संपादकीय

हिमलाटेची पहाट (अग्रलेख)

सकाळवृत्तसेवा

अर्ध्यामुर्ध्या कांबळाखाली देहाचे मुटकुळे करून झोंबऱ्या थंडीला तोंड देत अवघी मराठी माती सध्या कुडकुडते आहे. "हिमलाट पहाटे पहा जगावर आली, करकरा पाखरे रगडी दांताखाली...' या कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी आठवाव्यात, असे चराचर गोठले आहे. काही मुलुख वगळला तर उभ्या-आडव्या महाराष्ट्राला ही हिमलाट झोंबते आहे. निफाडला तर पारा 1.8 अंशांपर्यंत खाली गेला. नाशकात द्राक्षांमधला मधुर रस मांडवातच साकळतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. महाबळेश्‍वरी वेण्णा तळ्याच्या आसपास दहिवराने बर्फाच्या खिरापतीचे रुप घेतले.

गावेच्या गावे, वस्त्या, पाडेही जागच्या जागी कुडकुडत आहेत. शिवारांच्या मातीवर कुठे कुठे गोठलेले दव दिसून येते आहे. असल्या मरणाच्या थंडीत द्राक्षांचे काय होणार नि हरभरा कुठवर टिकाव धरणार, या चिंतेने ग्रासलेला कास्तकार शेकोटीसमोर बसून हताशपणे या हिमलाटेला इरसाल शिव्या देण्यापलीकडे तरी काय करणार? थंडीचा हा कडाका किती नुकसानी करेल, याचा अंदाज काही लागत नाही. गाईगुजींचे हाल तर माणसाच्या पलीकडले.

गोठ्यातला उबारा तेवढा त्यांच्या मालकीचा. अर्थात चंद्रमौळी घरापेक्षा त्या गोठ्यातली ऊब संजीवक मानणारी असाहाय माणसेही कमी नाहीत. ऐन मार्गेसरातच पौषाचा कडाका जाणवतो आहे. शहरगावातल्या सिमेंटाच्या रानात मात्र असल्या थंडीला थारा नाही. कंगाल कुडाच्या खोपीत बिनदिक्‍कत घुसणारी ही थंडी नावाची चेटकी मखमाली महालांकडे मात्र फारशी फिरकत नाही. तिथे तिला थारा नसतो. तिथे उबाऱ्याचा दरारा अधिक! अशा गारठलेल्या हवेतच भिंतीवरल्या जुन्या कॅलेंडरला निवृत्ती घ्यावी लागणार आहे. कारण नवे वर्ष उंबरठ्यावर वाट पाहात उभे आहे. 

निसर्ग ऋतुचक्राप्रमाणे चालत असला तरी माणसाचे कालचक्र ग्रेगरियन कॅलेंडरबरहुकूम चालते. त्या कॅलेंडरचा आजचा दिवस अखेरचा. वर्षाचा अखेरीचा दिवस म्हटले की रसील्या वृत्तीच्या अनेकांचा उत्साह फसफसून येतो. दोस्तांची कोंडाळी मौजमजेत हिंदकळतात. चखण्यासारख्या खमंग गप्पांना उधाण येते. वास्तविक मावळत्या वर्षाला निरोप कृतज्ञतेने द्यावा, आणि उगवत्याचे नव्या उमेदीने स्वागत व्हायला हवे. नेमका तोच काळ उत्सवी किणकिणाटात निघून जातो. वर्षअखेर आणि वर्षारंभ असाच बेधुंद साजरा व्हावा, हा नियम कधी आणि का आला? कोठून आला हा परिपाठ? या परिपाठानुसार नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरोशहरीची हॉटेले गजबजतील. गावोगावची शेतघरे रातभर आरोळ्या-गाण्यांनी दुमदुमतील.

नववर्षाचे स्वागत मेजवानीच्या उन्मादातच करण्याची ही ऊर्मी एकीकडे स्वागतार्ह- किंवा आजच्या भाषेत "कूल'- वाटत असली, तरी त्यातला अतिउत्साह हा प्राय: रसभंग करणाराच असतो. अर्थात तारुण्याच्या कढत दिवसात हे भान येणे कठीण आहे, हे मान्य. अनुभवानेच त्यातला फोलपणा दिसत जातो. मेजवानी, पार्ट्या, धमाल नाचगाणी हा जीवनाचा भाग असायला काहीच हरकत नसली, तरी संयमाचा सीटबेल्ट बांधलेला असला तर या बुंगाट सेलेब्रेशनला अधिक अर्थपूर्ण करता येते, हे कळेकळेपर्यंत उशीर झालेला असतो. मावळत्या वर्षाला कृतज्ञतेने हस्तांदोलन करून छान निरोप द्यावा, नव्या आशाआकांक्षांचे सामानसुमान घेऊन दारी येऊन ठेपलेल्या नव्या वर्षाची प्रेमभराने आवभगत करावी. त्याच्या हातातले सामान उचलून त्याला आपुलकीने घरात घ्यावे.

गूळखोबरे द्यावे...हे सारे मन:पूर्वक करण्यासाठी कुठे हॉटेले बुक करावी लागत नाहीत. डीजेच्या दणदणाटाविनाही हा निरोप अथवा स्वागत समारंभ होऊ शकतो. त्यासाठी धुंद देहमनाने मोटारी हाकत बेदरकार हिंडण्याचीही गरज नसते किंवा दुसऱ्याला त्रास होईल असे वागण्याची आवश्‍यकता नसते. सेलेब्रेशनमध्ये आपण मग्न असताना दूर सरहद्दींवर कुणीतरी हाती बंदूक घेऊन डोळ्यात तेल घालून जीवघेण्या थंडीत उभा आहे, याचेही भान मनाच्या कोपऱ्यात असू द्यावे.

आपल्या समोरील मेज नानाविध पदार्थांनी ओसंडून वाहात असतानाच, दूर कुठल्यातरी गावपाड्यात उपाशीपोटीही कुणीतरी काकडत निजले आहे, त्याचीही जाण असू द्यावी. हा विचार अनेकांना जुनाट किंवा उबगवाणा वाटेलही, पण हाच खरा "ब्रेक' असतो. मोटारीला ब्रेक असतात, म्हणूनच ती वेगात चालवता येते, हे भान असायलाच हवे. एरवी "राजाच्या महाली रोज दिवाळी असतेच' या चालीवर म्हणायचे तर बार आणि हॉटेले बारमाही उघडीच असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT