Nagpur Shreyas Bhave young write experiment in literature
Nagpur Shreyas Bhave young write experiment in literature sakal
संपादकीय

साहित्यातील नागपुरी ‘भावे’ प्रयोग!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! यावेळी उच्चारलेला नअस्कार हा लिपस्टिकमुळे नव्हे, तर तोंडात बोटं घातल्यामुळे झाला आहे. माणसानं लिहावं तरी किती आणि काय आणि कुठल्या वयात? नागपूरचा एक गिटार वाजवणारा हँडसम तरुण उठतो काय, आणि सटासट तीन ऐतिहासिक थरार कादंबऱ्या लिहून काढतो काय...सगळंच अतर्क्य! मी श्रेयस भावेबद्दल बोलतेय...

श्रेयस भावे हा युवा लेखक (खरं तर आथर म्हणायला हवं!) सीताबर्डी किंवा महालात भेटला तर त्याच्याकडे बघून तुम्ही म्हणणारसुद्धा नाही की हा तगडा लेखक आहे म्हणून! छान कोरीव दाढी, नुकतेच केस कापून आल्यासारखा मस्त चेहरा, नाकीडोळी नीटस, अंगात बिन कॉलरीची जर्सी, पायात खेळजोडे (पक्षी : स्पोर्टशूज) सीसीडीतल्या कोपऱ्यात बसलेली तरुण मंडळी दिसतात नं, अगदी तस्सा!

मुलगा इंजिनीअर आहे बरं! नागपूरच्याच व्हीएनआयटीमधून इंजिनीअर झालाय. साधासुधा नाही, चांगला रेल्वे एक्सपर्ट आहे म्हणे! गिटार वाजवतो. गाणी म्हणतो, चालीही देतो! एवढंच नाही तर नवउद्योजकांसाठी कसलंसं पोर्टलही चालवतो. त्याला हिंडायला आवडतं. एवढं करुन छंद कसला? तर कादंबऱ्या लिहिण्याचा. कुणी म्हणेल, काय हे नसतं अवलक्षण?

...वरचं वर्णन ऐकून अनेक होतकरु आणि उपवर कन्यांचे जन्मदाते नागपूरच्या आड्रेसवर कार्ड लिहायला घेतील किंवा कुंडल्या तरी टाकतील, पण तसं कृपया करु नका! आधी श्रेयसनं लिहिलेली नवीकोरी ऐतिहासिक कादंबरी त्रिधारा ऑनलाइन मागवा, आणि वाचा! या तिन्ही कादंबऱ्या मराठी साहित्य जगतात सध्या उधम मचवून ऱ्हायल्या आहेत.

तेवीस वर्षाच्या या प्रतिभावान तरुणानं (इंजिनीअर असूनही) तेवीसशे वर्षांपूर्वीचा इतिहास खंगाळून तीन-तीन कादंबऱ्या इंग्रजीत लिहिल्या. एक, प्रिन्स ऑफ पाटलीपुत्र, दोन, स्टॉर्म ऑफ तक्षशीला आणि तिसरं, नेमेसिस ऑफ कलिंगा! सर्व मिळून हजार-बाराशे पानांचा ऐवज आहे. चाणक्य, चंद्रगुप्त आणि अशोक हे त्याचे कथानायक.

श्रेयस एकदा नागपूरहून उठून जुनागढला गेला. तिथे गिरनार पर्वत चढला (आणि उतरलादेखील.) तिथली चंद्रगुप्त आणि अशोककालीन बौद्ध लेणी नि गुहा बघून त्याला वाटलं की कुठे बिहारमधलं पाटलीपुत्र आणि कुठे हे जुनागढ! नागपूरला वापस चाल्ला गेला नि गिटारबिटार गुंडाळून सटासटा तीन कादंबऱ्याच लेहून काहाडल्या नं भौ! त्यासुद्धा इंग्रजीत बरं!! हे तं फारच झालं नं? ‘‘मराठीले दूर सारुन इंग्रजीमधी का लेहेलं, माह्या भावा?’’ असं विचारलं तर म्हणे की, ‘ग्लोबल वाचक मिळवण्यासाठी बरं पडतं!’

मध्यंतरी अनुवादक शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी लेखक श्रेयस भावे यांची इंग्रजीत मुलाखत घेऊन मराठीत प्रसिद्ध केली. त्यात श्रेयसभाऊ म्हणतात की, ‘‘भारताचा देदिप्यमान इतिहास, माझा कल्पनाविलास आणि सहस्त्रबुद्धे यांचा रसाळ अनुवाद या तीन कारणांसाठी मराठी वाचकांनी या कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत! मी स्वत: मराठीचे दोन भाग आत्ता संपवले, तिसरा संपवत आणला आहे...मजा येते!’’ (येऊ दे, येऊ दे!)

युवालेखक श्रेयस भावे यांना सध्या ग्लोबल वाचक भरपूर मिळत आहेत, आणि यापुढेही मिळोत! परंतु, आम्हां लोकल वाचकांबद्दल कमालीची कणव असलेले आमचे ‘राजहंस’राव माजगावकर यांनी मात्र या तिन्ही कादंबऱ्यांचा शिरीष सहस्त्रबुद्धे यांच्याकरवी मराठीत अनुवाद करुन घेतला आहे. तोच मी परवा (विकत) आणून घरात ठेवला. आणताना टेक आली. तीन खंडांचा ऐवज!निव्वळ वजनात कोथरुडची एक मराठी वाचक (पक्षी : मी हं!) खलास झाली. मराठी साहित्यातला हा (इंग्रजी) भावेप्रयोग भविष्याची नांदी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT