शनिवारचा दिवस होता. उन्हे चढू लागली होती. ठाण्याच्या तलाव पाळीवर गजबज होऊ लागली. तशी तिथे गजबज नेहमीचीच. पण आज जरा वेगळा उत्साह होता. हवेत प्रेमाचा गंध मिसळला होता. आमचे ठाणे आहेच मुळी सुंदर! हे आहे तलावांचे शहर. कुठल्याही दिशेला गेले, तरी एखादे तळे लागते. तळ्यात कचरपट्टी असते, हा भाग वेगळा. पण तळे असतेच.
तलावपाळी हा ठाणेकरांचा अगदी आवडता स्पॉट आहे. त्याला म्हणायचे मासुंदा तलाव. या तळ्याकाठीच जांभळीनाका आहे. तिथे जांभळीचे एकही झाड नाही. पण कालाखट्टा सरबताच्या गाड्या खूप असल्याने बऱ्याच ठाणेकरांच्या जिभा मात्र जांभळ्या होतात. असो.
जांभळीनाक्यावर तसे अनेक गंध असतात. पलिकडेच मंडईतून वेगवेगळे वास येत असतात. कोथिंबिरीचा खकाणा उडतो. शिंकत शिंकत भाज्या घेणारे ठाणेकर यावेळी दिसतात. आणखी थोडेसे पलिकडे गेले की मामलेदार मिसळीचा अद्भुत गंध दर्वळतो. मामलेदार मिसळ हे ठाण्याचे हार्ट आहे. किंबहुना त्याच्या आसपास वसलेल्या वस्तीलाच ठाणे असे म्हणतात.
अशा आमच्या सुंदर ठाण्यात किनई शनिवारी मोठ्ठे पाहुणे आले. मोठ्ठे म्हणजे अगदी मोठ्ठेच्या मोठ्ठे. अर्थात ते वाजतगाजत आले. मोठे पाहुणे मोटारीच्या आत बसून येतात की नाही? गॉगल घालून छॉन छॉन हसतात. काच खाली करुन हातबित करतात. किंवा टेचात उतरुन गर्दीत मिसळतात. पण हे पाहुणे मात्र गाडीच्या टपावर बसून आले!! आहे की नाही चंमतग!!
गाडीच्या टपावरचे पाहुणे देखणे होते. किती सुंदर हसत होते ते! अंगात पांढरा टीशर्ट. पायात खेळजोडे. शेजारी आपले नानाभाऊ पटोले. (तरीही हसत होते!) नानाभाऊंना ऊन लागत होते, पण पाहुण्यांना उन्हाची काही पर्वा नव्हती. नानाभाऊदेखील टपावर बसलेले होते. (करतील काय?) पण पाहुण्यांनी आल्या आल्या ठाणेकरांची मने जिंकली. ‘काय कसं काय? बरं आहे ना?’ अशी उपस्थितांना ख्यालीखुशाली विचारली. सगळे ‘होऽऽ’ म्हणाले. नानाभाऊंच्या पोटात गोळा आला असावा! कारण सगळ्यांचे बरे चालले असेल तर मतदान कसे मागणार? पण ते असो.
आमचे ठाणे कितीही सुंदर असले तरी या ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्षे निव्वळ नफरत भरलेली आहे. बघावे तिकडे नफरतच नफरत. किंबहुना ठाणे जिल्ह्यात वर्षानुवर्षे नफरतीचे वातावरण आहे. डोंबिवली हा तर नफरतीचा बालेकिल्ला. त्याखालोखाल ठाणे हा उपबालेकिल्ला!! हे विखारी वातावरण बदलण्याच्या हेतूनेच पाहुणे खास दिल्लीहून आले होते. दिल्लीहून ते ईशान्येत गेले आणि तिथून फिरत फिरत ठाण्यात आले! नफरतीच्या वातावरणात मोहब्बतीचे दुकान टाकण्याची इच्छा पाहुण्यांनी बोलून दाखवली.
बाकी दुकानच घालायचे असेल तर जांभळी नाक्यासारखा स्पॉट नाही. अगदी मोक्याची जागा आहे. कितीतरी दुकाने तिथे प्रचंड चालतात. चालतात कसली धावतात!! उगीच का तिथे मंडई आहे? पण प्रॉब्लेम जागेच्या किंमतीचा आहे. फारच मोक्याची जागा असल्याने किंमती अफाट! खोक्याने पैसे मोजावे लागतात!! प्रचंड भाडे असल्याने व्यवसाय परवडत नाही, अशी कुरकुर तिथले दुकानदार करत असतात. मुहब्बतीचे दुकान मात्र नक्की चालेल, असे वाटते.
मोठ्ठ्या पाहुण्यांनी जांभळीनाक्याचा परिसर पाहून घेतला. वीजपाणी मुबलक आहे, हे बघून त्यांना समाधान वाटले. मुहब्बतीच्या व्यवसायाला पाणी लागते का, हे ठाऊक नाही. पण जांभळीनाका मासुंदा तलावाकाठीच तर आहे.
…ठाणेकरांना प्रेमाचा संदेश देऊन पाहुणे मुंबईला निघून गेले, आणि इतकी वर्षे आपण मात्र दाढ्या वाढवून वाढवून प्रेमाला मुकलो, या भावनेने ठाणेकर हळहळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.