या जगण्यावर...: जीवनातील गुरूंचे महत्त्व  
संपादकीय

या जगण्यावर...: जीवनातील गुरूंचे महत्त्व

सर्वच संस्कृतींमध्ये गुरुमाहात्म्य मान्य झालेले आहे. आपण भारतीय तर ‘गुरुः साक्षात परब्रह्म’ या श्रद्धेने गुरुपूजन करीत आलेलो आहोत

सकाळ वृत्तसेवा

-शिरीष चिंधडे

सर्वच संस्कृतींमध्ये गुरुमाहात्म्य मान्य झालेले आहे. आपण भारतीय तर ‘गुरुः साक्षात परब्रह्म’ या श्रद्धेने गुरुपूजन करीत आलेलो आहोत. ‘कृष्णं वंदे जगदगुरूम्’ अशीही आपण प्रार्थना करतो. आदिशंकराचार्य ते थेट संतशिरोमणी ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकाराम यांनादेखील असेच जगद्गुरूचे वंद्य स्थान दिले गेले आहे. पंजाबमध्ये ‘वाहे गुरुं’च्या आज्ञेनुसार ग्रंथसाहेब हेच गुरुस्थानी पूजिले जातात. प्राचीन ग्रीसमधील सॉक्रेटिस-प्लेटो-अॅरिस्टॉटल ही गुरु-शिष्य त्रयी जगप्रसिद्ध आहे. पैकी सॉक्रेटिसच्या जीवनाबद्दल बरीच माहिती आपल्याला असते. प्लेटोविषयी फारसे काही माहित नाही. उरला ॲरिस्टॉटल. त्याला देवत्व दिलेले नसेल; पण त्याची गुरू म्हणून असलेली कीर्ती थोडी तपशिलात बघण्याजोगी आहे.

मॅसिडोनियाचा सम्राट फिलिप याला पुत्रप्राप्ती झाल्यावर त्याने पहिला संदेश पाठवला तो अथेन्समध्ये राहणाऱ्या अरिस्टॉटलला. तो लिहितो, ‘‘फिलिपचा अरिस्टॉटलला दंडवत. मला पुत्रप्राप्ती झाली आहे याची वार्तां देत आहे. देवाचा तर मी आभारी आहेच; परंतु त्याहीपेक्षा केवळ पुत्रप्राप्ती झाली आहे, एवढेच कारण नाही, तर हा मुलगा आपण आहात त्या काळात जन्मला आहे, हे मुख्य. मला आशा आहे, की आपणाकडून त्याला शिक्षण-प्रशिक्षण प्राप्त झाल्यावर तो माझा पुत्र आणि आपला शिष्य असल्याची योग्यता सिद्ध करून राजसत्तेचा वारस होईल.’’

हा पोरगा म्हणजे पुढे अलेक्झांडर द ग्रेट म्हणून नावाजलेला ग्रीक सम्राट होय. सम्राट फिलिपने पत्र लिहिले तेव्हा जेमतेम तिशीचा अरिस्टॉटल समुद्रीजीवशास्त्राचा अभ्यास करीत होता. ग्रीकांनी त्याची अभ्यासू वृत्ती आणि शिक्षकी गुण ओळखले आणि त्याला शिक्षणसंस्था काढायला सांगितले. त्यानुसार पेलसनजिकच्या मीझा या ठिकाणी त्याने आपले ज्ञानपीठ स्यापन केले. विद्यार्थी गर्दी करू लागले. अलेक्झांडर त्यांपैकी एक. सर्वजण गुरुला वंदनीय मानत. मात्र स्वतंत्र प्रज्ञेच्या अलेक्झांडरने गुरूच्या वलयाचे दडपण येऊ दिले नाही.

एकदा गुरुजींनी सर्वाना प्रश्न केला, ‘‘सर्वसामान्य स्थितीत तुझ्याकडे जर वडिलांचे साम्राज्य आले तर तू काय करशील?’’ बहुतेक सर्वांनी संगितले, की आम्ही आमच्या गुरुवर्यांचा सल्ला घेऊ. अलेक्झांडरचे उत्तर मात्र वेगळे होते. तो म्हणाला, ‘‘मला किंवा कोणाही माणसाला उद्या काय होईल हे खात्रीपूर्वक सांगता येणे शक्य नाही. तशी वेळ आली की मग मला हा प्रश्न विचारा. त्या वेळच्या परिस्थितीनुसार मी उत्तर ठरवीन.’’ अशा स्वतंत्र प्रज्ञेला गुरुजी नेहेमी प्रोत्साहन देत असत. विद्यार्थ्यात सर्जनशील दृष्टी आणि क्षमता निर्माण करणे, हे तर शिक्षणाचे मोठेच दायित्व असते.

मात्र विद्यार्थीदशा संपल्यावरदेखील अलेक्झांडरच्या मनातले उच्च गुरूस्थान अढळ राहिले. एका प्रसंगी तो म्हणाला, ‘‘मला हे जीवन दिल्याबद्दल मी माझ्या पित्याचा ऋणी आहे, परंतु गुणयुक्त जीवन कसे जगावे, याचे ज्ञान मला देणाऱ्या अरिस्टॉटलचा मी आजन्म ऋणी राहीन.’’ नंतर अलेक्झांडरच्या आशियाकडे मोहिमा सुरू झाल्यावर अरिस्टॉटल ज्ञानकेंद्र असलेल्या अथेन्समध्ये रहावयास आला. तिथे त्याने पुन्हा ‘लायसियम’ नामक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. एव्हाना तो पन्नाशीला आलेला होता. या विद्यापीठातून अनेक उत्तम तत्त्वज्ञ विद्यार्थी तयार झाले. प्रकांडपंडित ॲरिस्टॉटलने या दरम्यान पॉलिटिक्स, ऱ्हेटरिक्स, पोएटिक्स आदि उत्तम ग्रंथ लिहिले.

मात्र बॅबिलोनियात अलेक्झांडरचा मृत्यू झाला आणि अॅरिस्टॉटलचे दिवस फिरले. तो मॅसिडोनियाचा हस्तक असल्याची वदंता पसरली. त्यावर खटला भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या. चंचल वृत्तीच्या ग्रीकांनी सॉक्रेटिसला हेमलक विष पाजून मारल्याचे त्याला माहित होते. त्याला तसे मरायचे नव्हते. तेव्हा त्याने पलायन करून मॅसिडोनियातल्या युबिया इथे मुक्काम हलवला. वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्याने देह ठेवला. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’, म्हणजे काय, याची जाणीव करून देणारे हे जीवन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

SCROLL FOR NEXT