संपादकीय

हुश्‍श! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

सुटलो एकदाचे! गेले महिनाभर आम्हाला भयंकर टेन्शन आले होते. गुजराथेत काय होणार? ह्या प्रश्‍नाने आमची झोप की हो उडाली होती. गेले तीन-चार दिवस तर आम्ही अन्नपाणीही कंप्लीट सोडले होते. काय करणार? गुजराथेतून येणाऱ्या बातम्यांनी आम्हाला इतके वेडे केले होते की लोकांनी आम्हांस ''विकाऽऽस ए विक्‍याऽऽ...'' अशी हाक मारायला सुरवात केली होती. परंतु, एकदाचे गंगेत घोडे न्हाले!! शेवटी आम्ही सांगितलेला अंदाजच करेक्‍ट ठरला, अचूक ठरला, बरोबर ठरला!! 

तसे पाहू गेल्यास, आमचे निवडणुकीचे अंदाज सहसा म्हंजे कधीच चुकत नाहीत. 'आमचे अंदाज चुकले तर पुन्हा पत्रकारिता म्हणून करणार नाही,' अशी घनघोर प्रतिज्ञा आम्ही केली होती. 
''अंदाज चुकला तर अग्निकाष्ठ भक्षण कराल का?'' असे आव्हान आम्हाला कुणीतरी दिले होते. ते आव्हान नसून विनंती आहे, हे उशिरा कळले!! काय असेल ते असो, आम्ही ते आव्हान म्हणूनच स्वीकारले. 'अग्निकाष्ठ भक्षण करणे' म्हंजे तंदुरातून नुकतेच काढलेले कबाब भक्षण करण्याइतके सोपे आहे, असेच आम्ही भासवत होतो. शिवाय आम्ही रोज आम्हास गायछापसोबत चुना जरा ज्यास्तच लागतो, त्यामुळे आमचे तोंड हे कायम अग्निकाष्ठ भक्षण केल्यासारखेच असते. साहजिकच हे आव्हान स्वीकारणे आमच्यासाठी डाव्या हाताचा मळ होता. असो. 

सर्वप्रथम आम्ही गुजराथेत पुनश्‍च भरघोस यश मिळविल्याबद्दल कमळाध्यक्ष मोटाभाई अमितभाई साहा ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करू! त्यांना दीडशे शिटांचे बुकिंग हवे होते, पण तेवढे नाही जमले तरी (त्यांच्या मानाने) बरेच जमले म्हणायचे. त्यांना अभिनंदनाचे हस्तांदोलन करून लागलीच हात (आमच्याच) पाठीमागल्या बाजूला पुसून त्याच हाताने इतिहासातील पहिलेवहिले जनेऊधारी कांग्रेसाधीश पं. राहुलजी गांधीजी ह्यांचेही अभिनंदन करू!! पं. राहुलजी ह्यांनी गुजराथेतील 27 देवळात जाऊन सांकडे घातल्यानेच त्यांना इतके जबर्दस्त यश मिळाले, ह्यात आमच्या मनीं तरी शंका नाही. 

उपरोक्‍त दोघांनाही घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल गुजराथी मतदारांचेही डब्बल अभिनंदन न करण्याइतकेही आम्ही नीच नाही!! तेव्हा त्यांचेही (अक्षरश:) हार्दिक अभिनंदन!! 

काहीही व्हावे, परंतु आमचे भाकित ऊर्फ अंदाज ऊर्फ एग्झिट पोल खरे ठरावे, येवढीच आमची माफक इच्छा होती. नाही म्हटले तरी आम्ही पत्रकारितेत काही नावलौकिक मिळवून आहो. नाही म्हटले तरी आमच्या अंदाजांकडे साऱ्यांचे बारीक लक्ष असते. नाही म्हटले तरी आम्ही राजकीय समीक्षकांमध्ये आघाडीलाच असतो. आमचे अंदाज चुकले असते तर आमची प्रतिष्ठा लयाला गेली असती. अंबाजी मातेची कृपा!! 
गुजराथच्या निवडणुकीचे अंदाज व्यक्‍त करून झाल्यानंतर मात्र आम्हाला भयंकर टेन्शन आले. अग्निकाष्ठ नाही, पण नसते शुक्‍लकाष्ठ मागे लागले असते. माणसाने कुप्रतिष्ठेला भ्यावे!! 

आता नमनाला येवढे घडाभर तेल घालून झाल्यावर आमचे पोलिटिकल अन्यालिसिस असे : 1. जनेऊधारी पं. राहुलजी गांधी ह्यांची गाठ जगातल्या भयंकर व्यक्‍तीशी पडली होती, हे त्यांच्या मातोश्रींचे मत आम्हाला मान्य आहे. कां की त्यांच्या नव्याकोऱ्या जनेऊच्या ब्रह्मगाठेत वाट्टेल त्या असुरांस भस्म करण्याची शक्‍ती असूनही त्यांनी वेळेवर ती गांठ पुढे आणली नाही! अनेकदा जनेऊ फार अडचणीचे असते!! असो. 2. मोटाभाई ऊर्फ अमितभाई साहा ह्यांना दीडशे शिटांचे गणित अखेर जमवता आले...त्यांनी 28 टक्‍के जीएसटी लावल्याचे आत्ता लक्षात येत आहे!! 3. एकंदरित गुजरात इलेक्‍शन हा राष्ट्रीय पातळीवरील इव्हेंट ठरला. 

आमचे खरे ठरलेले अंदाज असे : 1. मोटाभाई जिंकतील! 2. पं. राहुलजी जिंकतील! आणि 3. नेमके कोण जिंकले ह्यावर पुढचा महिना आरामात निघून जाईल!...तिन्ही अंदाज खरे ठरवल्याबद्दल गुजराथी मतदारबांधवांचे शतप्रतिशत आभार!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT