dhing tang
dhing tang 
संपादकीय

लंडनच्या खाणीत..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी

मुक्‍काम : लंडन. होलबर्न येथील घटना.
मेट्रो बॅंकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे तक्रार करण्यासाठी जवळच्याच बॅंकेच्या शाखेत गेलो, तेथेच घोळ झाला. मेट्रो बॅंक ही सर्वसाधारणपणे आपल्याकडल्या ब्यांकेसारखीच आहे. तेथे सर्वच कर्मचारी आपुलकीने वगैरे वागतात!! तिथल्या क्‍याशियरने मला नेमके ओळखले. ब्यांकेची आपुलकी अशी अंगलट येत्ये!! दुर्दैवाने माझे आडनाव फारच प्रसिद्ध आहे. भारतात तर सारेच जण ‘मोदी मोदी’ करत असतात. इथेही तेच सुरू झाले!! माझ्या एका हितचिंतकाने आडनाव बदलून घे असा सल्ला दिला होता, तो मी ऐकायला हवा होता. असो.  
‘‘शुभ प्रभात... आपण श्रीयुत मोदी ना?’’ क्‍याशियरने थेट ब्रिटिश शिष्टाचारांसह विचारणा केली. त्याक्षणी ‘धरणीमाते पोटात घे’ असा टाहो फोडावासा वाटला. वास्तविक माझ्या अक्‍कडबाज मिश्‍या आणि काळ्या जाकिटामुळे मी बेल्जियमचा वगैरे वाटत असेन, असे मला वाटले होते. पण मी भारतीय असल्याचे लपले नाही. भारतीय माणसाच्या चेहऱ्यावर- अगदी तो हिरेव्यापारी असला तरी- एकप्रकारची कळा असते. माझ्याही चेहऱ्यावर ती असावी!!
‘‘कृपया, माझ्याकडे वेळ कमी आहे... माझी रक्‍कम मला तांतडीने हवी आहे!,’’ मी विनंती केली. तेवढ्या वेळात त्या क्‍याशिअरणीने बटण दाबून पोलिसांना बोलावून घेतले होते आणि काही कळावयाच्या आत मी गिरफ्तार झालो होतो. मला अचंबा वाटला. पोलिस इतक्‍या लौकर कसे काय येऊ शकतात? भारतातून पळून येताना मी चक्‍क पोलिसाला ‘मी देश सोडून जातोय’ असे नीट सांगून आलो होतो. तेव्हा ‘‘जा की तिच्याऽ***, आमाला काय सांगतो?’’ अशी जळजळीत प्रतिक्रिया त्याने दिली होती. इथे पोलिसांना ज्यास्त पगार मिळत असावा, असा कयास मी बांधला.
इथले पोलिस स्वभावाने खूप चांगले आहेत. त्यांनी मला चांगल्या गाडीतून चांगल्या कोर्टात नेले.
‘‘मी एक चांगला माणूस असून साधासुधा हिरेव्यापारी आहे. जात-मुचलका म्हणून मी पाचेक लाख पौंड भरतो. पण आत्ता मला सोडा!,’’ असा युक्‍तिवाद मी माननीय कोर्टासमोर केला. कोर्टाने (गंभीर चेहऱ्याने) तो ऐकून घेतला, पण मला जामीन नाकारला.
शेवटी जेलखान्यात आमची भरती झाली. सदरील अनुभव मी कोठडीत बसूनच लिहीत आहे. आश्‍चर्य म्हणजे माझ्या कोठडीतील सोबत्याचे नावही टॉम मूडी असेच आहे. ‘‘तू कुठल्या गुन्ह्यासाठी अंदर आलास?’’ त्याने विचारले. ‘‘आडनावामुळे,’’ मी म्हणालो. आता तोदेखील मूडी हे आडनाव बदलण्याच्या विचारात आहे. पुन्हा असो.
...वास्तविक लंडनमध्ये माझे बरे चालले होते. मोकळा हिंडत होतो. अक्‍कडबाज मिश्‍या वाढवून आणि काळे महागडे कोट घातले की इथे कोणाचे फारसे लक्ष जात नाही. भारतात असतो तर एव्हाना मीडियावाल्यांनी मला कधीच जेलात पाठवले असते. रस्त्यात विंडो शॉपिंग करत मी छान जगत होतो.
एक दिवस -
...एक दिवस मला मल्ल्या नावाचा एक इसम रस्त्यातच भेटला. तोही काळा कोट घालून फूटपाथवर हिंडत होता. मला धक्‍काच बसला.
‘‘ तुम्हीसुद्धा ह्याच फूटपाथवर फिरताय?,’’ मी संतापून विचारले.
‘‘शूऽऽ...हळू बोल! आपल्या मागे तो खांबामागे दडलेला माणूस आहे ना... तो चोक्‍सी आहे!’’ मल्ल्या म्हणाले. मी वळून पाहिले आणि काय आश्‍चर्य!! किमान अर्धा डझन काळे कोटवाले भराभरा खांबाआड दडले!!
सारांश : लंडन हे शहर, सध्या आमच्यासारख्या भारतीय हिऱ्यांची खाणच झाली आहे. हुडका म्हंजे सापडेल!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT