विशेष : गांधीजी आणि स्वातंत्र्याचा प्राणवायू
विशेष : गांधीजी आणि स्वातंत्र्याचा प्राणवायू  Sakal news
संपादकीय

विशेष : गांधीजी आणि स्वातंत्र्याचा प्राणवायू

सकाळ वृत्तसेवा

-सत्य नारायण साहू

गांधीजींनी ऑक्सिजनच्या रूपकाचा अधिक समर्पकपणे वापर करत स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. त्याचे महत्त्व आणि लोकांचा अधिकार याविषयी त्यांनी सातत्याने जागर केला. आजच्या गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना दिलेला उजाळा.

अलीकडच्या काळात कोरोना महासाथीच्या संकटात ‘प्राणवायू’ची गरज प्रकर्षाने लक्षात आली. दिल्लीत तर पुरेशा प्राणवायूच्या सिलिंडरअभावी हाहाकार झाला. काही ठिकाणी प्राणवायूची गळती होऊन आगी भडकल्या. यातही निष्पापांचे बळी गेले. प्रत्यक्ष प्राणवायूचं महत्त्व लक्षात आले. पण देशात स्वातंत्र्याचे मोकळे वारे खेळणे, लोकांना मोकळा श्वास घेता येणं याचीही गरज असते. तसे वातावरण निर्माण होण्यासाठी जागरूक जनता आणि उत्तरदायित्व मानणारे सरकार आवश्यक असते. या दोन्ही बाबतीत गांधीजींची, त्यांच्या विचारांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.

देशातील ऑक्सिजन टंचाईविरोधात अनेक जागरूक मंडळी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातदेखील गेली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानची ही स्थिती देश प्रथमच अनुभवत नव्हता. गांधीजींनी सहा जुलै १९२१ रोजी ‘यंग इंडिया’ या नियतकालिकात लिहिलेल्या लेखात नेमकी अशी स्थिती मांडली होती. पुढे पाच मार्च १९२२ रोजी ‘नवजीवन’मधील लेखात त्यांनी भारताकडं पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्यानं देशाचा श्‍वास घुसमटला असल्याचं म्हटलं होतं. हिवतापाच्या साथीचा १९१८मध्ये भारताला जबर फटका बसला होता. त्याहीवेळी गांधीजी सातत्याने सार्वजनिक स्वच्छतेचे, आरोग्याचे महत्त्व पटवून देत होते.

महात्मा गांधी यांचं तत्कालीन बरंचसं लिखाण हे एकाच गोष्टीभोवती केंद्रित होतं ते म्हणजे ऑक्सिजनची उपलब्धता. लोकमान्य टिळक यांचं निधन १९२०मध्ये झाल्यानंतर त्यांचं स्वराज्याचं स्वप्न सत्यात आणण्यासाठी गांधीजींनी कंबर कसली होती. त्यासाठी टिळक स्वराज्य फंडाच्या माध्यमातून देशभरातून एक कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचा निर्धार गांधीजींनी केला होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी लोकांनी सढळ हातानं मदत करावी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं होतं. यासाठी गांधीजी देशभर फिरले. लोकांना भेटले. परकीयांच्या दास्यातून देशाची मुक्तता व्हावी, आपल्या देशानं परकीयांच्या बाजारपेठांवर अवलंबून राहू नये म्हणून ते आग्रही होते. यासाठी गांधीजींनी विशेष रूपकाचा वापर केला होता. कोणतेही यंत्र आणि पंपाशिवाय श्वास घेऊ शकणाऱ्या व्यक्तीचं ते उदाहरण देत असत. तेव्हा देश पारतंत्र्यात होता. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील आपण याबाबतीत आत्मनिर्भर झालेलो नाही. आजही आपल्याला परकी देशांवर अवलंबून राहावं लागतं. महात्मा गांधी यांनी शंभर वर्षांपूर्वी ऑक्सिजनच्या अभावाबाबत केलेलं भाष्य आजही तंतोतंत लागू पडतं. महात्मा गांधी यांनी १९२१ ते १९२२ या काळातील भीषण ऑक्सिजन टंचाईचं ज्या शब्दांत वर्णन केलं होते, तेच शब्द कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेलाही तंतोतंत लागू पडतात.

एकीकडं देशातील लोकांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी जीवघेणी धावाधाव सुरू असताना अनेक नेतेमंडळी प्राणूवायूच्या उपलब्धतेबाबत चुकीच्या आणि बनावट माहितीचा प्रसार करत होती. नेते मंडळी सत्य बोलणाऱ्यांना धमकावत होती. संकटाच्या काळात जनतेचा आवाज दाबण्यात आला. महात्मा गांधी यांनी २८ डिसेंबर १९२१ रोजी अहमदाबाद येथील काँग्रेसच्या अधिवेशनात केलेल्या भाषणामध्ये मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि संघटनेचं स्वातंत्र्य हे दोन घटक माणसाला श्‍वास घेण्यासाठी गरजेचं असल्याचे म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख हा तत्कालीन उर्मट ब्रिटिश सरकारच्या दिशेनं होता. कारण त्यावेळी ब्रिटिशांची दडपशाही टोकाला पोचली होती. गांधीजींनी उल्लेख केलेले मत मांडण्याचं आणि संघटनेचं स्वातंत्र्य हे दोन घटक आजच्या स्थितीत देखील तितकेच महत्त्वपूर्ण ठरतात. कारण नव्या भारतामध्ये विद्यमान सरकार असहमती व्यक्त करणाऱ्यांकडे संशयाने पाहात असतं. जणु काही मतभेद व्यक्त करणं हाच एक गुन्हा आहे. हिवतापाच्या काळातदेखील तत्कालीन ब्रिटिश सरकारची वर्तणूक देखील काहीशी अशीच होती. गांधीजींनी मत मांडण्याच्या आणि संघटनेच्या स्वातंत्र्याला दोन फुफ्फुसांची उपमा दिली होती. फुफ्फुसांचं काम योग्य रीतीनं चालण्यासाठी माणसाला आधी ऑक्सिजन आत घ्यावा लागतो. गांधीजींच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर संघटना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न करणारी देशातील व्यवस्था नष्ट होईल किंवा तिलाच तिच्या कृत्याचा पश्‍चाताप होईल. सध्या सरकारने लोकांचा आवाज दडपण्यासाठी नेमक्या याच रणनीतीचा अवलंब केला आहे.

लंडनमध्ये २३ नोव्हेंबर १९३१ रोजी फेडरल स्ट्रक्चर कमिटीच्या बैठकीत केलेल्या भाषणात गांधीजी म्हणतात, ‘‘ स्वतःच्या जबाबदाऱ्या टाळतानाच प्रांतीय स्वायत्तता देण्याचा ब्रिटिश सरकारचा प्रयत्न हा एखाद्या डॉक्टरने मृत व्यक्तीच्या शरीरात पंपाच्या साहाय्याने ऑक्सिजन भरण्यासारखं आहे. अशा स्थितीत ऑक्सिजन पंप काहीही काम करू शकत नाही. निश्‍चित अशा निर्धाराने आपल्या इच्छित ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या देशाचं सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीमुळं काहीही नुकसान होत नाही. खरंतर सरकारची दडपशाही ही एका अर्थाने ऑक्सिजनचा दुष्काळच असतो.’’ बहुसंख्याकवादाचा पुरस्कार करणाऱ्या शक्ती या नेहमीच राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य आणि देशाचा आत्म्याचा अवमान करतात. गांधीजींनी ऑक्सिजनच्या रूपकाचा अधिक समर्पकपणे वापर करत स्वातंत्र्याची संकल्पना मांडत त्याचे महत्त्व आणि लोकांचा अधिकार अधोरेखित केलेला दिसतो.

पर्यावरणाबाबत विपुल लिखाण

गांधीजींनी प्राणवायूचा रूपकासारखा वापर करताना वायू प्रदूषणाचा धोकाही ठळकपणे मांडला होता. १९१३ साली एका लेखामध्ये त्यांनी आधुनिक संस्कृतीमध्ये हवा विषारी होणार असून लोकांना शुद्ध हवेसाठी शहरांपासून दूर जावे लागणार असल्याचे म्हटले होते. गांधीजींनी त्याकाळी लेखांतून मांडलेले विचार किती प्रस्तुत होते, हे आज आपण अनुभवतो आहोत. कोरोना आणि अन्य आजारांमुळे लोकांना विलगीकरणात राहावे लागत आहे. मद्रासमध्ये १६ फेब्रुवारी १९१६ रोजी विद्यार्थ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये गांधीजींनी शुद्ध हवा आणि मोकळा प्रकाश त्यांना ठाऊक नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. २८ मार्च १९३२ रोजी शिक्षणाबाबत लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी प्रत्येक मुलाने शुद्ध हवा, पाणी आणि पृथ्वी यांचे महत्त्व समजून घ्यावे तसेच हे घटक अधिक शुद्ध कसे ठेवता येतील? हे शिकून घ्यावे आणि त्याचे फायदेदेखील लक्षात घ्यावे, असे म्हटले होते. १९१६ ते १९३२ या काळामध्ये पर्यावरण शिक्षणाशी संबंधित विविध पैलूंवर विपुल लेखन केल्याचे दिसून येते.

मानवजातीला निसर्गाच्या प्रकोपापासून वाचविण्यासाठी हे आवश्‍यक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. शहरांतील स्थिती सुधारत नाही, आपण आपल्या घाणेरड्या सवयी सोडायला तयार नाही. शौचालयांची सोय करत नाही तोपर्यंत आपल्या स्वराज्याला अर्थ नसल्याचे गांधीजींचे प्रामाणिक मत होते. स्वच्छ पर्यावरण आणि सार्वजनिक धोरण यांच्यात योग्य समन्वय आखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अशाच एका रचनात्मक कार्यक्रमात १९४१मध्ये त्यांनी खेड्यांतील स्वच्छतेवर भर दिल्याचं दिसून येतं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींनी स्वच्छतेला एका व्यापक अर्थानं स्थान दिले होते. स्वच्छता मोहीम सार्वजनिक धोरणाचा भाग म्हणून सध्याच्या सरकारने राबविली, त्याचा वैचारिक पायाही गांधीजींचाच होता. पर्यावरण संरक्षण ही सर्वांची जबाबदारी असल्याचं त्यांचं प्रामाणिक मत होतं.

(माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांचे ‘वृत्त सचिव’ म्हणून लेखकाने काम केले आहे.)

अनुवाद : गोपाळ कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT