dhing tang
dhing tang 
संपादकीय

गुलाब आणि घड्याळ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र काढण्यासाठी तयारी करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मृदू भाव विराजमान होते. क्‍यानव्हासवर ब्रश टेकवण्यापूर्वी त्यांनी रंग कालवला, तो नेमका गुलाबी निघाला!! राजे स्वत:शीच खुदकन हसले. इतक्‍यात -
इतक्‍यात, एक संशयास्पद वेषातला इसम लपत छपत शिवाजी पार्कालगतच्या कठड्यामागून चालत गडाकडे आला. सदरील संशयास्पद इसमाने डोक्‍यावरोन अंगभर घोंगडे घेतले होते. इकडे तिकडे पाहत तो शिताफीने दाराशी पोचला. डोळ्यांत तेल घालोन पहारा देणाऱ्या द्वारसैनिकाने त्याला ‘कोण पायजेल?’ असे दर्डावून विचारले. बहुतेकांना ह्या दारापासूनच परत जावे लागते. परंतु, सदरील संशयास्पद इसमाने, त्याच्या कानात काही कुजबूज केली. द्वारसैनिकदेखील खुदकन हसला. त्याने त्यास सत्वर आंत घेतले...
...गडाच्या बालेकिल्ल्यात वर्दी गेली. राजे क्‍यानव्हासकडे टक लावोन पाहत होते. फर्जंदाने अंत:पुरात डोकावून अदबीने सांगितले : ‘‘बारामती नगरीचा जासूद निरोप घेवोन आला आहे. पेशी व्हावी काये?’’
आँ? थेट बारामतीचा निरोप? राजे बुचकळ्यात पडले. बारामतीकरांचे आपल्याकडे काय काम असेल बरे? हल्ली हल्ली बारामतीकरांशी राजियांनी सलोखा धरिला आहे. आपल्या दादरच्या मुलखाचेही ‘बारामती’ प्याटर्नवर नवनिर्माण साधण्याचे राजियांचे (नऊ वर्षे जुने) स्वप्न होते. थोरल्या बारामतीकरांबद्दल राजियांच्या मनीं (हल्ली) अपार आदर असे.
‘‘पाठवा आत...’’ राजियांनी फर्मावले. अनुज्ञेसरशी दालनात आलेल्या जासुदाने घसा खाकरोन निरोप दिधला.
‘‘साहेबांशी साहेबांना भेटावयाचे आहे. सत्वर... कधी? कुठे? केव्हा?’’ जासूद तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
‘‘मोहीमशीर नसू तेव्हा आम्ही गड सोडोन कोठेही जात नसतो... आज! इथे!! आत्ता!!,’’ राजियांनी ठणकावले. जासुदाकडे दुर्लक्ष करोन त्यांनी कागदावर ब्रशाचा फटकारा मारत दिलखेचक गुलाब काढावयास घेतला. व्हालंटाइन डेच्या निमित्ताने गुलाब काढणे सयुक्‍तिक राहील, असा त्यांचा अलवार विचार होता. विचार कसला? मृदुकोमल भावनाच ती!! सध्या व्हालेंटाइनबाबाचे दिवस आहेत. गुलाबांची लागवड आणि वाटप करण्याचे हेच ते दिवस. सणापुरते पुरेसे गुलाब हाती असलेले बरे, ऐसा पोक्‍त विचार त्यांनी दृढ केला.
‘‘साहेबांच्या गडावर साहेबांची भेट घेणे साहेबांना जमणार नाही. साहेब साहेबांना तटस्थ ठिकाणी भेटू इच्छितात... नो मॅन्स लॅंडमध्ये!! जेथे कोणीही बघणारे नाही, जेथे कोणी ऐकणारे नाही आणि अडवणारेही नाही,’’ जासुदाने शर्ती पुढे ठेवल्या. नो मॅन्स लॅंडमध्ये बारामतीकरांची भेट घ्यायची? त्यांना कुठला तह करायचा असेल? राजे विचारात पडले. नकळत त्यांनी क्‍यानव्हासवरील गुलाबकळीचा काटा मोडला. ‘नो मॅन्स लॅंड’वरील चर्चा चांगल्या रंगतात. मागल्या खेपेला कमळ पार्टीच्या गडकरीसाहेबांशी वरळीच्या हाटेलात अशीच चर्चा रंगली होती, हे राजियांना आठवले.
‘‘नो मॅन्स लॅंडची आयडिया चांगली आहे. तिथे बोलणी चांगली होतात!’’ राजे स्वत:शीच बोलल्यासारखे म्हणाले... अखेर एका कॉमन मित्राच्या घरी दादरमध्येच भेट ठरली. बोलणारे दोघे. ऐकणारेही दोघेच!
‘‘ठीक आहे! आम्ही पोहोचतो नो मॅन्स लॅंडमध्ये!!,’’ जासुदास ‘निघा’ असे खुणावून राजियांनी त्याची बोळवण केली आणि क्‍यानव्हासवरील गुलाबकळीकडे लक्ष वेधले. हेच गुलाबपुष्प घेवोन बारामतीकरांना भेटावयास जायचे असा मनोमन संकल्प त्यांनी केला. जे टाळीने नाही जमले, ते गुलाबाने नक्‍की साधता येत्ये!! पण... काय आश्‍चर्य!!
गुलाबकळीच्या जागी क्‍यानव्हासवर घड्याळाची तबकडी दिसू लागली होती!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT