raj
raj 
satirical-news

ढिंग टांग : सह्याजीराव!

ब्रिटिश नंदी

सहीमुळे मनुष्याला वजन प्राप्त होते. ज्याला सही जमली, त्याचा बेडापार जाहला असे समजावे. ‘जाको राखे सहीयां मार सकै ना कोय...’ या जुन्या कबिराच्या दोह्याचा अर्थ अनेक वर्षे आम्हाला ‘ज्यास सहीचे संरक्षण त्यास मारहाणीचे भय नाही’ असाच असावा, असे वाटत असे. पण तो गैरसमज निघाला.

सहीवरुन माणसाचे भूत, वर्तमान आणि भविष्य सांगणारे एक शास्त्र आहे. त्याला स्वाक्षरीशास्त्र म्हणतात. स्वाक्षरीशास्त्रात आम्ही थोडे प्रभुत्त्व मिळवले आहे, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करु. यासंदर्भातील आमची काही संशोधने चिंत्य आहेत, अशी निनावी पत्रे (अर्थ : बिनासहीची) आम्हाला आली आहेत. लफ्फेदार लपेटबाज सही करणारा गृहस्थ प्रत्यक्षात थापाड्या असतो, हा मूळ शोध आमचाच! सही करुन खाली दोन टिंबे देणारी व्यक्ती ही विश्वासार्ह नसून खालच्या बाजूला दोन टिंबे देऊन ठेवण्याच्या लायकीचीच असते, हेही मूलभूत निरीक्षण आमचेच!! खालच्या अंगाने सुरु होऊन वरच्या अंगाला संपणारी चढत्या भाजणीची सही ही खरीखुरी ‘सही’!! या सहीचा मालक भारी व्यक्तिमत्त्वाचा व भविष्याचा असतो, असे आम्ही ‘स्वाक्षरामृत : स्वाक्षरीचे वळणदार भविष्य’ या ग्रंथात (आगामी) नमूद करुन ठेवले आहे.

मराठीत सही करण्याचे अनेक लाभ आहेत. कुठल्याही स्वाक्षरीतज्ञाला विचारा. तो सांगेल की, मराठी सहीचा धनी हा अतिशय सरळ मनाचा, अल्पसंतुष्ट आणि भोळाभाबडा असतो. तो ना कुणाच्या अध्यात, ना मध्यात! भलाई दिसली की प्रसंगी कासेची लंगोटी सोडून देईल, नाठाळाचे माथे दिसले की हातातील सोट्याने तिथल्या तिथे खळ्ळ खट्याक!! तिथे हयगय नाही...

मराठीत सही करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राबद्दल ज्वलज्जहाल अभिमान असतो. मराठीच्या मारेकऱ्यांचा तो कर्दनकाळ असतो. मराठीचा मारेकरी दिसला रे दिसला की हा सही मनुष्य दातओठ खाऊन धावलाच म्हणून समजा. परंतु, हीच जाज्वल्य अभिमानापोटी मराठीत सही करणारी व्यक्ती रागावली की हिंदीत शिवीगाळ करते, असाही प्रस्तुत स्वाक्षरीतज्ञाचा अनुभव आहे. एका मराठी माणसाच्या सहीवरुन भविष्य सांगण्याची वेळ प्रस्तुत स्वाक्षरीतज्ञावर आली असता, सदरील मराठी माणसाने भविष्य ऐकून हिंदी भाषेत वैविध्यपूर्ण गालिप्रधान केले, आणि वर सदरील स्वाक्षरीतज्ञाच्या दोन्ही गालांवर सणसणीत सह्याही ठोकल्या. नंतर प्रतिज्ञापत्राच्या हरेक पानावर कराव्यात, तशा सगळ्याच देहभागांवर छोट्या छोट्या इनिशियल केल्या!! पुढले तीन दिवस दोन्ही कानांमधून ‘गुं गुं गुं’ ध्वनी ऐकू येत होता, शरीर ठणकत होते. ...असो.

मराठीत सही करणाऱ्या मनुष्यास विड्रावल स्लिप भरुन ब्यांकेतून स्वत:च्याच खात्यातील पैसे काढणे सुकर होते. अन्यथा सहीत फरक आहे असे कारण सांगून ब्यांक कार्कून आपल्यास फुटवण्याची शक्यता असते. मराठीत स्वाक्षरी केल्यास (खात्यात पैसे नसूनही) धनादेश वटेल, असा भाबडा विश्वास आम्हाला वाटतो!!

काही करारी मराठी मनुष्ये पासपोर्टवरही मराठीतच सही करतात. त्यावर इमिग्रेशनवाले निमूटपणे शिक्कामोर्तब करतात. आपल्या ‘सहीन’शक्तीचा अंत पाहात नाहीत, असेही एक आंतरराष्ट्रीय निरीक्षण आहे.

सारांश एवढाच की, होताहोईतो माणसाने मराठीत सही करावी. ती फक्त मराठी भाषा गौरव दिनी सार्वजनिक बागेत फळ्यावर करावी, असे नव्हे, तर नेहमीच मराठीत सही करावी! सही कुठेही करावी, पण मराठीत करावी!

कारण सही हीच आपली ओळख असते, ती सापडायला मात्र हवी! ज्याला आपली सही सांपडली, तो सह्याजीराव होय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT