संपादकीय

शिकारपत्रे ! (ढिंग टांग !)

सकाळवृत्तसेवा

मा. ना. ना. नानासाहेब फडणवीस, यांसी शतप्रतिशत प्रणाम. पांढरकवड्याची नरभक्षक वाघीण अवनी ऊर्फ टी-वन हिच्या शिकारीप्रकरणी विरोधक माझाच गेम करून राहिले असून, झुडपात दडलेल्या जनावराप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. वनमंत्र्यांच्या विरोधात राजकीय शिकाऱ्यांची नेमणूक झाल्याचे चित्र असून, परवा मंत्रालयात माझ्यावर अतिशय भयंकर प्रसंग उद्‌भवला. त्याचे असे झाले, की माझ्या कार्यालयाकडे मी निघालो असताना माझ्या बुटाची लेस सुटली. ती बांधण्यासाठी वांकलो असता, माझ्या दिशेने कोणी तरी मारलेला भुलीच्या इंजेक्‍शनचा डार्ट सुरक्षारक्षकास लागला.

आश्‍चर्य म्हणजे त्याला फारसे काही झाले नाही. स्टुलावर बसून त्याने दिवसभर व्यवस्थित ड्यूटी केली. काही झालेच असेल, तर ते लक्षात आले नसेल!! असो!! तथापि, या प्रकाराने मी हादरून गेलो आहे. अवनी ऊर्फ टी-वनचे प्रकरण मला छळत असून, माझे आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध असल्याचे आरोपही होऊ लागल्याने मनाला क्‍लेश होत आहेत. म्हणूनच या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती नेमावी, अशी माझी शिफारस आहे.

प्रसंगी हे प्रकरण युनोत गेले, तरी माझी त्याला तयारी आहे. आंतरराष्ट्रीय समितीचे गठन करून "अवनी : मर्डर ऑफ द मदर' अशा टायटलचा अहवाल मागवण्याचीही तयारी आहे. खरे म्हणजे माझी कश्‍शालाही तयारी आहे!! 
तेव्हा लौकरात लौकर कार्यवाही करावी, ही विनंती. अन्यथा भुलीच्या इंजेक्‍शनाचा डार्ट पुढल्या वेळी चुकण्याची शक्‍यता नाही! कळावे. 
आपला नम्र. सुर्धीभौ.(चंद्रपूरचा वाघ) वनमंत्री, महाराष्ट्र राज्य. 
* * * 
प्रिय सुधीरभाऊ, शतप्रतिशत प्रणाम. आपण काहीही काळजी करू नका. अवनीप्रकरणी आपले कातडे सलामत राहणार ह्याबद्दल निश्‍चिंत रहा! भुलीचे इंजेक्‍शन टाळण्यासाठी आपण तूर्त काही दिवस डब्बल कपडे घालावेत, अशी माझी सूचना आहे. डब्बल कपडे घातले की भुलीचे इंजेक्‍शन मारा किंवा चिंगम चिकटवा, काही फरक पडत नाही. उच्चस्तरीय चौकशी समितीची कल्पना चांगली आहे. ह्या समितीचे अध्यक्षपद आपण मा. उधोजीसाहेबांच्या गळ्यात मारावे काय? वाघाबिघांशी त्यांचे बरे जमते. ते काय ते बघून घेतील!! मी त्यांना तसे विनंतीपत्र धाडत आहे. जस्ट डोण्ट वरी. आपला. नानासाहेब. 
* * * 
नानासाहेब- 
अवनी वाघिणीचा बेधडक खून करून त्या रक्‍तलांछित हातांनी लिहिलेले आपले पत्र मिळाले. हे विनंतीपत्र आहे की चेष्टा? वाघ मारणार तुम्ही आणि आम्ही चौकशा करीत हिंडायचे? भले!! अवनी खून प्रकरणाची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली करावी, असे तुम्ही सुचवता. परंतु, ह्या विनंतीस मी स्पष्ट नकार देत आहे. 
एक तर वाघांची प्रकरणे हाताळण्यात माझी हयात गेली. अवनीची केस माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशनला आली, तर वाघांच्या प्रजातीत खळबळ उडेल. तक्रारी-तगादे घेऊन आमच्या घराशी वाघांच्या रांगा लागतील. अशा किती वाघांना मी पुरे पडणार? सदर प्रकरणात गोत्यात आलेल्या (तुमच्या) वनमंत्र्यांनी ही नस्ती उठाठेव कां केली? हाच माझा प्रश्‍न आहे. असो. तूर्त तरी मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यात मग्न आहे आणि अयोध्येत राममंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर येऊन पडली आहे. सबब, वाघाच्या खुनाचा तपास माझ्याच्याने होणार नाही. 

मुळात अवनी वाघिणीस टी-वन असे सरकारी नाव देण्यासच माझा पहिला विरोध आहे. टी-वन हे काय नाव आहे? टी-वन मधला "वन हा वन खात्याशी संबंधित असणार, अशी माझी समजूत होती, म्हणून इतके दिवस गप्प बसलो. पण, आता आता सदर वाघिणीस यापुढे टी-टू म्हणावे, असा आदेश आम्ही देत आहो! कारण महाराष्ट्राचे "टी-वन' आम्ही आहोत!! कळले? जय महाराष्ट्र. 
उधोजी. 

-ब्रिटिश नंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT