बुद्धी आणि सौंदर्य यांचा संयोग होणे महत्त्वाचे असते.
- टुडाव अँडो , वास्तूविशारद
प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात गणेशपूजनाने करण्याची आपली परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच गणांचा आणि गुणांचा अधिपती असलेल्या या दैवताचा उत्सव साजरा करताना समाज म्हणून आपण कोणता संकल्प करणार, हे महत्त्वाचे. सार्वजनिक उत्सव ही एक शक्ती आहे आणि समाजापुढचे त्या त्या काळाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या शक्तीचा उपयोग व्हायला हवा.
किंबहुना त्यासाठीच तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. भारतीय समाजाला स्वतःचा असा चेहरा आहे. अनेक आक्रमणे झाली, संकटे आली, पडझड झाली, तरीही तो कधीच नष्ट झाला नाही.
सरसकटीकरणाच्या जागतिक लाटेतही तो हरवला नाही, हे विशेष. याचे कारण आपल्याकडील विविध सांस्कृतिक उत्सव आणि त्यांच्यामागील साक्षेपी विचार. त्यातही गणेशोत्सवाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. चैतन्याचे कारंजे खळाळते ठेवणारे, लोकांमधील सर्जनशीलतेला आवाहन करणारे, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा जागर करणारे हे दैवत.
त्याचा उत्सव हा त्या वैशिष्ट्यांना साजेसा असाच झाला पाहिजे. त्यातील सामाजिक शक्तीचा प्रत्यय येत्या दहा दिवसांतच नव्हे, तर वर्षभर यायला हवा. त्यासाठी संकल्पही तसाच मंगलमय असायला हवा. अनेक कलाकार, नेते, विद्वान यांची सुरवातीची जडणघडण या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातच झाली, यात नवल नाही.
याचे कारण सर्व प्रकारच्या कलाविष्कारांना, गुणाविष्कारांना तिथे स्थान मिळते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोवाडे, मेळे, भावगीत गायन, कथाकथन, शास्त्रीय गायन, जादूचे प्रयोग, शास्त्रीय संगीताच्या मैफिली, नाट्यप्रयोग, कीर्तने असे खऱ्या अर्थाने विविध गुणांचे दर्शन होत आले आहे. ऐतिहासिक, पौराणिक वा वर्तमानकालीन देखावे उभे करण्यासाठी चित्र, शिल्प आदी कलांची आवड असणाऱ्यांना सहजपणे प्रोत्साहन मिळाले.
वर्गणी गोळा करण्यापासून ते मंडप उभारणीपर्यंत, कार्यक्रम सादरीकरणाच्या नियोजनापासून ते हिशेब-ठिशेब, व्यवस्थापन यापर्यंत अनेक गोष्टी स्थानिक पातळीवर घराघरांतील मुले स्वयंस्फूर्तीने करीत आली आहेत. किंबहुना ही स्वयंस्फूर्ती, ही सामाजिक प्रेरणा हाच सार्वजनिक उत्सवाचा आत्मा.
सर्वसामान्यांचा असा व्यापक सहभाग क्वचितच एखाद्या उपक्रमाला लाभत असेल. त्यामुळेच बहुधा हे ‘वैभव’ अनेकांना, विशेषतः राजकीय नेत्यांना खुणावू लागले. त्यांचा त्यातील वावर वाढू लागला. जी कामे उत्स्फूर्तपणे होत होती, तीस अलीकडच्या काळात कंत्राटीकरणाने होऊ लागली. सामान्य वर्गणीदारांची जागा धनाढ्य प्रायोजकांनी घेतली आणि विविध गुणदर्शनाचा मंडप बड्याबड्या सेलेब्रिटी कलाकारांच्या उपस्थितीने गजबजू लागला.
गणेशोत्सवामागील मूळ सांस्कृतिक-आध्यात्मिक विचार काय आहे, हे खरेतर उत्सवाच्या निमित्ताने समजावून घेणे आणि देणे आवश्यक आहे. परंतु ते सोडून बाकीच्याच गोष्टींना महत्त्व आल्याचे दिसते. मूर्ती तुमची मोठी की आमची? तिथला आवाज तुमच्या मंडळाचा जास्त की आमच्या? असली भंकप आणि उथळ चढाओढ सुरू झाली.
‘डीजे’च्या भिंती उभारून त्या आवाजाने सारा परिसर भयकंपित झाला, स्थानिक लोकांवर जीव मुठीत धरण्याची वेळ आली आणि आबालवृद्ध कितीही त्रासले तरी त्याची पर्वा न करणारे काही बेदरकार लोक गणेशभक्तीचा टिळा मिरवत मनमानी करू लागले आहेत.
दहीहंडी काय किंवा गणेशोत्सव काय अशा उत्सवांना एवढे कंठाळी आणि बटबटीत स्वरूप येऊ द्यायचे का, याचा आता समाजानेच विचार करण्याची वेळ आली आहे. बुद्धीच्या दैवताचे पूजन करण्याच्या नावाखाली त्या बुद्धीशीच फारकत घेणे याइतका दुसरा अस्वस्थ करणारा विरोधाभास नसेल.
आता तरी लवकरात लवकर हे सगळे ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळच्या गणेशोत्सवापासूनच त्याला सुरुवात करूया. या उत्सवाचा आत्मा हरवू नये, यासाठी कसोशीने प्रयत्न करूयात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.