Marathi Article_Editorial_Dhing Tang_British Nandi
Marathi Article_Editorial_Dhing Tang_British Nandi 
संपादकीय

आमचे देशमुखसाहेब! (ढिंग टांग! )

ब्रिटिश नंदी

इन्किलाब झिंदाबाद! इन्किलाब झिंदाबाद!! प्रदीर्घकाळ चाललेल्या अटीतटीच्या लढतीचा अखेर आईतवारी निकाल लागला. झुंज शर्थीची होती. तुल्यबळांचा चक्रव्यूह भेदून मराठवाड्याच्या सुपुत्राने अखेर जबर्दस्त समशेरबाजी करत विरोधकांस नेस्तनाबूत करून माय मराठीचे किल्ल्यावर आपुली पताका फडकविली. आम-तमाम महाराष्ट्राने त्यांस कुर्निसात करणे उचित ठरावे. वपु:श्रीमान श्रीलक्ष्मीकांतम देशमुखम ह्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवे आयुक्‍त म्हणून निवड झाल्याबद्दल पहिलेछूट आम्ही त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करितो. (रीतीभातीनुसार पुष्पगुच्छ अकोल्यास रवाना करणेत येत आहे.) निवड होताक्षणी मराठी सारस्वतांचा कौल आपण नम्र आणि नम्र, तसेच विनम्रपणे स्वीकारत असून, यापुढे माय मराठीच्या परिक्षेत्रातील बकाली दूर हटविणे, रस्त्यांची डागडुजी आणि स्वच्छता ह्यास आपला अग्रक्रम राहील, असे साहेबांनी जाहीर केले आहे. त्यांस आमच्या शुभेच्छा आहेत. 
शर्थीच्या निवडणुकीत ज्यांना ज्यांना देशमुखसाहेबांच्या तलवारीचे पाणी प्यावे लागले, त्या सर्व पराभूत उमेदवारांस जातीने भेटून त्यांचे मुद्दे संमेलनाध्यक्षांच्या भाषणात वर्ग करण्यात येतील, असेही त्यांनी मोठ्या उमद्या मनाने "फेसबुका'च्या भिंतीवर, आणि "व्हॉट्‌सऍप'च्या संदेशडब्यात नमूद केले आहे. केवढी ही दिलदारी!! हे म्हंजे निवडणूक हरल्यानंतरही काही दिवस सरकारी बंगला ताब्यात ठेवण्यास अनुमती देण्यापैकीच आहे. संमेलनाध्यक्षांच्या (छापील) भाषणात आणखी काय मजकूर असावा, ह्याबद्दल आपल्या सूचनांचे स्वागत आहे, असे त्यांच्या "फेसबुका'च्या भिंतीवर आम्ही वाचले. कर्मधर्मसंयोगाने आम्हीही साहेबांचे "फेबु फ्रेंड' आहो!! (फ्रेंड इन्नीड इज ए फ्रेंड इंडीड!!) त्यामुळे काही सूचना पाठवणे हे आमचे कर्तव्यचि होते व आहे. त्या सर्वसाधारणपणे अश्‍या : 
1. 91 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन (बडोदे प्रांत) अशा शीर्षकाची नस्ती (पक्षी : फाइल) तयार करावी. आवक/जावक नोंद ठेवावी. 
2. शासनमान्यताप्राप्त नियतकालिकात शासकीय नियम व दरानुसार खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध करावी : 
""साहित्यविषयक शिफारशी व सूचना मागविणेत येत असून ता. 25 डिसें. 2017 पूर्वी त्या पाठविणे आवश्‍यक आहे. तद्‌नंतर प्राप्त होणाऱ्या शिफारशी वा सूचनांचा विचार केला जाणार नाही, ह्याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी...'' 
3. 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदे येथे होत असून हे गाव गुजरातमध्ये येते, ह्याची कृपया आपण (!) नोंद घ्यावी. 
4. आपल्या "इन्किलाब आणि जिहाद' ह्या तगड्या ग्रंथराजाच्या प्रती तेथे नेऊ नयेत! नेल्यात तरी मर्यादित संख्येतच न्याव्यात!! ग्रंथ उत्तम असला तरी टायटल जरा ज्यास्तच हेवी आहे!! सिंव्हाच्या गुहेत चिकन टिक्‍का न्याच कशाला? 
5. मराठी साहित्य महामंडळाच्या कचेरीत एक राऊंड मारावी. तेथे एक डॉक्‍टरसारखे दिसणारे व मोठ्या आवाजात बोलणारे सद्‌गृहस्थ भेटतील. गेल्या गेल्या ते "काय होतंय?' असेच विचारतील. पण ते साहित्याचे "डॉ.' आहेत. घाबरू नये! त्यांचे नाव श्रीश्रीपाद जोशी असे आहे. त्यांस बघून ठेवावे!! 
6. बघून ठेवलेल्या ह्या जोशीगृहस्थांना (संधी बघून) चांगली तंबी भरावी!! कारण स्वत:चे तीन हजार रुपये भरून त्यांनी बडोदे ट्रिप बुक केली असून, इतरांनीही तसेच करावे, असे सांगत ते फिरत आहेत!! मराठी सारस्वतांच्या कमरेत उसण भरविणारे हेच ते गृहस्थ!! 
7. अध्यक्षीय भाषण आज-उद्याकडेच लिहून काढावे. उगीच त्यात रहस्यमयता आणण्याची गरज नाही. मराठी साहित्याला ठोस कार्यक्रम देण्याची मागणी गेली अनेक वर्षे चालू आहे. दरवर्षी संमेलनाध्यक्षांच्या भाषणातून ठोस कार्यक्रम देऊ करणेही चालूच आहे. आमच्या मते चांगली पुस्तके मजबूत खपावीत, आणि लेखकांना "ऍक्‍टिवा' स्कूटर घेण्याइतपत बरकत यावी, हाच खरा ठोस कार्यक्रम आहे!! तेवढे बघावे, बाकी आपल्याला सर्व ठाऊकच आहे साहेब! आणखी काय बोलायचे? ओळख ठेवावी! 
पुन्हा शुभेच्छा! (पुष्पगुच्छ धाडून राहिलो आहो!) कळावे. 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT