jayaleela-bacteria
jayaleela-bacteria 
happening-news-india

सर्च-रिसर्च : वनस्पतींचा विध्वंस करणारा ‘झायलेला’

डॉ. रमेश महाजन

सध्या आपण दोन मोठ्या संकटांचा सामना करत आहोत. एक आहे कोरोनाची साथ तर, दुसरे आहे फळबागा आणि ऑलिव्ह वृक्षांना उद्ध्वस्त करणारा झायलेला नावाच्या जीवाणूचा (बॅक्टेरिया) संसर्ग. दोन्हीही जगात सर्व ठिकाणी पसरुन आहेत. करोना सारखीच झायलेला संसर्गाची उपयुक्त चाचणी प्रस्थापित करण्यासाठी खास करून युरोपीय देशातील संशोधक झटत आहेत आणि त्यातून विकसित झालेली चाचणी संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झायलेला बॅक्टेरिया हा ग्रॅम निगेटीव्ह वर्गातील बॅक्टेरिया. वनस्पतीत हा थेट प्रवेश करु शकत नाही. त्यासाठी त्याला वनस्पतीवर पोसल्या जाणाऱ्या कीटकांमधे शिरावे लागते. कीटक खोडातून पोषण घेत असताना झायलेला खोडातील झायलेम पेशीत पाय रोवून बसतो. कीटक दुसरीकडे निघून जातो. हा बॅक्टेरिया झायलेम सोडून कुठेही जात नसल्याने आणि तिथेच एकगठ्ठा वसाहती (बायोफिल्मस्) करून वाढत असल्याने वनस्पतीच्या पोषणात बाधा येते. परिणामी पाने सुकतात, करपतात आणि गळून पडतात. यातून वृक्षाचा हळूहळू नाश होतो. अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा येथील द्राक्षांच्या बागा आणि युरोपीय देशांतील ऑलिव्ह वृक्ष यांना बॅक्टेरिया संसर्गाचा मोठा फटका बसतो आहे. ऑलिव्ह तेलाच्या उत्पादनात इटली सारखे देश आघाडीवर होते. पण ते आता उत्पन्न गमावून बसले आहेत.

झायलेला जीवाणू त्याच्या उपजातीसह मुख्यतः दक्षिण मध्य अमेरिका आणि अमेरिकेपुरता मर्यादित होता. पण पुढे युरोपीय देशांत अमेरिकेतील द्राक्ष पिकाचा प्रसार करण्यासाठी जी रोपे व कलमे पाठवली गेली त्यातून त्याचा संसर्गही निर्यात केला गेला! युरोपात २०१३पासून दिसायला लागला. तो अधिक पसरु नये म्हणून तो सूक्ष्मपणे ओळखण्याची गरज निर्माण झाली. करोना चाचणीप्रमाणेच जीवाणूच्या ‘पीसीआर’ चाचण्या बारीकसारीक बदल करून वापरण्यात आल्या. कोरोना आणि झायलेला संसर्गाची काही वैशिष्ट्ये समान आहेत. पहिले म्हणजे दोन्हीत लक्षणरहित संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. वरील संसर्ग केवळ ''पीसीआर ''सारख्या जिनॉमिक चाचण्यांनी स्पष्ट होतो. लक्षणरहित संसर्ग नक्की कशामुळे होतो याबद्दल दोन्हीकडे कल्पना नाही.

संसर्गाचा मुकाबला कोरोनाच्या बाबतीत व्यक्तिच्या विलगीकरणाने तर झायलेलाच्या बाबतीत वृक्षाच्या विलगीकरणाने यशस्वी होतो हे सूत्र मात्र दोन्हीकडे समान आहे.

झायलेलाच्या अनेक उपजाती असल्या तरी आर्थिक नुकसान करणाऱ्या चार उपजाती आहेत. उपजातीनुसार त्यांच्या संसर्ग क्षमतेची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार फास्टीडियोझा उपजाती द्राक्षातील ‘पिअर्स डिसीज’ला कारणीभूत ठरते मल्टीप्लेक्स उपजाती पीच,  प्लम आणि बदामासारख्या झाडांचे नुकसान करते. पोका (Pauca) उपजात कॉफी पिकाला धोकादायक असते, तर सँडी उपजात कण्हेरी सारख्या फुलझाडांना नष्ट करते. फ्रान्सच्या कॉर्सिका बेटावरील झाडात झायलेलाचा संभाव्य संसर्ग ओळखण्यासाठी प्रत्यक्ष झाडात बॅक्टेरियाचा मागोवा न घेता आसमंतात वावरणाऱ्या कीटकांत या बॅक्टेरियांचे अस्तित्व किती हे ‘डीएनए’च्या पीसीआर तंत्राने संशोधकांनी तपासले. २०१८ च्या ''नेचर'' पत्रिकेत ते प्रसिद्ध झाले. तुडतुडे (फिलाएनस स्पुमारियस) या कीटकात ही पहाणी केली गेली. वनस्पतीपेक्षा कीटकांत झायलेल्याच्या जास्त प्रजाती आढळून आल्या. ही  माहिती भावी संसर्ग रोखण्यासाठी उपयोगी पडणार आहे. 

वनस्पतीतील झायलेला जीवाणूंचा संसर्ग काहीवेळेस अनेक उपजातींमुळे झालेला असतो. उपाययोजनेच्या दृष्टीने ते जाणून घेणे आवश्यक असते. फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रीकल्चरच्या संशोधकांनी अशी पद्धत शोधली आहे. सहसा मेटॅजेनॉमिक तंत्राने एखाद्या जीवाणू मिश्रणातील भिन्न बॅक्टेरियांचे तुलनात्मक प्रमाण कळते. पण संशोधकांच्या चौपदरी विश्लेषणाने एकाच वेळेस जीवाणूंच्या चार उपजातीचे प्रमाण जाणून घेणे शक्य होते. जीवाणूंच्या ‘डीएनए’तील वारंवारीतेवर आधारीत ही ‘के’मर पद्धती जिनॉमिक्स मधील एक मैलाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT