटा ही वस्तू कुणाच्या बापाची नसून, ते विनिमयाचे केवळ एक माध्यम आहे, ह्यावर आमचा पूर्वापार विश्‍वास होता. त्यामुळे कुणाकडेही उसने पैसे मागणे आम्हाला फारसे गैर वाटत नसे. नोटाबंदीनंतर आम्ही अधिकच राजरोसपणे हे माध्यम कुणाकडेही मागू लागलो...

आठवा ती ८ नव्हेंबरची रात्र... आपल्या सर्वांचे लाडके तारणहार श्रीश्री नमोजी ह्यांनी गोरगरिबांसाठी नोटाबंदीचे शस्त्र उगारून काळा पैसारूपी भस्मासुराचा वध केला, ती सुरात्र! ह्या रात्री भरबाराच्या ठोक्‍याला खिशात, कपाटात, पाकिटात ठेवलेल्या हजार-पाश्‍शेच्या नोटा ‘महज कागज के टुकडे’ बनून गेले. आम्हाला आठवते की तेव्हा आम्ही निश्‍चिंत होतो. ज्याने हयातीत कधी हजार-पाश्‍शेची नोट पाहिली नाही, ज्याच्या खिश्‍यात फद्या नाही, त्या गरिबाला नोटाबंदीची डर कशाला? सांप्रत आम्ही बिनघोर घोरलो. दुसरे दिशी पाहतो तो जगातील सर्व ब्यांका व एटीएमसमोर रांगाच रांगा लागलेल्या. आमच्या खिशात अडका नसताना केवळ ‘लोक काय म्हणतील?’ ह्या भयाने आम्हीही लाजेकाजेस्तव ब्यांकेच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. वेळ बरा गेलाच; पण ब्यांकेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वडापाव आणि चहादेखील दिला!! येवढे मिळाले म्हणून दुसऱ्या दिवशी परत जाऊन रांगेत उभे राहिलो. ब्यांकेच्या रखवालदारास आमचा संशय आला नसता तर आम्ही आठेक दिवस असे सहज मजेत काढले असते. पण... जाऊ दे.

नोटाबंदीने नेमके काय साधिले? नोटाबंदीमुळे कडकी ही वैयक्‍तिक बाब न बनता राष्ट्रीय बाब बनली हे नोटाबंदीचे सर्वांत मोठे साध्य आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. नोटाबंदीपूर्वी आम्ही उधार उसनवारी करताना अंमळ ओशाळे हसत असू. अजीजी करीत असू. (हा अभिनय थोडाफार ज्यास जमला, त्याचा बेडा पार जाहला...) आता (नोटाबंदीपश्‍चात) आम्ही कुणाकडे उधार उसनवारी मागितली, तर सामनेवालाच ओशाळा होतो व अजीजी करतो. हल्ली श्रीमंतांनाही कडकी लागू लागली आहे, हे वरदान नाही तर काय आहे? धनको आणि ऋणको ह्यांना समान पातळीवर आणणारे तत्त्व अत्युच्च नव्हे काय? जे लोकशाहीने साधले नाही, ते एका नोटाबंदीने साधिले. गरीब-श्रीमंतीमधील दरी मिटवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न खरे तर डाव्यांच्याही कौतुकास पात्र ठरावा असा; परंतु दुर्दैवाने त्यास आज दूषणे देण्यात येत आहेत. अहह!
आर्बीआय नावाच्या ब्यांकेने (ही ब्यांक एकदा बघून ठेवली पाहिजे...) नोटाबंदीचा फियास्को झाल्याचे जाहीर केल्यापासून सर्वत्र टीका होत असून, अनेक हुळहुळणारी मने त्या टीकेच्या झुळुकीने सुखावत आहेत, असे दिसते. त्यांस आम्ही एवढेच सांगू की -
...घी देखा लेकिन बडगा नही देखा! नोटाबंदी काय पुन्हा कधीही जाहीर करता येईल! त्यात काय येवढे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT