ireland
ireland 
संपादकीय

आयर्लंडमधील पहाट 

वृत्तसंस्था

आयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे. या हक्कासाठी तेथील स्त्रियांना तीन दशके चळवळ करावी लागली, ही बाब स्त्री-स्वातंत्र्याच्या बाबतीत विविध समाजांची वाटचाल कशी रखडणारी आहे, याचेच द्योतक. सरंजामशाहीच्या मध्ययुगीन कालखंडातून युरोप आधुनिकतेच्या युगात प्रविष्ट झाला, तो विज्ञानाच्या उदयामुळे. त्यातून परंपरागत समजुतींना, विषमतांना धक्के बसले. व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य पुढे आले. परंतु एकविसाव्या शतकातील दुसरे दशक संपत आले तरी हे परिवर्तन पूर्णत्वास गेले नाही, याची दुखरी जाणीव आयर्लंडसारख्या देशातील कायदेकानू करून देतात. कॅथलिक चर्चचा तेथील राजकीय व्यवस्थेवर पगडा असल्याने गर्भपाताला बंदी घालणाऱ्या कायद्याला आजवर कोणी हात लावू शकले नव्हते. 1983 मधील आठव्या घटनादुरुस्तीने गर्भाचा आणि मातेचा हक्क समान राहील, अशी तरतूद करून स्त्रियांवरील निर्बंधांना भलीभक्कम चौकट बहाल केली. बलात्काराने लादले गेलेले गरोदरपण, गर्भात जन्मतःच विकृती असणे अशा वेगवेगळ्या परिस्थितीतील संबंधित स्त्रियांच्या मतालाही किमत राहिली नाही. मानवी हक्कांची ही उघडउघड पायमल्ली होती. तेथे त्याविरोधात आवाज उठत होता; परंतु जनमताचा रेटा अधिक परिणामकारक ठरला सविता हलप्पनवार या भारतीय वंशाच्या महिलेच्या मृत्यूनंतर. ती गरोदर असताना जंतुसंसर्गाने निर्माण झालेल्या गुंतागुतीच्या परिस्थितीत तिचा जीव गर्भपाताने वाचू शकला असता. परंतु कायदा आड आला. स्त्रियांना दुय्यमत्व देणाऱ्या या प्रतिगामी कायद्याने तिचा बळी घेतल्याची भावना बळावू लागली. त्याचीच परिणती सार्वमतातील विजयातून आली आहे. आयर्लंडच्या पंतप्रधानांनी याचा "मूक क्रांती' असा उल्लेख केला, तो अगदी समर्पक आहे. आता लवकरच सार्वमताला अनुसरून नवा कायदा संमत केला जाईल, अशी अपेक्षा आहे. एकूणच अमेरिका व युरोपमध्ये परंपरावाद वेगळ्या प्रकाराने पुन्हा डोके वर काढू लागला असताना आयर्लंडमध्ये स्त्रियांच्या हक्कांना उचलून धरणारे सार्वमत प्रकटले, ही आश्‍वासक बाब आहे. जागरूक लोकशक्ती काय घडवू शकते, याचे प्रत्यंतर त्यातून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT