Online Shopping
Online Shopping sakal
संपादकीय

भाष्य : सर्वव्यापी बदलांचा ‘संधी’काळ

सकाळ वृत्तसेवा

जगाच्या भू-राजकीय पटलावर युक्रेन युद्धाला तोंड फुटल्याचे निमित्त होऊन वेगवान हालचाली आणि नवध्रुवीकरण घडत आहे.

- डॉ. रवींद्र उटगीकर

जगाच्या भू-राजकीय पटलावर युक्रेन युद्धाला तोंड फुटल्याचे निमित्त होऊन वेगवान हालचाली आणि नवध्रुवीकरण घडत आहे. त्याचे प्रतिबिंब अर्थकारणापासून ऊर्जानिर्मितीपर्यंतच्या संक्रमणांत उमटत आहे. भारतासाठी संक्रमणकाळ हा संधिकाळ आहे.

टू इम्प्रुव्ह इज टू चेंज; टू बी परफेक्ट इज टू चेंज ऑफन.

- विन्स्टन चर्चिल

बदल हाच जीवनाचा स्थायीभाव का मानला जातो, या प्रश्नाचे उत्तर या वचनात सापडते. बदलांची साखळी किंवा प्रक्रिया म्हणजे संक्रमण. अशा बहुअंगी संक्रमणांतून जग सध्या जात आहे. त्यांपैकी काही संक्रमणे जगाच्या भविष्याला आकार देणारी ठरत आहेत. चर्चिल यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक सुधारणेसाठी बदल हा जरी गरजेचा असला, तरी प्रत्येक बदलातून सुधारणा होईलच, याची शाश्वती नसते. त्यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकावी लागतात.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वळणावर भारत विकसित देश होण्याचे स्वप्न पाहात आहे. जगात होऊ घातलेल्या बदलांमधून आपल्या सानुकूल सुधारणा घडाव्यात, यासाठी आपला देशही प्रयत्नशील आहे. यासाठी बहुध्रुवीय, स्थैश्वीकरण, अर्थसंक्रमण, फिजिटल औद्योगीकीकरण आणि ऊर्जा संक्रमण या पाच आघाड्यांवरील नजीकच्या काळातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

बहुध्रुवीय (मल्टी-पोलरायझेशन) : जग बहुध्रुवीय होऊ लागल्याची घोषणा चीन आणि रशिया यांनी फेब्रुवारी २०२२मध्ये, युक्रेन युद्धाला तोंड फुटण्याआधी संयुक्त निवेदनाद्वारे केली होती. युरेशियामध्ये हितसंबंध वाढवू पाहणाऱ्या अमेरिकेला तो इशारा होता. त्याला प्रत्युत्तरादाखल चीन हा रशियाशी मैत्रीसंबंध वाढवून या नव्या नात्यात आपल्या शत्रूचे शत्रू जोडून घेऊ पाहात आहे.

इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील शत्रुत्व मिटवण्यासाठी चीनने अलीकडेच घेतलेला पुढाकार हे याचे उदाहरण. बहुध्रुवीय जगाची भारताची संकल्पना मात्र सहकार्य व सहजीवन या स्तंभांवर आधारलेली आहे. अमेरिकेची ‘ॲपल’ असो की चीनची ‘शाओमी’, ‘विवो’ किंवा ‘ओपो’ या दोन्ही बाजूंच्या कंपन्या भारतात मोबाइलचे उत्पादन करून ते जागतिक बाजारपेठेत निर्यात करत आहेत किंवा करण्याचा विचार करत आहेत, ही त्याची परिणती म्हणता येईल. हवाई वाहतूक, अक्षय ऊर्जा आणि सेमीकंडक्टर उत्पादन या क्षेत्रांतल्या संधी भारताला साधता येऊ शकतात.

स्थैश्वीकरण (ग्लोकलायझेशन) : स्थानिक बाजारपेठेतील ग्राहक किंवा वापरकर्ता यांची गरज (लोकलायझेशन) लक्षात घेऊन वैश्वीकरणाच्या (ग्लोबलायझेशन) प्रक्रियेत जगभर पोचवण्यासाठीची उत्पादने व सेवा यांना आकार देणे याला आपण स्थैश्वीकरण म्हणू. कोरोना महासाथीनंतर पुरवठा साखळीतल्या व्यत्ययांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्या या संकल्पनेकडे त्याही संदर्भातून पाहू लागल्या.

आत्मनिर्भर भारत योजनेचा भाग म्हणून आपल्या देशाने तेरा क्षेत्रांत भारतामध्ये उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन भत्ते (पीएलआय योजना) देऊ केले आहेत. मोबाईल, औषधे व वैद्यकीय उपकरणे, वाहने व वाहनांचे सुटे भाग, विशिष्ट गरजांसाठीचे पोलाद, दूरसंचार साधने आदींचा यामध्ये समावेश आहे. ही क्षेत्रे नजीकच्या भविष्यात रोजगारसंधींना चालना देण्याची चिन्हे आहेत.

अर्थसंक्रमण (इकॉनॉमिक ट्रान्झिशन) : जग बहुध्रुवीय होण्याची प्रक्रिया अर्थकारणाच्या पटलावरही उलगडू लागली आहे. जगातील सर्वांत मोठ्या दहा अर्थव्यवस्थांमध्ये जेमतेम दोन दशकांपूर्वी जपान आणि चीन यांखेरीज अमेरिका व युरोपीय देशांचा दबदबा होता. आणखी तीन दशकांत चीन जगातील सर्वांत मोठी, भारत दुसऱ्या स्थानाची आणि इंडोनेशिया ही चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. जागतिक अर्थकारणाचा केंद्रबिंदू पूर्व आणि दक्षिण दिशांनी सरकत असल्याचे हे निदर्शक आहे.

या अर्थसंक्रमणाला आणखी दोन पैलू जोडले जाताहेत. त्यांपैकी एक आहे जागतिक हवामान बदलांचा मुकाबला करण्यासाठी पुरस्कार केल्या जात असलेल्या चक्रीय अर्थव्यवस्थेचा (सर्क्युलर इकॉनॉमी). ही अर्थव्यवस्था शाश्वत स्रोतांवर बेतलेली आणि उपभोगवादाकडून उपयुक्ततावादाकडे नेणारी असेल. दुसरा पैलू आहे बहुचलनी अर्थव्यवस्थेचा. जागतिक राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलरच्या स्थानाला पर्याय शोधण्याची चाचपणी युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यापासून अधिक गतिमान होत आहे. त्यातून भारताशी रुपयामध्ये व्यापारविनिमय करण्यास अनेक देश पुढे येत आहेत.

फिजिटल औद्योगिकीकरण : संगणकापासून यंत्रमानवापर्यंत आणि इंटरनेटपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत वेगवेगळ्या रूपांत तंत्रज्ञान आज आपल्या सेवेत आहे. शिक्षण-आरोग्यापासून शेती व बांधकामापर्यंत अनेकविध क्षेत्रांतील दर्जासुधार व सुकरता तंत्रज्ञानाने साध्य होत आहे. तंत्रज्ञानाचे हे नवे आविष्कार उद्योगविश्वाचेही स्वरुप पालटवत आहे.

उद्योगांच्या भौतिक विश्वातील यंत्रसामग्री व मनुष्यबळ यांना डिजिटल विश्वातील सोयींची दिलेली जोड यांसाठी ‘फिजिटल’ शब्द प्रचलित होत आहे. औद्योगिकीकरणाचे चौथे पर्व तंत्राधारित उद्योगांचे आणि पाचवे त्याला समाजाभिमुखता देणारे आहे. संशोधन व विकास आणि नवता हे या उद्योगविकासाच्या गाभ्याशी आहेत. पाचव्या पर्वात जैवअर्थव्यवस्था आणि त्यावर आधारलेली शाश्वत संकल्पनांवर बेतलेली चक्रीय अर्थव्यवस्था साकारली जाईल. तंत्रसक्षमता आणि जैवभाराची मुबलकता यांमुळे या दोन्ही आघाड्यांवर भारताच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

ऊर्जा संक्रमण (एनर्जी ट्रान्झिशन): हवामान बदल आणि तापमानवाढ ही मोठी आव्हाने आहेत. खनिज ऊर्जास्रोत तापमानवाढीला कारणीभूत हरितगृह वायूंच्या ७५% उत्सर्जनाला कारणीभूत ठरतात. या खनिज ऊर्जास्रोतांना पर्यायी अक्षय व शाश्वत ऊर्जास्रोतांचा वापर हा हवामान बदलरोधक लढ्याच्या केंद्रस्थानी आला आहे.

भारताने या लढ्यात सहभागी होताना, २०३०पर्यंत देशाच्या गरजेच्या ५०% ऊर्जानिर्मिती ही अक्षय स्रोतांपासून करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जैवऊर्जा यात मोक्याची भूमिका बजावू शकते. त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक जैवभाराची मुबलक उपलब्धता ही आपली जमेची बाजू आहे. शिवाय, त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व त्यावर आधारित रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे हे संक्रमण २०४७पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वाधिक पथ्यावर पडणार आहे.

भारताला चांगला वाव

जगावर सखोल परिणाम होणार असलेल्या या पाच आघाड्या आहेत. भू-राजकीय पटावर जेव्हा या प्रत्येक आघाडीवरील फासे पडतील तेव्हा ते आपल्या पथ्यावर पाडून घेण्याची संधी भारताला असेल. भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड, भू-राजकीयदृष्ट्या समतोल भूमिका व त्यातून जागतिक पटलावरील स्वीकारार्हता, तंत्रक्षमता आणि पर्यायी शाश्वत अर्थव्यवस्था उभारण्याची अंगभूत सिद्धता ही यामागील ठळक कारणे आहेत. या संक्रमणाचे लाभ देशवासीयांपर्यंत रोजगारसंधी आणि उत्पन्नवाढ या स्वरूपांत पोचले, तरच भारताने ही संक्रमणसंधी साधली, असा निष्कर्ष काढता येईल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने अलीकडेच ‘फ्युचर ऑफ जॉब्ज रिपोर्ट’ नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, ७५% कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर बेतलेली कार्यपद्धती अंगीकारणार आहेत. त्यामुळे या कंपन्यांचा चेहरामोहरा बदलेल. तेथील रोजगारसंधीसाठीचे मनुष्यबळ नव्या ‘फिजिटल’ युगानुरूप घडवावे लागेल. ही जागतिक संक्रमणे आपल्यासाठी उदरनिर्वाहाच्या साधनांपलीकडेही महत्त्वाची आहेत. प्रत्येक भारतीयाने पर्यावरणस्नेही, शाश्वत जीवनशैली अंगीकारली, तर या संक्रमणातील काही प्रक्रियांनाही गती मिळेल. आपण त्यादृष्टीने लाइफस्टाइल फॉर एन्व्हायरन्मेंट (लाइफ) मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून शाश्वत विकासाचे प्रारूप आपण जगापुढे ठेवू शकणार आहोत. मात्र त्यासाठी संक्रमणाच्या पुढल्या हाकांचा कानोसा घेणेही महत्त्वाचे आहे.

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असून, व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT