growth Personality virtual human Rome was not built in a day sakal
संपादकीय

पात्रतामापक (व्हर्च्युअल) पट्टी!

सारासार विवेकानं सुसंगतीची कास धरून जर स्वत:ला सिद्ध करायचा प्रयत्न केला, तर यशोमंदिर दूर नसतं. त्यासाठी आपल्याला ‘पात्रतामापक पट्टी’ उपयोगी पडते.

सकाळ वृत्तसेवा

- राजेन्द्र खेर

Rome was not built in a day असं म्हटलं जातं. व्यक्तिमत्त्व हे सुद्धा एका दिवसात कधी घडत नाही. आनंदमार्गी जीवनेच्छा असणाऱ्यांसाठी सुसंगतीची नितांत आवश्यकता असते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात, ‘सुसंगती सदा घडो...’

संत म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न; सर्व सिद्धींचे कारण.’ पण वास्तविक जीवन जगताना मन प्रसन्न राहण्याऐवजी बऱ्याचदा ते मोडावून जात असतं. तसा अनुभव समाजात वावरताना अनेक जण घेत असतात. एखादा तरुण आडगावातून शहरात येतो आणि स्वाभाविकच शहराच्या भौतिक दर्शनानं आणि प्रगत(?) माणसांचं राहणीमान पाहून बुजून जातो.

नोकरी करताना एखाद्याचं मोठं ‘पॅकेज’ पाहून एखादा तरुण किंवा तरुणी बावरून जाते; स्वत:ला कमी समजू लागते. कित्येकांना तेवढी पात्रता नसतानाही मोठं पॅकेज मिळतं, तर कित्येकांना पात्रता असूनही तेवढा पगार मिळत नाही.

एखादी व्यक्ती उत्तम अभिनय करते किंवा एखादी व्यक्ती उत्तम गायन करते; पण संधी मात्र दुसऱ्यांनाच मिळते. एखाद्याला प्रमोशन मिळायला हवं असतं; परंतु, मिळतं अनपेक्षितपणे दुसऱ्यालाच! अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा स्वाभाविकच मन उदास बनतं. व्यक्ती स्वत:ला कमी समजू लागते. तिच्या मनावर मळभ चढतं. अलीकडच्या भाषेत फ्रस्ट्रेशन येतं.

पण हेच तर आव्हान असतं. अशा आव्हानांकडे पाठ फिरवायची नसते, तर त्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जायचं असतं. भगवान तीच गोष्ट अर्जुनाला गीतेत सांगतात:- ...तस्मादुत्तिष्ठकौन्तेय युद्धायकृतनिश्चय:॥ जीवनात लढा हा असणारच आहे.

आपल्या पुढे ठाकणाऱ्या आव्हानांमागे आपला कर्मसंचय सुप्त स्वरूपात दडलेला असतो. ते वास्तव स्वीकारावंच लागतं. एका आव्हानाकडे पाठ फिरवली तर समोर दुसरं आव्हान उभं ठाकतं! त्यामुळे अपयश किंवा कटू गोष्टींच्या अनुभवांनी खचून न जाता समर्थपणेच त्यांना सामोरं गेलं पाहिजे, हा धडा भगवान देतात.

‘सुसंगति सदा घडो’

अनेक कारकिर्दी रसातळाला गेल्यानंतर माझी साहित्यिक कारकीर्द जेव्हा सुरू झाली, तेव्हा फ्रस्ट्रेशन येऊ नये किंवा सभोवतालच्या कटू अनुभवांमुळे मन मोडावून जाऊ नये म्हणून माझ्या वडिलांनी मला एक कानमंत्र देऊन ठेवला होता. माझे वडील (कै.) भा. द. खेर हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात ते शिकले.

विख्यात साहित्यिक श्री. म. माटे हे तिथे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा माझ्या वडिलांवर खूप लोभ होता. ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे, माझे वडील आणि स्वत: श्री. म. माटे हे जंगली महाराज मार्गावर फिरायला जात. १९४० च्या दरम्यान त्या मार्गावर फारशी वर्दळ नसे. त्यामुळे फिरण्याचा मोठा आनंद मिळे.

श्री. म. माटे यांच्याबरोबरच्या त्या फिरण्यात बहुतेक वेळा साहित्यविषयक गप्पाच चालत. मग विषयाच्या ओघात माटे मास्तर अनेक गोष्टी सांगत आणि त्या माझ्या वडिलांच्या आयुष्यावर परिणाम करून जात. ‘सुसंगति सदा घडो’, या मोरोपंतांच्या विचाराची सत्यता म्हणूनच पटते. जशी संगत तसे विचार; आणि जसे विचार तसं जीवन! एके दिवशी फिरताना श्री. म. माटे माझ्या वडिलांना म्हणाले, ‘आपल्या खिशात एक ‘पात्रतामापक पट्टी’ सतत बाळगायला हवी.’

श्री. म. माटे यांनी माझ्या वडिलांना त्याचा अर्थ समजावला. पुढे अनेक वर्षांनी मी जेव्हा साहित्यविश्वात पदार्पण केलं तेव्हा ती ‘पात्रतामापक पट्टी’ माझ्या वडिलांनी मला दिली आणि त्या पट्टीचा अर्थ समजावला. ही ‘पात्रतामापक पट्टी’ म्हणजे खरीखुरी पट्टी नव्हे; आजच्या भाषेत सांगायचं तर‘व्हर्च्युअल’ पट्टी! त्याचा अर्थ समजावताना वडील मला म्हणाले होते, ‘आपल्या खिशात (मनात) ही पट्टी सतत बाळगावी.

सार्वजनिक जीवनात ती कामी येते. म्हणजे, एखाद्या कार्यक्रमात आपली ओळख करून देताना किंवा सहेतुक आपलं वर्णन करताना कुणी म्हटलं की, कालिदासानंतर राजेन्द्र खेर! तर लगेच आपणही पात्रतामापक (व्हर्च्युअल) पट्टी (मनोमन) काढायची आणि स्वत:चं मापन करायचं. मनात म्हणायचं, अरे, कालिदासाच्या नखाचीसुद्धा मला सर नाही! मी लिहिण्याचा केवळ प्रयत्न करतो; परंतु, माझी प्रतिभा कालिदासासारखी मुळीच नाही!

समाजात बहुधा तोंडावर कौतुक होत असतं. पण अप्रत्यक्ष टीकाही होत असते. असंच परोक्षपणे एखाद्यानं म्हटलं की, राजेन्द्र खेरांना बाराखड्यासुद्धा लिहिता येत नाहीत. तर पुन्हा आपणही ‘पात्रतामापक पट्टी’ मनोमन काढावी आणि स्वत:चं मापन करताना म्हणावं, ‘अरे, बाराखड्यांपुढे सुद्धा मी काहीतरी चांगलं नक्कीच लिहिलं आहे!’ आज या ‘पात्रतामापक पट्टी’चा मला चांगला उपयोग होतो.

म्हणजे गौरव आणि टीका या दोन्ही परस्पर विरुद्ध मतप्रणालींमध्ये माझं मन स्थिर रहातं! डोक्यात हवाही जात नाही; आणि नैराश्यही येत नाही. आपले पाय जमिनीवर स्थिर राहण्यासाठी ही ‘पात्रतामापक पट्टी’ फार उपयोगी ठरते. त्यामुळे कुणी आपल्याला कमी समजलं, मानहानी केली तरी खचून जाऊ नये आणि दुसऱ्यापेक्षा काही अधिक मिळालं तर फुशारूनही जाऊ नये, हा धडा मला या पट्टीनं कायमचा दिला आहे.

पदरी पडणारं अपयश हे नवा यशोमार्ग प्रकाशित करणारं असतं. अपयश हे आपल्याला शिकवण्यासाठी येत असतं तसंच नव्या संधी मिळवून देणार असतं. पहिलं अपयश हे अंतिम अपयश कधीच नसतं. वास्तविकत: अपयश, ही यशाकडे जाणारी पहिली पायरी नसते; उलट यशाकडे जाणारी प्रत्येक पायरीही यशस्वीच असते, असं पू. पांडुरंगशास्त्री म्हणायचे.

एक्कावन्नाव्या घावाला लोखंड तुटतं, कारण पहिले पन्नास घाव हे यशस्वी झालेले असतात, असंही ते म्हणत. त्यामुळे सारासार विवेकानं सुसंगतीची कास धरून जर स्वत:ला सिद्ध करायचा प्रयत्न केला तर यशोमंदिर दूर नसतं. ‘पात्रतामापक पट्टी’ ही आपल्याला त्यासाठी नक्कीच उपयोगी पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

SCROLL FOR NEXT