state-poltical
state-poltical 
संपादकीय

राज्याच्या राजकारणाची नवी रूपरेखा

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राची २०१९ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादापेक्षाही राज्याच्या प्रश्‍नांवरून लढविली गेली. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे म्हणता येईल. नव्या नेतृत्वाचा शोध या निवडणुकीने घेतला. भाजपने कोकण वगळता राज्याच्या सर्व भागांत चांगली कामगिरी केली व सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र त्या पक्षाला बहुमत मिळालेले नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाला असलेले वलय पुन्हा उजळून निघाले. तर शिवसेनेतील पिढीबदलही अधोरेखित झाला. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली, तर काही गोष्टी स्पष्ट होतात. या निवडणुकीत ‘महायुती’ वरचढ ठरली, जुन्या जाणत्या नेत्यांचा प्रभाव दिसला, त्याचबरोबर नव्या नेतृत्वाचा उदयही दिसून आला. या निवडणुकीचे एक ऐतिहासिक प्रतीक म्हणजे साताऱ्याची सभा. त्यातून शरद पवारांच्या नेतृत्वाला नव्याने दिव्यवलय प्राप्त झाले. उदयोन्मुख नेतृत्वात रोहित पवार, संदीप क्षीरसागर, धीरज देशमुख, सुनील शेळके, ऋतूराज पाटील इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. ही निवडणूक कोणत्याच राजकीय पक्षाला निखळ यश देणारी जशी नाही, तशीच ती कोणत्याही पक्षाला चीतपट करणारीदेखील नाही. या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन रूपरेषा निश्‍चित केली. अप्रत्यक्षपणे या निवडणुकीने महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाला नवी दिशा दिली. शहरी विरोधी ग्रामीण, मुंबई विरुद्ध उत्तर महाराष्ट्र- विदर्भ आणि मराठवाडा विरुद्ध पश्‍चिम महाराष्ट्र असा अंतराय या निवडणुकीने घडविला. ही निवडणूक राष्ट्रवादापेक्षादेखील राज्याची म्हणून झाली.

पक्षांची कामगिरी
विधानसभा निवडणूक निकालातून भाजप हा एक मोठा पक्ष म्हणून पुढे आला. परंतु एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. या अर्थाने हा त्रिशंकू निकाल आहे. परंतु, भाजप-शिवसेना या पक्षांना युती म्हणून बहुमत मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महाआघाडीस बहुमत मिळाले नाही. बहुमताच्या अर्थाने महाआघाडीचा पराभव झाला. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपची कामगिरी कोकण वगळता जवळपास सर्व विभागात इतर पक्षांच्या तुलनेत चांगली झाली आहे. विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजपची कामगिरी विशेष दखल घेण्यासारखी आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षांतरित नेतृत्वाचा फार उपयोग झाला नाही. परंतु भाजपने गेल्या निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीतील सातत्य राखण्यासाठी उपयोग झाला. तसेच भाजपला या भागात शरद पवार लाटेला तोंड देता आले. मुंबई-ठाणे-पालघर या शहरी भागातील भाजपची कामगिरी दोन्ही काँग्रेस आघाडीच्या तुलनेत खूपच सरस आहे. किंबहुना काँग्रेसच्या महाआघाडीचा रथ या शहरी भागात भाजपने अडवला. दोन्ही काँग्रेस व मनसेची कामगिरी या शहरी भागात दुबळी झाल्यामुळेच मराठी मतदारांचा कल शिवसेना पक्षाकडे वळला. किंबहुना अप्रत्यक्षपणे दोन्ही काँग्रेसने भाजप विरोधात शिवसेना पक्षाला या शहरी भागात मदत केली. मुंबई, ठाणे पालघर या विभागात भाजप- शिवसेना आघाडीचे वर्चस्व दिसते. परंतु या शहरी भागात तरीही शिवसेना- भाजप अशीच स्पर्धा अंतर्गत होती. या स्पर्धेत भाजपच्या तुलनेत शिवसेना वरचढ ठरली. कोकण विभागात सर्वात चांगली कामगिरी शिवसेना पक्षाने केली. शिवसेनेच्या तुलनेत भाजपची कामगिरी कोकणात अत्यंत ढिसाळ झाली. कोकण विभागात राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी फार सुधारली नाही. काँग्रेस पक्षाकडून जवळपास कोकण विभाग निसटून गेला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपची कामगिरी शिवसेना पक्षांच्या तुलनेत खूपच उजवी झालेली आहे. शिवसेना पक्षाची कामगिरी येथे या निवडणुकीतदेखील सुधारली नाही. परंतु दोन्ही काँग्रेसचे एकत्रित बळ मात्र भाजप शिवसेनेइतके आहे. म्हणजेच दोन्ही आघाड्यांना उत्तर महाराष्ट्रात समसमान प्रतिसाद मिळालेला दिसतो. थोडक्‍यात या विभागात दोन्ही काँग्रेसची कामगिरी सुधारली असे चित्र पुढे येते. मराठवाडा विभागात भाजपची कामगिरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत दुय्यम दर्जाची झाली. तरीही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना समान प्रतिसाद मिळालेला दिसतो. काँग्रेस पक्षाचीदेखील मराठवाडा विभागातील कामगिरी सुधारलेली आहे. थोडक्‍यात मराठवाडा विभागात चारही पक्षांना आधार मिळालेला दिसतो. त्यामुळे हा विभाग ठामपणे कोणत्याही एका पक्षाच्या मागे उभा राहिला नाही. विदर्भ विभागात भाजप शिवसेनेची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या जवळ जाणारी झाली. विदर्भ विभागात काँग्रेस विरोधी भाजप अशी सत्तास्पर्धा होती. या स्पर्धेत भाजपने काँग्रेसला मागे टाकले. या विभागात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे विदर्भ विभागात द्विपक्षीय स्पर्धा होती. द्विपक्षीय स्पर्धेमध्ये इतरांचे स्थान दुय्यम ठरले. विधानसभा निवडणुकाच्या निकालात प्रत्येक विभागात वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा दिसून आली. विदर्भात भाजप वरचढ ठरली. मुंबई, ठाणे-पालघरमध्ये शिवसेना वरचढ ठरली. मराठवाडा विभागामध्ये जवळपास सर्वच पक्षाचे स्थान समान राहिले आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप हा वर्चस्वशाली राहिला. 

नवीन प्रारूपांचा उदय
निवडणुकीमध्ये तीन वेगवेगळी प्रारूपे उदयास आली. शरद पवारांच्या जुन्या प्रारूपाची पुनर्रचना झाली. शरद पवारांचे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला मान्य आहे, असा निकाल दिला गेला. शरद पवार आणि तरुण वर्ग यांच्यामध्ये एक नवीन पूल बांधला गेला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मराठा आणि ओबीसी असा समझोता घडवला गेला. त्यांच्या पक्षांमधील या दोन्ही समाज गटांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत या निवडणुकीने शरद पवारांचे नेतृत्व आम सहमतीने स्वीकारले. विशेष या निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी शरद पवारांचे समर्थन केले. सोशल मीडियाने शरद पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. शहर आणि ग्रामीण यापैकी शहरी मतदारांच्या तुलनेत ग्रामीण मतदारांमधून ‘शरद पवार प्रारूप’ पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यामध्ये एकोपा झाला. त्यांच्यातील मतभिन्नता कमी झाली. सत्तरीच्या दशकापासून काँग्रेसमध्ये तीव्र शरद पवारविरोध होता. तो विरोध या निवडणुकीत विरघळला. काँग्रेसने अबोल पद्धतीने शरद पवारांचे नेतृत्व मान्य केले. शरद पवारांनी काँग्रेस विरोधाला बाजूला ठेवले. या निवडणुकीमध्ये ‘देवेंद्र फडणवीस प्रारूपा’चा उदय झाला. विशेष त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये देवाणघेवाणीचे सूत्र राबविले. त्यामुळे नरेंद्र मोदी-अमित शहांनी प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. हा संवादाचा पूल तयार झाला नसता तर भाजपची पडझड झाली असती. तसेच फडणवीसांनी सहकार क्षेत्रांशी संबंधीत मराठा आणि भाजप यांच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा पूल बांधला. या आधी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रात मोठी कामगिरी केली होती. विदर्भातील सहकार क्षेत्रात संघाशी संबंधीत नेत्यांचे काम होते. परंतु यापेक्षा वेगळी भूमिका फडणवीसांनी पश्‍चिम महाराष्ट्रात घेतली. त्यांनी सहकार चळवळीच्या मर्यादा लक्षात घेऊन या नेत्यांना भाजपचा आधार म्हणून उभे केले (विखे, पाटील, भोसले). यामुळे जुनी भाजप मागे पडली. नवीन भाजप पुढे आली. नवीन भाजपमध्ये फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष केला, भाजप अंतर्गत जुन्या गटाशी संघर्ष केला, तसेच त्यांनी शिवसेनेशी संघर्ष केला. त्यांनी या नवीन तीन गोष्टी घडवल्या आहेत. तिसरे प्रारूप म्हणजे शिवसेनेचे. शिवसेना पक्षाने भाजपशी संघर्ष केला, परंतु गरज म्हणून जुळवून घेतले. तसेच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडील शहरी भागातील मतदार वर्ग शिवसेनेकडे वळवला. यामुळे शिवसेना आक्रमक न राहताही जुन्या शिवसेनेच्या जवळ जाणाऱ्या जागा मिळवित राहिली. भाजपला कमी जागा मिळण्यामुळे तर शिवसेनेचे महत्त्व जास्त वाढले आहे. यामुळे भाजप इथून पुढे थेट शिवसेनेशी संघर्ष करू शकणार नाही. यामुळे फडणवीस प्रारूप आणि ठाकरे प्रारूप यांच्यामध्ये पुन्हा समझोता घडला आहे. तर ‘शरद पवार प्रारूप’ म्हणजे ग्रामीण चेहरा आणि मराठा-ओबीसी यांना विरोधी पक्षांची कामगिरी करावी लागेल, असा निकाल लागला. 

नवीन नेतृत्वाचा उदय
या निवडणूक निकालामधून महाराष्ट्रात नवीन नेतृत्वाचा उदय झाला. विशेष रोहित पवार, आदित्य ठाकरे, ऋतुराज पाटील, देशमुख बंधू (लातूर) अशा नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला. विशेष म्हणजे हे नेते सुरवातीपासून शहरी-ग्रामीण असा दुहेरी चेहरा घेऊन पुढे आले आहेत. रोहित पवारांची पाळेमुळे केवळ पवार घराण्यांशी संबंधीत नाहीत. कारण त्यांनी बारामतीच्या बाहेरील मतदारसंघ निवडला. तसेच त्यांनी सोशल मीडिया या नवीन तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत केली आहे. त्यांनी कृषी औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली आहे. ऋतुराज पाटील यांचा मतदारसंघ निम-शहरी स्वरुपाचा आहे. त्यांनी सेवा व्यवसायांशी जुळवून घेतले आहे. ठाकरे घराण्यातील नवीन नेतृत्व थेट निवडणुकीय राजकारणात उतरले आहे. देशमुख बंधुनी शहरी-ग्रामीण अशा दोन्ही मतदारसंघांशी संबंधीत नेतृत्व विकसित केले. त्यामुळे भाजपच्या बाहेर या चार-पाच महत्त्वाच्या नेत्यांचा उदय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांमधून झाला. या तीन नेत्यांची छाप राजकारणावर राहील. त्यामुळे पुढील दशकातील सत्तासूत्रे या चार-पाच नेत्यांकडे पाठविणारी ही निवडणूक झाली. या निवडणुकीने मनोगंड मोडीत काढला. कारण रोहित पवार कष्ट करून निवडून आले. तर ठाकरेंनी रिमोट कंट्रोलच्या ऐवजी थेट प्रतिनिधित्व करण्याची भूमिका घेतली. ओबीसीचे नेतृत्व नवीन या निवडणुकीमधून पुढे आले. धनंजय मुंडे यांना थेट विधानसभेमध्ये जाता आले. शिवाय अमोल कोल्हे, अमोल मिठकरी अशा नेतृत्वाचाही प्रभाव दिसून आला. त्यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात या नेत्यांचा शिरकाव झाला. त्यांचे सर्वांत मोठे आव्हान भाजपच्या पुढे राहील. याचे कारण भाजपातील युवा नेतृत्व कमी झाले आहे. उदा. खडसे यांची कन्या पराभूत झाली. शिवाय फडणवीस युवा असले तरी ते मध्यम वयोगटाकडे वळलेले आहेत. यामुळे एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्रचना झाली. तशीच नेतृत्वाचा देखील या निवडणुकीने पुनर्शोध घेतला असे दिसते. या निवडणुकीत स्त्रियांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले. या आघाडीवर सुन्नेत्रा पवार, सुनंदा पवार, धनश्री मुंडे अशी काही ठराविक महत्त्वाची नावे सांगता येतात. घरगाडा चालविण्याबरोबरच राजकारणाच्या आखाड्यात कर्तृत्व गाजविण्याची अप्रत्यक्षपणे धमक पुढे आली. म्हणून आकडेवारीपेक्षाही नवीन प्रारूप, नवीन नेतृत्व आणि वेगवेगळ्या उपप्रदेशांमध्ये वेगवेगळी स्पर्धा या तीन अर्थाने ही निवडणूक नवीन युगाची चिन्हे दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT