संपादकीय

पहाटपावलं : दृष्टिआड...

आनंद अंतरकर

माणसाच्या दृष्टीतच सारं दडलेलं आहे. दृश्‍य चित्रातलं असो की प्रत्यक्ष निसर्गातलं असो - ते म्हणतात, 'beauty ries in beholder`s eyes'. साहित्यातल्या श्‍लील-अश्‍लीलाविषयी ते सांगतात, 'प्रत्यक्षात श्‍लील-अश्‍लील असं काही नसतं, असतं ते केवळ माणसाच्या नजरेत'. 'दृष्टिआड सृष्टी' या द्विशब्दी मराठी म्हणीचा अर्थ किती व्यापक नि समर्पक आहे...तुझ्या दृष्टीत सारी सृष्टी सामावलेली आहे, तू किती पाहू शकतोस यावर तुझ्या दृष्टीची क्षमता अवलंबून. 'ओल्ड टेस्टॅमेंट'नं तर सांगूनच टाकलंय की, 'where there is no vision, the people perish.'


दृष्टीचा आवाका फार मोठा आहे. साहित्यातली जाण अधिकाधिक प्रगल्भ आणि सूक्ष्म होण्यासाठी वाचकाला आणि त्यातून परिणत होणाऱ्या लेखकालाही खूप परिश्रम घ्यावे लागतात. कलाविषयक दृष्टी ही कोणाला आपोआप लाभत नाही. त्यासाठी चिकित्सक व्यासंगाची गरज असते. सततचं मनन, चिंतन, परिशीलन, परीक्षण यातूनच चांगला आस्वादक घडत असतो. अशी तयारी झाली की वाळूच्या एखाद्या कणात सारं विश्‍व सामावलं असल्याचं तुम्हाला जाणवू लागेल. एखाद्या झऱ्यामधल्या खडकातून निघणारे मोझार्ट-बिथोवनचे सूर कानावर पडत असल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. फुलपाखराच्या रंगवेल्हाळ रेशमी पंखांनी तुम्ही गगनभरारी मारू शकाल. एखाद्या रानटी फुलामध्ये स्वर्ग वसत असल्याची जाणीव होऊ लागेल. अखेर काय? आपल्या नजरेला सतत धार लावून ती अधिकाधिक भेदक बनवणं तुमच्या हातात असतं.


माणसाच्या नजरेची मर्यादा किती? समजा तुम्ही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्ताचं दृश्‍य न्याहाळता आहात. तुम्ही नजर एकवटून लांबवर पाहत राहता. सूर्य समुद्रात बुडतो आणि रंगाळलेल्या क्षितिजाच्या पार दृष्टी लावण्याचा, आकाशपटल भेदण्याचा तुम्ही प्रयत्न करता. ही नजर जिथवर पोचू शकते, तिथवरच माणसाच्या आवाक्‍यातलं अनंतत्व अस्तित्वात असतं. पुढचं सगळं अपार, अज्ञात आणि अकल्पनीय. रेल्वेचे दोन रुळ खरं तर शेवटपर्यंत समांतर चालत असतात. पण लांबच लांब मर्यादेनंतर ते एका शून्य बिंदूला जाऊन मिळतात आणि तिथं चक्क एकरूप झाल्यासारखे दिसतात. दोघांमधलं अंतर अदृश्‍य आत्म्याचं परमात्म्याशी मिलन असंच तर होत नसेल?


कॅमेऱ्यामधल्या लेन्सच्या रचनेमध्ये 'क्‍लोजअप', 'वाईड अँगल', 'इन्फिनिटी' अशी दृश्‍यात्मकता योजलेली असते. लेन्स 'इन्फिनिटी'ला लावली की अनंतापर्यंतचं सारं दृश्‍य कॅमेऱ्यात कैद होतं. कॅमेऱ्याचं मन माणसाच्या मनापेक्षा अधिक संवेदनशील. माणसानं विचार न केलेले आणि त्याच्या नजरेतून निसटलेले कित्येक बारकावे त्याच्या आवाक्‍यात येतात.
माणसाला आणखी एका प्रकारचे डोळे असतात. मनःचक्षू किंवा अंतर्चक्षू. मूलतः जन्मांध असलेली आणि तरीही दुर्दम्य आत्मविश्‍वासाचं प्रतीक ठरलेली हेलन केलर या दृष्टीविषयीचा आपला अनुभव सांगताना म्हणते, ''जगातल्या अतिसुंदर आणि अत्युत्तम गोष्टी दृष्टीनं किंवा स्पर्शानं अनुभवता येत नाहीत, त्या हृदयाद्वारे जाणाव्या लागतात.''
जीवन म्हणजे काय? माणसाला झालेला एक सगळ्यात मोठा दृष्टिभ्रम. अखेर तो असतो शून्याकडून सुरवात करून, अनेक शून्यं पार करीत केलेला, एका 'व्हॅनिशिंग पॉइंट'कडे म्हणजेच अंतिम शून्याकडे पोचण्याचा कालबद्ध प्रवास.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT