Dhing Tang by British Nandi
Dhing Tang by British Nandi 
संपादकीय

जाकिट! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

बेटा : ('रॉकस्टार'सारखी जोशात एण्ट्री घेत...) ढॅणट ढॅऽऽण! यो, मम्मा, आयॅम बॅक! 
मम्मामॅडम : (गंभीरपणे पेपर वाचण्यात मग्न...) हं! 

बेटा : (आश्‍चर्यानं थक्‍क होत) मम्मा, आय सेड, आय ऍम बॅक! 
मम्मामॅडम : (मान वर न करता)...हंहं!! 

बेटा : (स्टायलीत गॉगल ठीकठाक करत) जस्ट लुख ऍट मी, मम्मा!! काय वाचते आहेस एवढं पेपरात? माझा फोटो आला असेल...हो ना? 
मम्मामॅडम : (तंद्रीत) हं!! 

बेटा : (वैतागून) कमॉन, मी इतक्‍या लांबून आलो, आणि तुम्ही हे असं थंड स्वागत करता!! पिकतं तिथं विकत नाही, हेच खरं!! ह्यापेक्षा आमच्या गुजराथमध्ये- 
मम्मामॅडम : (गुजराथचे नाव काढताच दचकून) क...क...काय झालं? काय झालं गुजराथमध्ये? 

बेटा : (टाळी वाजवत) हाहा!! गुजराथचं नाव घेतलं की मॅडम खूप सीरिअस होतात, असं मला अहमद अंकलनी सांगितलंच होतं!! अगदी तस्संच घडलं!! 
मम्मामॅडम : (किंचाळत) ओह, माय गॉड...हा कुठला तुझा नवा अवतार? 

बेटा : (स्वत:कडे बघत) अवतार कसला? माझा नवीन पोशाख आहे हा!! योऽऽ..!! 
मम्मामॅडम : (धक्‍का बसून) तुझा नेहमीचा कुर्ता आणि पायजमा कुठे गेला? 

बेटा : (शांतपणे) धुवायला!! 
मम्मामॅडम : (आणखी धक्‍का बसून) आणि जीन्स? 

बेटा : (आणखी शांतपणे) धुवायलाच!! 
मम्मामॅडम : (विचित्र चेहरा करत) बेटा, हा काय ड्रेस झाला का? आपल्याला असं शोभत नाही!! उद्या बर्म्युडा घालून कोणी प्रचार सभेला जाईल का? पॉलिटिशयननं कसं साधं आणि सिंपल राहिलं पाहिजे!! हे बूट काय, गॉगल काय...जाकिट काय!! 

बेटा : (खुलासा करत) हे साधंसुधं जाकिट नाही, मम्मा...बरबेरीचं इम्पोर्टेड जाकिट आहे!! हजार डॉलर्स किंमत आहे!! दॅट कम्स अराऊण्ड चौसष्ट हजार रुपये!! 
मम्मामॅडम : (खचून जात) ओह, गॉड...एवढ्या पैशात शेकडो कुर्ते-पायजमे शिवून झाले असते!! 

बेटा : (दुर्लक्ष करत) शिलॉंगमध्ये एका रॉन कन्सर्टला गेलो होतो!! तिथं मला हे जाकिट घालावं लागलं!! मी स्टेजवर गेलो होतो ना... 
मम्मामॅडम : (हादरून) तू गाणंबिणं म्हटलंस की काय? 

बेटा : (किंचित संकोचत) लोकांनी खूप आग्रह केला. पण माझा आवाज बसलाय, असं सांगून मीच टाळलं!! ऍक्‍चुअली, 'रश्‍के कमर...' हल्ली मी बऱ्याचदा गुणगुणत असतो!! 
मम्मामॅडम : (नि:श्‍वास सोडत) थॅंक गॉड! 

बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) मम्मा, मीसुद्धा यापुढे फाइनाबाज जाकिट वापरणार!! 
मम्मामॅडम : (संयमानं) मग तुझ्यामध्ये आणि त्या 'नमो फॅशन'वाल्यांमध्ये काय फरक राहील? आपल्याकडे साधं राहण्याची पद्धत आहे, बेटा!! हे त्या नतद्रष्ट कमळवाल्यांना शोभतं!! तुझ्या जाकिटावर लोक किती टीका करतायत, ते वाच एकदा पेपरात!! नोटाबंदीच्या रांगेत उभं राहाता, मग महागडं जाकिट कसं परवडतं? असं विचारतायत ते लोक आता!! काय उत्तर देणार? 

बेटा : (वैतागून) काय करावं हेच कळत नाही!! मागल्या खेपेला मी एकदा जाहीर सभेत कुर्त्याचा फाटका खिसा दाखवला होता...आठवतंय? 
मम्मामॅडम : (प्रेमभराने) केवढा अभिमान वाटला होता तुझा तेव्हा म्हणून सांगू!! 

बेटा : (युक्‍तिवाद करत)...तेव्हाही टीका झाली होती!! 'फटी जेबवाला युवराज' म्हणून! आता चौसष्ट हजाराचं जाकिट घालूनही टीका होतेच! ह्याला काय अर्थंय? 
मम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) आपल्याकडे कोणी असली जाकिटं घालत नाही रे बेटा!! 

बेटा : (निर्णय घेत) करेक्‍ट...मग मी नवा पक्षादेश काढतो!! आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं बरबेरीचं जाकिट घालावं!! पण त्याला 'रागा'जाकिट म्हणावं!! ओके?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT